नाती मना-मनांची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018
Total Views |



नात्यांचा निरोगीपणा म्हणजे काय? शारीरिक निरोगीपणाचे साधेसोपे वर्णन करणे जितके सोपे नाही, तितकेच नात्यांमधील निरोगीपणाचे वर्णन करणेही सोपे नाही.

 

नात्यांची दोरी माणसांना पकडून ठेवते. त्याचे कारण त्या माणसांनी त्या दोरीला पकडून ठेवलेले असते. ही नाती माणसांच्या आरोग्याची व निरोगीपणाची सुदृढ खूण आहे. यात माणसाचा शारीरिक व मानसिक निरोगीपणा नक्की आलाच. नात्यांचा निरोगीपणा म्हणजे काय? शारीरिक निरोगीपणाचे साधेसोपे वर्णन करणे जितके सोपे नाही, तितकेच नात्यांमधील निरोगीपणाचे वर्णन करणेही सोपे नाही. जसे, आपल्याला केवळ एखादा आजार नाही म्हणून आपण आपल्याला निरोगी म्हणू शकत नाही. तसेच नात्यांमध्ये भांडणे झाली नाहीत वा क्लिष्टता आली नाही म्हणून आपली नाती सुदृढ आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आपल्या नात्यांच्या परिघात आपली मित्रमंडळी, आपले कुटुंब, आपल्या व्यवसायातील माणसं, आपले रोमॅन्टिक जीवलग आणि या सगळ्यांबरोबर आपले स्वत:चे स्वत:बरोबर असलेले नातेही अंतर्भूत आहे. अर्थात, आपले शेजारीपाजारी, परिचित मंडळी नात्यांच्या या परिघात येत असतात व जात असतात. आपल्याला नाती कशी असावीत याचा अंदाज असतो. त्यांचे महत्त्व आपण जाणतो. इतकेच काय दैनंदिन जीवनात नात्यांनी कशा प्रकारे काम करायला हवे, हेही आपण समजून घेतो. एक गोष्ट मात्र आहे की, नाती कुठल्याही प्रकारची असू शकतील; वर्षानुवर्षांची असतील, आजकालची असतील पण, ती टिकली पाहिजेत आणि फुलली पाहिजेत याबद्दल आपले सगळ्यांचे एकमत आहे. सशक्त नाती आपल्याला जगायला प्रेरणा देतात. या नात्याचं पाठबळ आपल्याला कठीण परिस्थितीतून तारून नेते. निरोगी नात्यातून मिळणारा अनुभव आपल्याला नाती कशी सक्षम करायची व त्यातून कुठली कौशल्ये मिळवायची याचे शिक्षण देतो. आपण दुसऱ्याशी संवाद कसा साधायचा, कुठल्या नात्यात काय शेयर करायचे, कुठल्या नात्याला टिकवायला अधिक परिश्रम लागतात, कुठल्या नात्यात सहजता आहे, कुठल्या नात्यात केवळ ऐहिक देवाणघेवाण आहे, यासारख्या अनेक गोष्टींचा परामर्श आपल्याला वेळोवेळी नात्यांमध्ये घेणे आवश्यक आहे.

 

