भाजपचे माजी खासदार वाय.जी.महाजन यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018
Total Views |

मान्यवरांसह हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत नशिराबादला अंत्यसंकार


 


जळगाव, २९ ऑक्टोबर
रा.स्व.संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार यशवंत गिरधर महाजन तथा वाय.जी.महाजन (७७) यांचे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास अल्पकालीन आजाराने जळगावच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले. सायंकाळी त्यांच्या मूळ गावी नशिराबाद येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री आठ वाजेच्या सुमारास हजारो चाहते व विविध पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शोकाकूल अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनसगाव मार्ग परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे सुपुत्र जितेंद्र यांनी अग्निडाग दिला.
 
 
त्यांच्या पश्‍चात पत्नी प्रमिलाबाई, मुलगा जितेंद्र , सून, विवाहित कन्या सौ. लिना भोळे, जावाई, नातवंडे आहेत.
गेल्या एक दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खाजगी व नंतर काही दिवसांपासून जळगावातील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. आज २९ ऑक्टोबरला दुपारी ३ च्या सुमारास त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. ही वार्ता कानोकानी आणि व्हॉटस्अपमुळे काही क्षणात सर्वत्र पसरली आणि संघ, पूर्वाश्रमीच्या जनसंघ, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसह भोरगाव लेवा पंचायतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तसेच त्यांच्यावर प्रेम करणार्‍या हजारो चाहात्यांनी, विविध सामाजिक संस्था व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी, त्यांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
 
 
रामपेठ, शिवाजी चौक, ग्रामपंचायत कार्यालय, स्वातंत्र्यचौकमार्गे खालची अळी परिसरात पार्थिव खांद्यावर घेत सावता माळी मंदिरमार्गे त्यांच्या वडिलोपार्जित व रहिवासाच्या मूळ घरमार्गे व विठ्ठलमंदिर मार्गे होळीमैदान चौकात पुन्हा स्वर्गरथावर पार्थिव ठेवण्यात आले.
 
 
* नशिराबादच्या सातीबाजारजवळच्या वाय.जी.महाजन यांच्या दुमजली हवेलीजवळ सायंकाळी ५ वाजेपासून वर्दळ व गर्दी वाढू लागली.
 
 
* सर्व गावात शोककळा पसरली असली तरी कुठेही बंदोबस्ताची गरज जाणवत नव्हती. गावातील सर्वच चौकातील फलकांवर त्यांच्या मृत्यू व अंत्ययात्रेचे वर्तमान लिहिलेले होते.
 
 
* विशेष म्हणजे सातीबाजार परिसरातील भाजीपाल्याचा सायंकाळचा बाजार आणि गावातील सर्व मार्ग, चौकातील दुकाने व्यवस्थित सुरु होती.
 
 
* पहिल्या मोठ्या हॉलमध्ये पार्थिव ठेवण्यात आले होते. सभोवताली शोकाकूल परिवारातील महिलांचा शोक सुरु होता. लहानथोर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी घरात येत आणि पदस्पर्श करीत होते.लक्षणीय बाब म्हणजे त्यात बुरखा परिधान केलेल्या मुस्लिम माता-भगिनींचाही समावेश होता.
 
 
* ज्या रा.स्व.संघाच्या संस्कारात महाजन घडले व जीवनभर त्यानुसार जगले, त्याचे प्रतीक असलेली संघाची काळी टोपी त्यांच्या शिरावर होती.
 
 
* अंत्यदर्शन घेण्यासाठी व पुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
 
 
* अंत्ययात्रेत अग्रभागी वाद्यवृंदावर ‘ रघुपती राघव राजाराम’ हे भजन वाजवले जात होते. त्यानंतर स्थानिक विठ्ठल मंदिराची भजनी मंडळी होती.
 
 
* शेकडो युवक, नागरिक सहभागी झाले होते. मुख्य मार्ग व सावता माळी मंदिर आणि विठ्ठलमंदिर मार्गे अशा सुमारे ४ कि.मी.अंतरावरील स्मशानभूमीत अंत्ययात्रा पोहोचण्यास १ तास लागला.
 
