सूर समाजमाध्यमांचा, ध्यास समाजकार्याचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018   
Total Views |


 


आधुनिक युगात व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी व्यक्तीची गरज असते का? हा प्रश्न आपणा सर्वांना कधीतरी नक्कीच पडला असेल. हा प्रश्न पडण्यामागे कारण असेल ते म्हणजे विविध समाजमाध्यमांच्या सक्रिय उपस्थितीचे. कारण त्यावरून आपण हल्ली अगदी सहज व्यक्त होत असतो. अशाच समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करून त्यांचा सूर गवसलेला एक अवलिया म्हणजे नाशिकचा प्रमोद गायकवाड. प्रमोद यांना वेदनेची जाणीव आहे. कष्टाची आस आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान आहे. त्यामुळेच त्यांनी समाजमाध्यमांचा सूर छेडत समाजकार्याचा ध्यास जोपासला आहे. त्यांच्या आधुनिक साधनांनी युक्त, समाज संघटित सामाजिक कार्याची दखल ‘केशवसृष्टी’ या संस्थेनेही घेतली आहे आणि त्यांना आज मुंबईत ‘केशवसृष्टी पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने प्रमोद गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...


मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात प्रमोद गायकवाड यांचा जन्म झाला. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील तळवाडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आईवडील हे त्यांच्या पिढीतील पहिले शिक्षित दाम्पत्य. आईवडील शिक्षित असल्याने त्यांनी सीमोल्लंघन केले. त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला होता, त्यामुळे प्रमोदही शिक्षणाचे महत्त्व जाणून होतेच. त्यामुळे त्यांनी प्रमोदसह इतर अपत्यांच्या शिक्षणाची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. त्यांना उच्चशिक्षित केले. प्रमोद गायकवाड यांनी भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली असून त्यानंतर त्यांनी ‘वित्त’ या विषयात व्यवसाय व्यवस्थापन शास्त्रातील पदवी संपादित केली आहे. तसेच अर्थशास्त्रातील पद्व्युत्तर पदवीदेखील मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमोद यांनी पुण्यात नोकरीनिमित्त स्थलांतर केले. पुणे येथे त्यांनी ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन’ या कंपनीत काही काळ नोकरीही केली. मात्र, गोदाकाठ त्यांना सातत्याने खुणावत होता आणि त्यांच्या मनातदेखील नाशिकबाबत एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे ते पुण्यातील सुव्यवस्थित नोकरी सोडून नाशिक येथे आले. नाशिकमध्ये त्यांनी ‘अल्पिक फायनन्स लि.’ या संस्थेत वित्त व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. दरम्यानच्या काळात त्यांनी ज्ञानगंगेचा प्रवाह अविरत प्रवाही राहावा यासाठी आणि आपली थोरलेपणाची जबाबदारी ओळखून लहान भाऊ निलेश यालादेखील नाशिकला आणले. मात्र, ध्येयवेडे कोणत्याही बंधनात अडकत नसतात. त्यांना गरुडभरारी कायम खुणावत असते. त्याचप्रमाणे प्रमोद व निलेश या दोन्ही बंधूंना नोकरीत अजिबात रस नव्हता. त्यावेळी भारतात संगणकाच्या रुपाने माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारित होत होते. प्रत्येक नवीन गोष्ट ही कायम महागच असते. तशीच काहीशी अवस्था संगणक शिक्षणाची. संगणक शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते. स्वत: शिक्षणासाठी खस्ता खालेल्या असल्याने, आईवडिलांकडून सरस्वतीच्या उपासनेचे संस्कार झालेले असल्याकारणाने गरिबांना हे शिक्षण कसे घेता येईल? या विचाराने त्यांना अस्वस्थ केले होते. सर्वसामान्यांना परवडेल असे संगणक शिक्षण देता यावे, यासाठी त्यांनी १९९८ मध्ये नाशिक येथे ‘सिलिकॉन व्हॅली’ची मुहूर्तमेढ रोवली. समजेल असे, परवडेल असे आणि जागतिक मागणीचा पुरवठा करेल असे शिक्षण येथे मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढणे हे क्रमप्राप्तच होते. या संस्थेत आंतराष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षा जसे की, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘सिस्को’, ‘लिनक्स’ या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. त्यामुळे ‘सिलिकॉन व्हॅली’च्या अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या संस्थेचा कार्यविस्तार आजमितीस नाशिकसह, मुंबई, पुणे, ठाणे, जळगाव येथे पसरलेला आहे.

