… मग रक्तदान करु नका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2018   
Total Views |

 
 
रक्तपेढीच्या कामासंदर्भात येणाऱ्या फोन्सची आता सवय झाली असल्याने 'कोण बोलतंय’ हे एकदा समजलं की हा व्यक्ती 'काय बोलणार आहे’ याचाही चटकन अंदाज येऊन जातो. काही फोन मात्र गुगली बॉलसारखे असतात. बॉल नक्की कुठे पडणार आहे, याचा अंदाजच येत नाही. अशाच एका संभाषणाची ही एक झलक पहा -
 
'नमस्कार सर ! रक्तपेढीचा फोन आहे ना हा ?’ फोनवरील (पुरुषी) आवाज
 
'हो. बरोबर. बोला..!’ मी.
 
'सर, मला रक्तदान करायचं होतं.’ फोनवरचा आवाज.
 
'अरे वा ! चांगली गोष्ट आहे. कधी येताय मग ?’ माझा स्वाभाविक प्रतिसाद.
 
'पण सर, चार्जेस किती असतात ?’ या प्रश्नाने मी जरा गोंधळात. नक्की रोख न समजल्याने इकडुन माझा प्रश्न गेला,
 
'कुठल्या चार्जेसबद्दल बोलताहात आपण ? मी समजलो नाही.’
 
कदाचित थोडा आणखी धीर करुन आणि आणखी स्पष्टपणे फोनवरील या तरुणाने विचारले,
 
'नाही म्हणजे…सर, एका रक्तदानाचे किती पैसे मला मिळतील ?’
 
अच्छा म्हणजे याला हे विचारायचंय तर ! एकदा हा हेतु समजल्यानंतर मग मात्र स्पष्टपणे जे काही सांगायला हवं होतं, ते मी त्याला सांगितलंच. मी म्हणालो, 'हे पहा, रक्तदानासाठी पैसे देणं आणि घेणं हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. रक्तदान करायला हवं ते सामाजिक कर्तव्याच्या भावनेतूनच. असे रक्तदान आपण करणार असाल तर आपले नेहमीच स्वागत आहे, मात्र चार पैसे मिळावेत, हाच जर आपला रक्तदानामागील हेतु असेल तर मग मात्र आपण रक्तदान करु नका !’ मी इतके बोलल्यानंतर या तरुणाने एका शब्दानेही उत्तर न देता फोन ठेवून दिला.
 
निखळ सामाजिक भावनेतून रक्तदान किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन करणारे तरुण तर नेहमी भेटत असतातच. परंतु काही भेटी – बहुधा फोनवरच्याच – या अशाही असतात. असे फोन माझ्याबरोबरच अन्यही काही अधिकाऱ्यांनादेखील आले आहेत. फोन करणाऱ्या या लोकांची मानसिकता नक्की लक्षात येत नाही. कारण ही माणसं प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस सहसा करत नाहीत, किंबहुना 'पैसे घेऊन रक्तदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे’ असे सांगितल्यावर प्रत्यक्ष भेटणे या लोकांना अडचणीचे जात असावे. पण तरीही फोनवरीलच काही संवादांमुळे काही गोष्टींचा थोडाफार उलगडा झाला.
 
मला आठवते, आमच्या इथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असणारा आमचा मित्र संतोष अनगोळकर याला एकदा असाच एक फोन आला होता. त्यावेळी मीही समोरच होतो. फोनवरील व्यक्तीने 'पैसे किती मिळणार’ वगैरे विचारणा तर केलीच, शिवाय 'सर, मी फारच गरजू आहे हो, रक्ताव्यतिरिक्तही काही विकायचे असल्यास माझी तयारी आहे. किडनी वगैरेही द्यायलाही मी तयार आहे.’ हे ऐकल्यावर मात्र संतोषने या व्यक्तीला चांगलेच सुनावले, अर्थात या सुनावण्यात एक स्वाभाविक संवेदनाही होतीच. संतोष म्हणाला, 'भल्या माणसा, पैशांची गरज भागविण्याचा हाच एक मार्ग आहे काय ? तू रक्तदान करु शकतोस, किडनी वगैरे द्यायला तयार आहेस याचा अर्थच तू तसा धडधाकट आहेस. मग तुला कष्ट करायला कोणी रोखलंय ? भरपूर कष्ट कर. रक्तदान, अवयवदान या गोष्टी पैसे कमावण्यासाठी नाहीच आहेत मुळी. तुला खरोखरीच पैशांची गरज असेल तर अगोदर मला येऊन भेट पाहू. मी तुला आणखी चांगले मार्ग दाखवतो पैसे मिळविण्याचे. पण कृपा करुन आपल्या अवयवांचा किंवा रक्ताचा सौदा मात्र करु नकोस. आम्ही आहोत म्हणून तुला एवढं सगळं सांगतो आहोत. पण सर्वच जण असेच असतील असं नाही. काही जण तुझा गैरफायदा घेणारेही भेटु शकतील. खूप सावध रहा, कारण शरीर पुन्हा मिळणार नाही.’ फोनवरुन हे बोलत असताना संतोषलाच अस्वस्थ व्हायला झालं होतं. कारण उघड होतं. हा व्यक्ती अजूनही किती जणांना फ़ोन करेल, त्याला आणखी कोण कोण आणि काय काय सांगेल हे सांगणं कठीण होतं. म्हणून शक्य तितक्या तळमळीने संतोषने या तरुणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
 
अर्थात रक्तदानाच्या बदल्यात पैशांची अपेक्षा करणारा प्रत्येक जण गरजेपायीच तशी अपेक्षा करीत असेल असे नाही. कमीत कमी श्रमांत अधिक पैसे कसे मिळवता येतील यासाठी हल्ली अनेकजण प्रयत्नशील असतात. अशांपैकीही काहीजण यात असु शकतात. काहीही असो. या घटना तर पुण्यासारख्या शहरातल्या आहेत, म्हणजे ग्रामीण भागात किंवा तुलनेने मागास राज्यांत कदाचित याहीपेक्षा गंभीर घटना घडत असतील. कायदा झाल्यानंतर देखील हे प्रकार पूर्णत: थांबलेले नाहीत हे तर निश्चित आहे.
 
