आर्थिक उलाढालीचा नवा मार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018
Total Views |

 
- महेश जोशी
सध्याच्या इन्स्टंट आणि ‘रेडी टू कूक’च्या जमान्यात प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. साहजिकच या क्षेत्रात आर्थिक उलाढाल वाढत असून उद्योजकांना उत्तम नफा मिळवणं शक्य होत आहे. त्यादृष्टीने शेतकर्यांनीही शेतमाल प्रक्रिया उद्योगावर भर द्यायला हवा. त्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हा नवा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व तसंच आर्थिक उलाढालीवर टाकलेला प्रकाश.
 
 
आजकाल कारकीर्दीच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्या तरी स्वतंत्र व्यवसायाकडे अधिक ओढा दिसून येत आहे. हे लक्षात घेऊन उद्योग-व्यवसायांना अधिकाधिक प्रोत्साहन तसंच सहकार्य करण्यावरही भर दिला जात आहे. यात प्रक्रिया उद्योगांचाही समावेश होतो. अलिकडच्या काळात देशात प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. त्याच बरोबर या उद्योगातील आर्थिक उलाढालही वरचेवर वाढत आहे. मात्र, शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांचा म्हणावा तेवढा विस्तार झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे या क्षेत्रात अजूनही संधी आहेत. त्यादृष्टीने शेतकर्यांनी अवश्य विचार करायला हवा. मुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांसाठी शेतमालावरील प्रक्रिया उद्योग हा उत्तम कमाईचा महत्त्वाचा स्त्रोत ठरणार आहे. हल्ली वाहतुकीच्या व्यापक सुविधा निर्माण झाल्यामुळे तसंच माहिती-तंत्रज्ञानामुळे विविध भागातील बाजारपेठांची माहिती उपलब्ध होत असल्यामुळे तेथील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन प्रक्रियायुक्त माल पाठवणं शक्य आहे. मुख्यत्वे शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी फार मोठं भांडवल लागत नाही. हा उद्योग सुरुवातीस मर्यादित स्वरूपात सुरू करता येणं शक्य आहे. शिवाय हा प्रक्रिया उद्योग अगदी शेतावरही सुरू करता येतो. त्याद्वारे पुरेशी मागणी नसल्यानं वा वाहतुकीच्या दरम्यान होणारी शेतमालाची नासाडी टाळता येईल. पर्यायाने होणारं नुकसान टळेल.
 
 
 
आजकाल यात काही उद्योगांची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. म्हणजे हे उद्योग शेतकर्यांकडून योग्य प्रतीचा कच्चा माल खरेदी करतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून पक्का माल बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो. अर्थातच, यात शेतकर्यांच्या उत्पादनांना बर्यापैकी किंमत मिळते. मुख्यत्वे उत्तम प्रतीच्या शेतमालाच्या उत्पादनासाठी संबंधित उद्योगांकडून शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसंच सहाय्य केलं जातं. साहजिकच उत्तम दर्जाचं उत्पादन घेणं शेतकर्यांना शक्य होतं. ही साखळी शेतकर्यांसाठी उत्तम उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार ठरत आहे. याच पद्धतीने जैन उद्योगसमूहाच्या मसालेनिर्मिती उद्योगानंही अनेक शेतकर्यांना आर्थिक समृद्धीचं नवं दालन उपलब्ध करून दिलं आहे. शेतकरी आणि कंपनी यांच्यातले संपर्क-संवाद-व्यवहाराचे सर्व बारीकसारीक आणि इतरही अडथळे दूर सारत शेतकर्यांना फायदा व्हावा, हा या उद्योगामागील महत्त्वाचा उद्देश आहे. यासंदर्भात माहिती घेत असताना प्रक्रिया उद्योगाच्या बदलत्या रुपाची कल्पना आली.
आतापर्यंत मसाला प्रक्रिया उद्योगात अन्य ठिकाणी मसाले उन्हात कोरडे केले जातात. ही प्रक्रिया साधारण 15 दिवस ते एक महिन्यापर्यंत चालते. थोडक्यात, मसाल्याचा कच्चा माल थेट उन्हात उघड्यावर वाळत ठेवला जातो, तोही थेट महिनाभर. महिनाभर उघड्यावर असलेल्या कच्च्या मालाची अवस्था काय होत असावी, याची कल्पना करता येते. याच पारंपरिकतेला आता सुयोग्य आणि आरोग्यदायी पर्याय दिला जात आहे. यात मसाल्याचा कच्चा माल कोरडा करण्यासाठी आधुनिक अशा कंट्रोल डिहायड्रेशन प्रोसेसचा वापर केला जातो. पूर्णतः सुरक्षित, शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाते. मुख्यत्वे या प्रक्रियेत मसाल्यांची नैसर्गिक गुणवत्ता कायम राहण्यास मदत होते. शिवाय मसाल्याची चव आणि औषधी गुणधर्मसुद्धा कायम राहतात. मसाल्याच्या प्रक्रिया उद्योगात सर्वसाधारणपणे कच्चा माल उघड्यावर थेट उन्हात सुकवला जातो. उघड्यावर हा माल जवळपास महिनाभर पडून राहतो. या कालावधीत या मालावर धूळ, माती, किटाणू आदींचा संसर्ग होणं अटळ आहे. परिणामी, मसाल्याची नैसर्गिकता, औषधी गुणधर्म आणि चवीत मोठा फरक पडण्याची शक्यता बळावते. कच्चा माल ओला असल्याने आणि उघड्यावर राहिल्याने त्यात बुरशी निर्माण होण्याची शक्यता वाढते, त्यातून किटाणू निर्माण होतात. यावरून मसाल्याचा कच्चा माल कोरडा करण्यासाठी आधुनिक अशा कंट्रोल डिहायड्रेशन प्रोसेसचा वापर किती महत्त्वाचा ठरतो, याची कल्पना येते. अशा उद्योगात सुका आणि ओल्या मसाल्याची निर्मिती केली जाते. त्यात मिरची, हळद, आले, धणे, जिरे, मिरे या घटकांचा समावेश आहे. अशा उद्योगात तयार केल्या जाणार्या सुक्या आणि ओल्या मसाल्याच्या निर्यातीलाही वाव मिळू शकतो. भारतातही विविध ठिकाणी हा माल विक्रीसाठी उपलब्ध करता येतो. विशेषत: भारतातून युरोप आणि अमेरिकेसारख्या देशात ओला आणि सुका या दोन्ही स्वरूपातील मसाल्यांची निर्यात केली जाते. या उद्योगात आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मालाची गुणवत्ता उत्तम राहते. त्याच बरोबर या उद्योगात आलं, लसूण, कांदा, मिरची यांची पेस्टही तयार केली जाऊ शकते. तसंच कोरडा मसालादेखील तयार करता येतो. असं असलं तरी या उद्योगात तयार मालाचं पॅकेजिंग करताना बरीच काळजी घ्यावी लागते. तरच ग्राहकांना पूर्णतः सुरक्षित, उच्च दर्जाचे आरोग्यदायी मसाले देता येतात.
 