नात्यांमध्ये अनेक गोष्टींचा सारासार विचार होणे आवश्यक आहे. काही व्यक्ती आपल्याला एक खूप छोटंसं कारण पाठ केल्यासारखं सांगतात ते म्हणजे, मला इतका वेळ देता आला नाही आणि हळूहळू आम्ही एकमेकांपासून दुरावत गेलो. हे खूपच मामुली आणि शुद्र कारण आहे. नात्यांच्या घडामोडींकडे पाहता आपल्याला इतका वेळ नक्की असतो. त्या मर्यादीत वेळेतही आपण ओळखू शकतो की, आपलं काय चुकतं आहे? यात त्यांच्याकडून काय बदलण्याची गरज आहे? या नात्यात मला काय बदलण्याची गरज आहे? या नात्यात मला नक्की काय मिळत नाही ? अर्थात, हा विचार नात्यांच्या एका बाजून होऊन चालत नाही तो दोन्ही बाजूने व्हावा लागतो. शिवाय नुसतीच समस्या काय आहे हे समजून चालत नाही, तर या समस्येचे उत्तर शोधून काढणेही खूप महत्त्वाचे आहे. नात्यांमध्ये हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे की, भावूक न होता नात्यातील कुठले चाक बिघडले आहे, हे लक्षात येताक्षणीच योग्य ती कृती त्वरीत करायला हवी. बऱ्याच वेळ फरफटत चाललेल्या नात्यांमध्ये समस्येचे नेमके उत्तर मिळविण्यासाठी लोकांची तयारी नसते. कधी अभिमान आड येतो, तर कधी दुखावलेले मन तयार नसते. माणूस हा असा प्राणी आहे की, जन्मापासूनच दुसऱ्याशी कनेक्ट राहायची त्याची नैसर्गिक अभिलाषा असते. एखाद्या बेटावर माणसाला लागणाऱ्या सगळ्या ऐहिक गोष्टी आपण पुरवल्या तरी, तो माणूस एकटा जगू शकणार नाही. तर अशी ही नाती आपल्या नकळत जुळतात. कधी बाप्पाने जुळवलेली असतात म्हणून आपण एखाद्या कुटुंबात जन्म घेतो, कधी परिस्थिती एकत्र आणते, कधी प्रेमाचा आविर्भाव दोन मनाची सांगड घालतो, तर कधी अकल्पित पण अटीविना माणसं एकत्र येतात. निरोगी नाती आयुष्य संपन्न करतात, हे खरे. निरोगी नात्यांमुळे आपण आपल्या मनात असलेल्या अनेक गोष्टी व अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. संपन्न नाती ही अनेक माणसांच्या यशस्वी जीवनात खूप काही देऊन जातात आणि होरपळलेल्या नात्यांमुळे कित्येकांच्या व्यक्तिगत जीवनाची राख झालेली आपण पाहतो. नात्यांचे सौंदर्य हे तसे वस्तुस्थितीशी निगडीत आहे. आज माझ्याकडे जे काही आहे तेवढेच आहे. आज जे मी काही करू शकत आहे तेवढेच या घडीला मला करण्यासारखे आहे. अशावेळी उद्या काय मिळू शकेल, या विचारात माझा ‘आता व आज’ मी का फुकट घालवू? नात्यांच्या कोंदणात या तात्त्विकतेला खूप महत्त्व आहे. जो व जसा आता आहे तसा तो क्षण प्रत्येकाला जगता आला, तर नात्यांत समाधान येईल व ती संपन्न होतील. नात्यांमध्ये क्षणाक्षणाला मिळणाऱ्या आनंदाचे व समाधानाचे आपल्याला कौतुक करता आले, अप्रूप वाटले, तर आपण आपली नाती सुखासमाधानाने जगू शकू.

 

नाती जगताना माणसं केव्हा तरी, एका कोशात काही ना काही कारणांनी एकत्र आली, एकत्र राहिली म्हणून सुखाने जगता येत नाही. एकत्र असतानासुद्धा ती माणसे एकमेकांपासून खूप दूर गेलेली असतात. एका छताखाली राहूनसुद्धा कुटुंबात एका माणसाला दुसऱ्या माणसाच्या अस्तिवाची जाण नसते. ही नाती अत्यंत रोगट नाती असतात. द्वेषाने, रागाने व चिडीने भरलेल्या वातावरणात अशी नाती एकमेकांचे लचके तोडत असतात. नाती असावी तर ती सुंदर असावीत. प्रेमाने ओथंबलेली असावीत किंवा एकमेकांबद्दलच्या आदराने परिपूर्ण असावीत. ओरबाडणाऱ्या नात्यांचे अस्तित्व बळजबरीने टिकविण्यात काय अर्थ आहे. नात्यांमधील दुविधा किंवा कॉन्फ्लीक्ट आपल्याला जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा क्षणभर थांबून आपल्याला मनातील मनात सखोल विचार करण्याची गरज आहे. कारण, हा संघर्ष आपल्या नात्यातील नसून तो आपल्या मनातील आहे. संघर्ष हा तुमच्या माझ्यातील नसून तो आपापल्या मनातील आहे. मी तुमच्याबद्दल काय विचार करते आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत आहात यातील हा संघर्ष आहे. अशा परिस्थितीत दोघांनाही बदलण्याची गरज आहे. तुम्ही तरी किंवा मी तरी असा विचार केला की मानवी नात्यांचा संघर्ष सोडवायला आपण आपले विचार बदलले पाहिजेत, त्याक्षणी हा संघर्ष संपलाच समजा. माणसाला माणूस म्हणून आनंदाने जगता येणं हा त्याचा हक्क आहे. दुसऱ्या माणसाला आनंद देता आला, तर त्याच्या जगण्याला खरा अर्थ मिळतो. नात्यांमध्ये आनंदाची ही सहजपणे देण्याघेण्याची भाषा उमजली, तर नाती खऱ्या अर्थाने सफल होतील. शिवाय नात्यांमध्ये लपवाछपवी नसली तर उत्तमच. अशा सुफल व सफल नात्यांसाठी काही गोष्टी आपण शिकायला हव्यातच.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@