आणखी एक प्रकार रक्तदान शिबिरांत – विशेषत: काही राजकीय व्यक्तींनी आयोजित केलेल्या शिबिरांत - पहायला मिळतो. अशा शिबिरांची जाहिरातच मुळी ’प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू’ अशी केलेली असल्याने केवळ त्या आकर्षणापोटी आलेल्यांचाही एक विशिष्ट वर्ग इथे असतो. आयोजकांना रक्तदानाच्या एकूण संख्येमध्ये आणि रक्तदात्यांना भेटवस्तुंमध्ये रस असल्याने रक्तदान करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असे वैद्यकीय निकषच इथे दुय्यम होऊन जातात. ’काहीही करुन याचे (किंवा माझे) रक्त घ्याच’ असा दुराग्रह करणाऱ्या मंडळींना या वैद्यकीय बाबींशी अजिबात देणेघेणे नसते. रक्तदात्यांची संख्या भरघोस दिसली पाहिजे हा आयोजकाचा दृष्टिकोन तर 'मला भेटवस्तू मिळाली पाहिजे’ हा रक्तदात्याचा दानामागील हेतू. पण अशा (म्हणजे वैद्यकीय निकषांशी तडजोड केलेल्या) दानाचा नंतर कितपत उपयोग होणार, याची मात्र कुणालाच पर्वा नाही. अशा प्रकारच्या आयोजकांना जनकल्याण रक्तपेढी 'आम्हाला आपले शिबिर नको’ असे अत्यंत स्पष्टपणे सांगत आलेली आहे. रक्तदात्याच्या आणि रुग्णाच्याही आरोग्यासाठी रक्तदान करण्याचे वैद्यकीय निकष काटेकोरपणे पाळले गेलेच पाहिजेत असा टोकाचा आग्रह आजवर ’जनकल्याण’ने धरला आहे. मागे एकदा एका मुलींच्या महाविद्यालयात झालेल्या शिबिरात एकूण २३२ मुलींनी रक्तदानासाठी नोंदणी केली आणि वैद्यकीय निकषांनुसार त्यातील केवळ ३२ मुलीच रक्तदान करु शकल्या. 'महिलांमध्ये रक्तदानाचे प्रमाण अत्यल्प असण्याची कारणे’ हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, मात्र 'रक्तदान कुणी करायचे नाही’ याबाबतच्या धारणा मात्र ’जनकल्याण’ने पहिल्यापासून अत्यंत स्पष्ट ठेवल्या आहेत आणि त्याप्रमाणेच वेळोवेळी रक्तदात्यांना निवडले किंवा वगळलेही आहे.
 
रक्तदानाचा आणखी एक प्रकार मला रक्तपेढीत आल्यावरच समजला. एकदा एक जण रक्तपेढीत त्याच्या डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन आला. त्यात उपचारातील एक भाग म्हणून सदर व्यक्तीने रक्तदान करावे असा उल्लेख होता. काही व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप जास्त म्हणजे १८/१९ किंवा त्याहीपेक्षा अधिक असते. अशा व्यक्तींना रक्तमोक्षण करण्यास सांगितले जाते. रक्तमोक्षण म्हणजेच रक्त बाहेर काढून शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे. अशा पद्धतीने दिलेले रक्त पुढे वापरता येत नाही, ते नष्टच करावे लागते. म्हणूनच असे रक्तदान (?) रक्तपेढीत करता येत नाही. मात्र हीच प्रक्रिया उपचारांचा एक भाग म्हणून रुग्णालयात रितसर प्रवेश घेऊन रक्तपेढीच्या मदतीने करता येऊ शकते, ज्याला 'थेराप्युटिक फ्लेबॉटॉमी’ (Therapeutic Phlebotomy) असे म्हटले जाते. अर्थात रक्तपेढीच्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीस तसे सांगितले. यथावकाश एका रुग्णालयात जाऊन रक्तपेढीच्या तंत्रज्ज्ञांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतरही अशा अनेक प्रक्रिया काही रुग्णालयांमध्ये जाऊन केल्या गेल्या आहेत.
 
रक्तदानासंबंधीचे प्रबोधन हा रक्तपेढीच्या कार्यसूचीवरील महत्वाचा विषय असला तरी व्यावसायिक रक्तदान, अमिषांपोटी रक्तदान, वैद्यकीय निकषांना फाटा देऊन केले गेलेले रक्तदान यांसारखी दाने (?) मात्र त्याज्य मानली गेलेली आहेत. रक्तमोक्षणासाठी काही विशिष्ट संकेत आहेत, त्यानुसारच ते व्हायला हवे. ते रक्तदान नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्याज्य मानले गेलेले असे रक्तदान दृश्य स्वरूपाने वेगळे नसले तरी खरे रक्तदान तेच आहे, जे सामाजिक दायित्व म्हणून निरपेक्ष भावनेने केलेले असते. असे रक्तदान नियमितपणे करणाऱ्या हजारो रक्तदात्यांचे कर्तृत्व हे हिमालयाइतके मोठे आहे आणि त्यांनी केलेले रक्तदान ही हजारो रुग्णांसाठी एक प्रकारची संजीवनी आहे.
 
शेवटी संजीवनी यायला हवी ती हिमालयातूनच, अन्यथा तिचाही गुण येत नाही.
 
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@