 

प्रमोद हे स्वत: ग्रामीण भागातील असल्याने त्यांना तेथील सामाजिक व्यवस्थेची आणि सामाजिक आर्थिक स्तरांची नेमकी जाणीव होती. ग्रामीण भागातील जनतेला संधी न मिळाल्याने ती जनता मागे राहिली आहे, असे प्रमोद निक्षून सांगतात. ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये अनेकांना पैशांची अडचण भासत असे. त्यावर प्रमोद यांनी कालस्थितीपरत्वे योग्य तो मार्ग काढला. ग्रामीण भागात आरोग्य व शिक्षण यांची हेळसांड होते याची प्रमोद यांना जाणीव होती. ग्रामीण भागातील मुलांची इच्छाशक्ती असते, मात्र त्यांना संधी मिळत नाही, हे प्रमोद यांनी जवळून पाहिले होते. तसेच या परिस्थितीवर तोडगा म्हणून सगळेच प्रयत्न सरकार करू शकणार नाही, हा विवेकी विचारदेखील त्यांच्या मनात येत होता. केवळ सरकारी यंत्रणेला दोष देऊन परिस्थिती बदलणार नाही, तर ती बदलण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा, हा विचार प्रमोद यांनी केला. शहरात राहूनसुद्धा प्रमोद यांना ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांची दाहकता जाणवत होती. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी २००५ पासून प्रमोद यांनी वनवासी भागात जाण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी विविध कार्यक्रम घेण्यास प्रारंभ केला. त्यात अत्यंत प्राथमिक पातळीवरची पण, वनवासी जनतेसाठी अत्यंत आवश्यक अशी शिबिरे ज्यात व्यक्तिमत्व विकास शिबीर, इंग्रजी संभाषणे, संगणकाचे प्राथमिक शिक्षण अशा उपक्रमांचा समावेश त्यांनी केला. हेतू एवढाच होता की, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत ज्ञानप्रवाहापासून वनवासी बांधव वंचित राहायला नको. किमान त्यांना माहिती तंत्रज्ञानाची तोंड ओळख व्हावी. वनवासी क्षेत्रात भ्रमंती करत असताना, तेथील समाजजीवन अधिक नजीकतेने प्रमोद यांनी न्याहाळले. शहरी आणि ग्रामीण भागात साजरे होणारे सण-उत्सव यापासून ही वनवासी रयत कोसो मैल दूर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपल्या घरात दिवाळीला असणारा तेजोमय प्रकाश हा त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करू शकत नाही, हे ही जाणवले. पण, त्यांना ‘आम्ही तुमचे आहोत, तुम्ही एकटे नाही,’ ही आपुलकीची साथ आपण देऊ शकतो, हे प्रमोद यांनी जाणले. याच जाणीवेतून त्यांनी वनवासी भागात दिवाळीफराळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. प्रमोद गायकवाड आपला माणूस आहे, याची जाणीव वनवासी जनतेला होऊ लागली. त्यामुळे त्यांच्या व्यक्त होण्यातून तेथील अधिक समस्या प्रमोद यांना प्रकर्षाने जाणवू लागल्या.

 

