प्रभू एक जगी आधार खरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |



भ्रष्टाचार, घोटाळे यांना ऊत आला आहे. अशा कठीण काळात पंढरपूरचा पांडुरंग, चाफळचा प्रभू श्रीराम, तुळजापूरची भवानी माता, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वरचा शंभू महादेव यांच्या दर्शनानं थोडसं बरं वाटतं, साकडं घालून संकटं दूर करण्यासाठी सामान्य लोकं तेथे नतमस्तक होतात.


कलियुगामध्ये कली प्रबळ झाला आहे. तो सर्वत्र थैमान घालतो आहे. वासना, विकार, विकार यांच्या विळख्यात समाज भरडला जात आहे. सौम्यता, सात्विकता, सज्जनता क्षीण झाली आहे. कली थयथय नाचून थयथयाट करतो आहे. सामान्य लोक भयभीत व भ्रमित झाले आहेत. कुठे जावे? काय करावे? हे कळेनासे झाले आहे. अनाचार, अत्याचार, दहशतवाद हे दैत्य छळत आहेत. भ्रष्टाचार, घोटाळे यांना ऊत आला आहे. अशा कठीण काळात पंढरपूरचा पांडुरंग, चाफळचा प्रभू श्रीराम, तुळजापूरची भवानी माता, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वरचा शंभू महादेव यांच्या दर्शनानं थोडसं बरं वाटतं, साकडं घालून संकटं दूर करण्यासाठी सामान्य लोकं तेथे नतमस्तक होतात. भगवंतापर्यंत घेऊन जाणारे ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्या स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्या पवित्र भूमीवर जाऊन संतांचा आधार घ्यावासा वाटतो. एकवेळ भगवंत कोपेल; परंतु संत शांत, क्षमाशील असतात. ते भगवंताला कसं प्रसन्न करून घ्यावं, ते प्रेमानं समजावून सांगतात. भगवंताला भजन आवडतं म्हणून भजनयुक्त भक्तीचं महत्त्व विशद करतात. भावपूर्ण अंतःकरणानं केलेलं गुणगान म्हणजे भजन! भजन केल्याशिवाय भोजन करू नये, असा प्रेमळ उपदेश करतात. भगवंताच्या चिंतनाशिवाय एकही क्षण वाया घालवू नये, असं कळवळून कथन करतात. खरं तर वरील संत आता देहरुपात नाहीत, ते समाधिस्थ झालेले आहेत. त्यांच्या समाधीस्थानाच्या येथील दिव्य स्पंदनं भयकंपिताला भयमुक्त करतात. संत समाधिस्थ झाले तरी, त्यांचे दिव्य ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांच्या पारायणानं, अभ्यासानं, मननानं, चिंतनानं कलियुगातील चिंता कमी होतात. कली असूरवृत्तीच्या माध्यमातून कलकलाट करत असला तरी, संताचे अमृतबोल असलेल्या ग्रंथांमुळे टिकाव धरता येतो. टाकाऊ गोष्टी, विचार, आचार यांचं आकलन होतं. टिकाऊ विचार, उपदेश हृदयात ठेवावेत, हा विवेक जागृत होतो. जगण्याला खूप बळ प्राप्त होतं. परिस्थितीमध्ये प्रतिकूलता असली तरी, भगवंताच्या शुद्ध भक्तीने मनाची अनुकूलता साधता येते. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा ही संपत्ती जवळ असली की, इतर विपत्ती दूर जातात. प्रत्येक ओवी, अभंग आपली श्रद्धा बळकट करते. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं आहे की,

 

नाही वैकुंठीचा ठाई

नाही योगियांच्या हृदयी।

माझे भक्त गाती ठाई ठाई

तेथे मी तिष्ठतु नारदा॥

 

हे नारदा, मी वैकुंठात नाही. मी खूप योग-याग करणाऱ्या योगियांच्या हृदयातही नाही, जे माझे भक्त आर्तभावानं, शुद्धप्रेमानं माझं गुणवान गातात, त्या ठिकाणी मी त्यांच्याजवळ कायम उभा असतो. यामधून आपल्या लक्षात येते की, साधी भोळी भाबडी भक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. त्या स्थानी तो भक्तांना भेटण्यासाठी उभा असतो. त्यांना सर्व प्रकारच्या संकटांतून सोडविण्यासाठी तप्तर असतो. अशा भगवंताच्या जवळ जाण्यास कली घाबरतो. जेथे भगवंताचे भक्त असतात, तेथे कलीची मात्रा चालत नाही. अंतःकरणभक्तीनं भरून गेलं की, कली काहीच वाकड करू शकत नाही. भगवंत, संत यांच्या छायेत निवांतपणे निश्चिंतपणे राहाणाऱ्या भक्ताच्या केसालादेखील धक्का लावण्याचं धारिष्ट्य कली करू शकत नाही. म्हणूनच कलियुगात राहूनही भक्तांना भगवंत सकल त्रासांपासून दूर ठेवतो.

 

प्रभू एक जगी आधार खरा।

प्रभूवीण अवघा व्यर्थ पसारा॥

 

हे सत्य आहे. प्रपंच, संसार यांचा पसारा कामाचा नाही. प्रभूसह कर्म व्यवहार केला, तर प्रभू त्याला आशय प्राप्त करून देतो. सगळा भार त्याच्यावर सोपवला की, तोच प्रपंच सांभाळतो. भक्ताला मातेप्रमाणे सुरक्षित ठेवतो. त्यामुळे प्रभू हाच संपूर्ण जगात एकमेव आधार आहे हे सत्य आहे. हे सत्य एकदा समजलं की, मग कशाचेही भय उरत नाही. चिंता संपून जातात. म्हणूनच म्हटले आहे,

 

हरिविया भक्ता नाही भयचिंता ।

दु:ख निवारिता नारायण ॥

 

नारायण दु:खाचं निवारण करतो, त्यामुळे हरीच्या भक्ताला भय आणि चिंता उरत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे संतांच्या उपदेशाचं अमृत प्राशन करून त्यानुसार जीवन जगलं की, कलियुगातही कोणताही धोका संभवत नाही.नारायण कोणाच्या तरी रुपात येऊन साहाय्य करतो. नारायणाला मन:पूर्वक आळवलं की, तो आपल्या भोवती आवळलेले फास हलक्या हातानं सोडवतो. म्हणूनच भगवंत, नारायण आणि त्याची प्राप्ती करून घेतलेल्या संतांवर संपूर्ण श्रद्धा ठेवली की, आपलं काम सोप्पं होतं. अशांत, अवघड काळात सांभाळणारा असल्यावर काळजी कशाला करायची? कलियुगात भक्तिरस सातत्यानं सेवन केला की शांतीरसाची हमखास प्राप्ती होते. त्यामुळे पूर्ण तृप्ती अनुभवास येऊन तृष्णा शमते. अवतीभवती अशांतता असली तरी, भगवंत, संत यांच्या आश्रयाने, आधाराने वाटचाल करणाऱ्यांना शांतीच्या शीतल चांदण्यामध्ये न्हाऊन निघण्याचं भाग्य लाभतं, यात शंकेला स्थानच उरत नाही.

 
 -कौमुदी गोडबोले

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@