भुसावळ न.पा.च्या सर्वसाधारण सभेत ३५ विषयांना मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2018
Total Views |

विरोधी जनआधार विकास पार्टीचा सभेवर बहिष्कार

 
 
भुसावळ, ३० ऑक्टोबर
येथील नगरपालिकेची सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिकेच्या सभागृहात शांततेत झाली. या सभेत ३५ विषयांना सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी एमकताने मंजुरी दिली. विरोधी जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकला. कारण जनआधार पार्टीच्या गटनेत्यासह तीन नगरसेवकांना अपात्र करण्याच्या कारवाईमुळे या सभेवर बहिष्कार टाकला. बहिष्काराचे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले आहे. सभेच्या पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे होते. उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, रोहिदास दोरकुडकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 
 
तालुक्यात पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पालिका प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, तसेच रेल्वेच्या बंधार्‍याची उंची वाढविण्यात यावी. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकरची संख्याही वाढविणे अशा विविध विषयांवर चर्चा होऊन ३५ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरात असलेल्या नगरपालिकेच्या विहिरींचा उपसा करून त्या वापरात आणाव्यात तसेच तापी नदीजवळील स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये स्वच्छता करण्यासाठी एका माणसाची नियुक्ती करावी असा महत्वाचा मुद्दा नगरसेवक पिंटू कोठारी यांनी मांडला. या मुद्याला प्रा.सुनील नेवे यांनी अनुमोदन दिले. सभेला माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, शिक्षण सभापती ऍड. बोधराज चौधरी, किरण कोलते, प्रा. दिनेश राठी, मुकेश पाटील, पिंटू कोठारी, शैलजा नेमाडे, प्रितम महाजन, प्रा.सुनील नेवे, मनोज बियाणी, रमेश नागराणी उपस्थित होते.
 
 
नवीन टँकर, ट्रॅक्टरची होणार खरेदी
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे पाणीटंचाई निवारण्याच्या दृष्टीने निधी मिळवणे, तसेच नवीन टँकर आणि ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार आहे. शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळावा, यासाठी बंधार्‍याच्या कामाचा खर्च अंदाजपत्रक तयार करणे आदी विषय मांडण्यात आले. यावर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर आणि नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
 
‘जनआधार’चा बहिष्कार
नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. परंतु विरोधी जनआधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे यांच्यासह नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकला. याबाबत गटनेते शेख जाकीर सरदार यांनी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर यांना बहिष्कार टाकल्याचे पत्र दिले.
 
या विषयांना मिळाली मंजुरी
सर्वसाधारण सभेत पालिकेच्या जुन्या इमारतीच्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे, संत गाडगेबाबा रुग्णालयात खोली बांधणे, रुग्णालयाच्या छताची दुरुस्ती करणे, नवीन औषधी खरेदी करणे, मामाजी टॉकीज रस्त्याच्या बाजूला आरसीसी गटारी बांधून पेव्हर ब्लॉक बसविणे, लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार म्हणून नेमणूक करणेबाबतच अशा इतर ३५ विषयांना मंजुरी देण्यात आली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@