रेल्वेच्या गर्दीतून सुटकेसाठी मेट्रो हाच पर्याय : अश्विनी भिडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018
Total Views |
 
 

२०वे शेठ शांताराम मंगेश कुलकर्णी स्मृती व्याख्यान संपन्न

 
 

मुंबई : मुंबईतील वाढते लोंढे लक्षात घेता सध्या वाहतूककोंडीची आणि रेल्वेतील गर्दी ही सद्यस्थितीत मोठी समस्या आहे. सद्यस्थितीतील वाहतूक व्यवस्था इतका भार घेण्यासाठी सक्षम नाही. रेल्वे, बस आणि इतर वाहतुकीची साधने, रस्ते पाहता मुंबईकरांचा जीव कोंडीत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी, मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी येत्या काही वर्षांत मेट्रो सेवा कार्यान्वित होईल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला. एनकेजीएसबी को. ऑपरेटीव्ह बँकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २०व्या शेठ शांताराम मंगेश कुलकर्णी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त दादर येथील राजा शिवाजी विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बँकेचे अध्यक्ष किशोर कुळकर्णी, उपाध्यक्ष सुनील गायतोंडे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘मुंबईतील वाहतुकीचा बदलता चेहेराया विषयावर संवाद साधत मुंबईच्या पोटात सुरू असलेल्या मेट्रो कामांची माहिती अश्विनी भिडे यांनी दिली.

 

अश्विनी भिडे म्हणाल्या, “भारताची आर्थिक राजधानी मानली जाणार्या मुंबईत देशातून आणि जगभरातील विविध लोक सातत्याने आकर्षित होतात. आंतरराष्ट्रीय नकाशावर मुंबई हे महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले जाते. त्यामुळे या शहरातील वाहतूक व्यवस्था भक्कम आणि जलद राहण्याची सध्या गरज आहे. मुंबईत वाहतुकीदरम्यान होणार्या अपघातांमुळे झालेल्या मृतांची आकडेवारीही वाढत आहे, त्याहून जखमींचा आकडा आहे. वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झालेली आहे, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि प्रदूषण ही समस्या वेगळीच आहे. येत्या काही वर्षांत मेट्रो मार्गाची कामे पूर्ण होतील आणि रेल्वे, बस आणि स्वतःच्या वाहनांनी प्रवास करणार्यांसाठी एक जलद आणि किफायतशीर प्रवास मुंबईकरांना करता येईल."

 

सध्या सुरू असलेला वर्सोवाते अंधेरी (मेट्रो १) हा टप्पा आणि सद्यस्थितीत विचारात असलेला दहिसर ते वांद्रे (मेट्रो २ अ), कुलाबा ते स्पिझपर्यंत (मेट्रो ३), दहिसर ते अंधेरी (मेट्रो ७), वडाळा कासरवडवली-ठाणे (मेट्रो ४) आदी प्रकल्प यांचे एकूण २७० किमींचे जाळे विस्तारले आहे. येत्या काही वर्षांत मेट्रो वाहतूक व्यवस्था मुंबईतील प्रवास सुखकर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

मेट्रोमुळे पर्यावरणाचे रक्षणच!

 

आरे कॉलनीत मेट्रो कारशेडमुळे झाडे तोडली जाणार असल्याचे म्हटले जात असले तरीही, आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व झाडांचे पुनर्रोपण करत असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. एमएमआरसीतर्फे २५ हजार झाडांची लागवड केली असून, मेट्रो स्थानके पूर्ण झाल्यानंतरही वृक्षलागवड केली जाणार आहे. शिवाय मेट्रोमुळे रस्तेवाहतुकीवरील भार कमी होऊन प्रदूषण टळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@