समस्यांचा डोंगर पार करून या वनवासी भागात नवचैतन्य फुलवायचे असेल, येथील ओढे, धबधबे याप्रमाणे येथील जनतेचे जीवन आनंदाने प्रवाही करायचे असेल, तर त्याला आपण एकट्याने प्रयत्न करून चालणार नाहीत, याची कल्पना प्रमोद यांना आली. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, हे प्रमोद यांनी जाणले. मग तो कसा प्राप्त होणार, याचा विचार प्रमोद यांनी सुरु केला. त्यातच २००७-२००८ मध्ये समाजमाध्यमांचा उदय होण्यास सुरुवात झाली. प्रमोद हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांना हा नवअविष्कार भावला. मात्र, सुरुवातीच्या काळात केवळ धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे लेखन त्यावर सातत्याने प्रसिद्ध होते आहे, असे त्यांना दिसून आले. सामाजिक माध्यमांचा वापर संवादासाठी होणे अपेक्षित असताना तो विसंवादासाठीच होतो आहे का? असा प्रश्न प्रमोद यांना भेडसावू लागला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात समाजमाध्यमांकडे ते नकारात्मक भूमिकेतून पाहू लागले. फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट यांचा वापर त्यांनी केवळ मित्रपरिवार, कुटुंब अशा वैयक्तिक पातळीपुरता मर्यादित ठेवला. त्यांनी स्वत:ला समाजमाध्यमांपासून दूर ठेवले. सरतेशेवटी ते २००९ मध्ये समाजमाध्यमांपासून फार दूर गेलेअशातच प्रमोद यांच्या वाचनात २०१० मध्ये एक बातमी आली. ती म्हणजे, ‘अमेरिकेत राष्ट्रध्यक्षांच्या निवडणुकीत बराक ओबामा विजयी होण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा’ अशा आशयाची ती बातमी होती. या एका बातमीवरून प्रमोद यांनी चिंतनास सुरुवात केली. त्यांना जाणवले की, समाजमाध्यमे वाईट नाहीत, तर त्याचा वापर आपण कसा करतो यावर त्याची उपयोगिता अवलंबून आहे. या विचारमंथनानंतर प्रमोद पुन्हा समाजमाध्यमांवर सक्रीय झाले आणि त्यांनी त्यासाठी स्वत:ची दिशा निश्चित केली. प्रमोद हे सामाजिक कार्य आधीपासून करत होतेच. तेव्हा त्यातील अनुभव, जाणविणाऱ्या समस्या, भविष्यकालीन नियोजन, कार्याची दिशा असे विविधांगी लेखन त्यांनी फेसबुकवर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहोचू लागले. त्यामुळे त्या मजकुरांवर व्यक्त होताना प्रत्येकात दडलेला ‘सामाजिक माणूस’ या सत्कार्यात कार्ययोगदान देण्यासाठी पुढे येऊ लागला. प्रत्येकाला या निमित्ताने व्यासपीठ मिळू लागले. या माध्यमातून अनेक लोक प्रमोद यांच्याशी स्वत:हून जोडले गेले. त्यातूनच एक संघ तयार झाला. विविध क्षेत्रांतील लोकांचा यात सहभाग वाढला. तरुणाईला या सगळ्या कार्यांचे आकर्षण वाटू लागले आणि वनवासी भागातील सामाजिक कार्यांसाठी युवाशक्तीची ऊर्जा प्राप्त होऊ लागली. यातूनच या कामाला एक मोठे स्वरूप प्राप्त होण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, ही सगळी कामे २०१४ पर्यंत कोणत्याही निधीशिवाय प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या चमूने आनंदाने केली.
 