सद्यस्थितीत देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यांची देशासह परदेशात निर्यात होणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने गुणवत्ता, विश्र्वास आणि पारदर्शकता या जीवनमूल्यांचा संस्कार पेरत करार शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात विविध उद्योगांचा सिंहाचा वाटा आहे. प्रक्रिया उद्योग सक्षम करण्यासाठी विदेशातील शेतकरी आणि कंपन्या मिळून वेगवेगळ्या वेळी संबंधित पिकांची लागवड करतात. शिवाय या पिकांचा बहर अशा पद्धतीनं धरला जातो, जेणेकरून नऊ ते दहा महिने वा वर्षभर प्रक्रियेसाठी कच्चा माल उपलब्ध झाला पाहिजे. यातून प्रक्रिया उद्योगाला आपोआप चालना मिळते. यामुळेच करार शेतीचं आदर्श मॉडेल महत्त्वाचं ठरतं. शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगात वरचेवर संधी वाढत आहेत. मात्र, या क्षेत्रातील भविष्यातील आव्हानं ओळखून शेतकर्यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरलं पाहिजे. यामुळे मूल्यवर्धन होऊन अपेक्षित दर मिळवणं तसंच शेतीमालाचं नुकसान टाळणं शक्य होईल. प्रक्रियेअभावी काढणीनंतर भारतात 40 टक्के, इंडोनेशियात 20 ते 50 टक्के, इराणमध्ये 35 टक्के, कोरियात 20 ते 50 टक्के, फिलिपिन्समध्ये 27 ते 42 टक्के, श्रीलंकेमध्ये 16 ते 41 टक्के थायलंडमध्ये 17 ते 35 टक्के आणि व्हिएतनाममध्ये 20 ते 35 टक्के शेतमालाचं नुकसान होत असल्याची माहिती कॅपिटल बजेटिंग अॅग्रिकल्चर 2010-11 मधून समोर आली आहे.
शेतमालावर प्रक्रिया हा या समस्येवर उत्तम पर्याय आहे. इस्त्राईल आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये 50 टक्के शेतमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतमालाची मुबलक उपलब्धता आहे. परंतु व्यवस्थापन कौशल्याअभावी त्यावर प्रक्रिया होत नाही. अशा परिस्थितीत शेतीच्या योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. परदेशात बहुतांश शेतीमाल प्रक्रिया करून पॅकिंग करून बाजारात येतो. तशी व्यवस्था आपल्या देशात अधिक प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. मुख्यत्वे वितरक, ग्राहक आणि शेतकरी ही साखळी भेदायची असेल तर देशात अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
आपापल्या भूमीत होणार्या पीक, फळ, भाजीपाला आणि अन्य उत्पादनाचा बदलत्या कालमानानुसार तसंच जगाच्या मागणीनुसार प्रक्रिया उद्योगासाठी व्यावसायिकदृष्ट्या कसा वापर करता येईल, हा विचार शेतकर्यांसाठी पूर्णपणे नवी दृष्टी देणारा आहेच; शिवाय आपणच आपल्या शक्तिस्थानांचा विचार कसा करावा याचं कृतिशील प्रशिक्षणही त्यातून मिळतं. आणखी एक विचारात घेण्याजोगी बाब म्हणजे प्रक्रिया उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. हे लक्षात घेऊन केळी, बटाट्यापासून वेफर्स बनवणार्यांपासून लहान-मोठे उद्योग जागोजागी उभारले जात आहेत. यातून अनेकांना स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण झाला आहे. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासनानंही अन्न प्रक्रिया उद्योग धोरण जाहीर केलं आहे. शेतीक्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी शेतकर्यांचं उत्पन्न दुप्पट होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत असताना त्याला अधिक गती देण्याची गरज आहे.
@@AUTHORINFO_V1@@