 
* दुतर्फा माता-भगिनी, मुले यांची गर्दीे होती. वाटेत पार्थिवावर होणारा फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव आणि समयोचित घोषणा वाय.जी.महाजन यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणार्‍या आणि डोळ्याच्या कडा ओलावणार्‍या ठरत होत्या.
 
 
* खालची अळी चौकात माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, राज्याचे पर्यटन मंत्री जयपालसिंह रावल यांनी अंत्यदर्शन घेत पार्थिवावर पुप्षहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
* होळीमैदान चौकात आ.हरीभाऊ जावळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदींनी अंत्यदर्शन घेत पुष्पहार अर्पण केला. येथे तर सारा परिसर स्त्रीपुरुषांनी फुलून गेला होता.
 
 
सब कुछ वाय.जी.महाजन
नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल संस्थेचे ते विद्यार्थी, हिंदीचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष अशा सर्व भूमिकांमध्ये राहिले. तसेच जळगावच्या मॉडर्न हायस्कूल (गुळवे शाळा) संस्थेचेही ते कार्याध्यक्ष होते.
सर्व थरातील नेते-कार्यकर्ते सहभागी माजी खासदार व सरांचे जीवलग सहकारी डॉ.गुणवंतराव सरोदे, आ.सुरेश भोळे, आ.चंदूलाल पटेल, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, जळगावच्या केशव स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव, संचालक डॉ.अतुल सरोदे, दीपक अट्रावलकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, माजी महापौर ललित कोल्हे आदींसह जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, जि.प.सदस्य लालचंद पाटील, भाजपचे कार्यकर्ते डॉ.सुरेशसिंह सुर्यवंशी, प्रभाकर पवार, सुनील नारखेडे, दीपक सुर्यवंशी, उद्योजक नशिराबादचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडित चौबे, मधुकर चौबे यांच्यासह संघाचे अनेक कार्यकर्ते, तसेच नशिराबाद ग्रा.पं.चे आजीमाजी सदस्य, विविध संस्था, युवा मंडळाचे
पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
 
विविध धार्मिक विधी झाल्यावर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सजवलेल्या स्वर्गरथावर (ट्रॅक्टर ट्रॉलीवर) पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी आणि अंत्ययात्रेत उपस्थित शोकाकूल तरुण आणि त्यांच्या चाहात्यांकडून ‘अमर रहे अमर रहे, वाय.जी.महाजन अमर रहे’ , ‘जब तक सूरज, चॉंद रहेगा, वाय.जी.सर आपका नाम रहेगी’, ‘कौन चला भाई कौन चला, नशिराबाद का शेर चला’ अशा घोषणा होत होत्या. वाटेत अनेक गृहिणी व नागरिकांकडून पुष्पपाकळ्यांंची वृष्टी होत होती.
 
सुनसगाव मार्गावरील स्मशानभूमीत रात्री रात्री आठ वाजेच्या सुमारास सुपुत्र जितेंद्र यांनी अग्निडाग दिला. त्यावेळी झालेल्या शोकसभेत रा.स्व.संघाचे विभागीय कार्यवाह अविनाश नेहेते, माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे, संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापू मांडे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी वाय.जी.महाजन यांचा संघकार्यातील सहभाग, साधासरळ, जळगाव जनता बँकेचे माजी संचालक म्हणून केलेले निरलस कार्य, निगर्वी प्रेमळ स्वभाव, साधी राहाणी, प्रामाणिकपणा, राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची वृत्ती, शैक्षणिक कार्य इ. गुणसमुच्चयाचा गौरव करीत आणि त्यांना ऊर्जास्त्रोत संबोधत त्यांच्या आठवणींना हृद्य पण मोजक्या शब्दात उजाळा दिला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबईहून शोकसंदेश पाठवल्याचे सूत्रसंचालक बंडू खंडारे यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@