मध्यंतरी पाक सैन्याने भारताच्या दोन जवानांचे शीर कापल्याची घटना घडली होती. यावेळी समाजमाध्यमांवर अनेक क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या. पण, त्याला कृतिशीलतेची जोड नव्हती. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? असा प्रश्न प्रमोद यांच्या संवेदनशील मनाला सतावू लागला. त्यावर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भाष्य केले आणि आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यावर त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला. मात्र, आर्थिक मदतीसाठी कोणतेही संस्थेचे म्हणून अधिकृत बँक खाते अस्तित्वात नव्हते. म्हणून प्रमोद यांनी दात्यांना पूर्ण कल्पना देऊन सुमारे दीड लाख रुपये जमा केले व ते या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना प्रदान केले. प्रमोद आणि त्यांच्या चमूचा हा पहिलाच निधीआधारित उपक्रम होता. या घटनेनंतर प्रमोद यांना अधिकृत, नोंदणीकृत संस्थेची निकड जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी दि. १५ डिसेंबर, २०१४ रोजी ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला. २०१४ ते २०१८ या कालावधीत त्यांनी सुमारे ११ हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत केली आहे. २०१५ साली दुष्काळामुळे मराठवाडा होरपळून निघाला होता. यावेळी या भागातील गावांना मदत करण्याचे ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ने ठरविले. तेव्हा त्यांना बीड जिल्ह्यातील राजपिंप्री या गावात पाण्याची समस्या असल्याचे समजले. तेव्हा त्यांनी ही समस्या दूर करण्याबाबत गावकऱ्यांसोबत चर्चा केली असता, त्यांनी पाण्याच्या टाकीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना पाण्याची टाकी बसवून देण्यात आली. त्यामुळे गावातील विहिरींवरील पाण्यावरून होणारे तंटेदेखील दूर झाले. सन २०१६ मध्ये नाशिक परिसरातील गावांवर प्रमोद यांच्या संस्थेने लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर व हरसूल या वनवासी क्षेत्रांत पुनश्च भ्रमंती करण्यास सुरुवात केली. तेथे पाण्याची समस्या विदारक असल्याचे त्यांना जाणवले. तेथील वनवासी महिला, लहान मुले यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, याचे वास्तववादी दृश्य त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा तिथे जलसंधारण प्रकल्प करावा, असे त्यांनी ठरविले. मात्र, प्रमोद यांच्या चमूतील काही तज्ज्ञ सदस्यांनी तिथे खडकाळ भूपृष्ठामुळे जलसंधारण करणे शक्य नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच, अशा टणक भूपृष्ठामुळे तेथील धरणांचा फायदा वनवासी बांधवांना होत नाही हेही त्यांच्या लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून जलस्रोत ते उभारलेली पाण्याची टाकी अशी जलवाहिनी टाकण्यात आली. या सर्व कामासाठी प्रमोद व त्यांच्या चमूने केवळ १० ते १५ दिवसांत समाजमाध्यमांच्या माध्यमातून निधी गोळा केला. सत्कार्याची ओढ आणि ते निभावण्याची इच्छाशक्ती असली की, कोणतीही वाट अवघड नसते. खडतर वाट असली तरी ध्येयासक्ती त्या वाटेला सुरळीत बनवते, हेच प्रमोद गायकवाड यांच्या कार्यावरून जाणवते. समाजमाध्यमांबाबत असणारी विविधांगी मते जरी सन्माननीय असली तरी, त्याचा वापर आपल्या हातात आहे, हेच प्रमोद यांच्या कार्यशैलीमुळे जाणवते. त्यांच्या त्र्यंबकेश्वर व हरसूल येथील कार्याबद्दल त्यांना ‘केशवसृष्टी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी अनंत शुभेच्छा!

 

काय आहे एसएनएफ पार्टनर’?

 

प्रमोद हे आपल्या कार्य ‘एसएनएफ पॅटर्न’ अर्थात, ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ या पॅटर्नच्या माध्यमातून करत आहे. यानुसार गावात कोणती शासकीय योजना राबविली गेली आहे, हे पाहिले जाते. मग त्यात अपयश का आले, याची कारणे शोधली जातात आणि त्यानंतर चमूतील तज्ज्ञ त्यावर उपाय शोधून समस्या निवारण करतात. हे सर्व केवळ तीन-चार लाख रुपयांत केले जाते. सर्व निधी लोकसहभागातून गोळा होतो आणि गावासाठीच्या कार्यात गावकरी श्रमदान करतात. कोणालाही मजुरी अदा केली जात नाही.

 

कुटुंबीयांची मोलाची साथ

 

प्रमोद हे शनिवार व रविवार या दोन दिवशी क्षेत्रभेटीद्वारे सामाजिक कार्य करतात. इतर वेळी दिवसातील दोन-तीन तास ते समाजमाध्यमांवर व्यतीत करतात. कुटुंबाचा हक्काचा वेळ ते समाजकार्यासाठी देत आहेत. याबद्दल त्यांना त्यांच्या कुटुंबाची उत्तम साथ मिळते. पत्नी प्रियांका, वडील गोपाळराव, आई रजनी यांची साथ प्रमोद यांच्यासाठी मोलाची आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@