कोस्टल रोडवर ३.४५ किमी लांबीचे २ बोगदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत गिरगाव चौपाटी व मलबार हिलच्या खालून अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून प्रत्येकी ३.४५ किमी लांबीचे दोन बोगदे उभारण्यात येणार असून, तेथील हवा खेळती राहवी यासाठी स्कार्डो नोझल ही अत्याधुनिक यंत्रणा या बोगद्यांच्या मुखांजवळ बसविली जाणार आहे. अग्निशमन व्यवस्थेसाठी या यंत्रणेची मोठी मदत होणार असून अग्निशमनासाठी जागोजागी फवारेही बसविण्यात येणार असल्याची माहिती, मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली.
 

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यांची माहिती देताना माचिवाल यांनी सांगितले की, “श्यामलदास गांधी उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी-वांद्रे सागरी सेतु) वरळी बाजूपर्यंत बांधण्यात येणाऱ्या ९.९८ किमी लांबीच्या सागरी किनारा रस्त्यांतर्गत बांधण्यात येणाऱ्या बोगद्याची लांबी जरी ३.४५ किमी असली तरी, रस्त्यावरील सुलभ वाहतुकीसाठी हा बोगदा जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे बांधण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रत्यक्षात ३.४५ किमी अंतराचे दोन बोगदे शेजारी-शेजारी उभारले जाणार आहेत. सागरी किनारा रस्त्यांतर्गत बांधण्यात येणारे दोन्ही बोगदे हे गिरगाव चौपाटीच्या व मलबार हिलच्या खालून प्रियदर्शनी पार्कपर्यंत जाणार आहेत. एखाद्या समुद्र किनाऱ्यालगत बांधण्यात येणारे हे याप्रकारचे देशातील पहिलेच बोगदे असणार आहेतटनेल बोअरिंग मशीनद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात येणारे हे बोगदे भूकंपरोधक असणार आहेत. तसेच बोगदा व त्यातील भिंती या अतिउच्च तापमानाला सहन करू शकतील अशा बांधल्या जाणार आहेत. ज्यामुळे वाहनाला आग लागण्यासारखी घटना घडल्यास तेवढे तापमान बोगदा व त्यातील भिंती सहन करू शकतील. तसेच बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर’देखील असतील. या बोगद्यांचे आयुर्मान हे १२० वर्षांचे असणार आहे.

 

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शेजारी-शेजारी असणाऱ्या दोन्ही बोगद्यांपैकी एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात सहजपणे जाता यावे, यासाठी दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकूण तेरा १३ ‘छेद-बोगदे’ तयार करण्यात येणार आहेत. हे छेद-बोगदे केवळ आपत्कालीन परिस्थिती दरम्यान उपयोगात आणले जातील. या १३ छेद-बोगद्यांपैकी सात छेद-बोगदे हे वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी, तर उर्वरित सहा बोगदे हे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी असणार आहेत. ‘स्कार्डो नोझल’ या अत्याधुनिक यंत्रणेंतर्गत दोन्ही बोगद्यांच्या दोन्ही मुखांजवळ वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे बसविण्यात येणार असून त्यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यास मदत होणार आहे. एखाद्या गाडीला आग लागल्यास त्यातून उत्पन्न होणारा धूरदेखील या यंत्रणेद्वारे अत्यंत वेगाने बाहेर खेचला जाईल. ज्यामुळे धूर बोगद्यात साठणार नाही व आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करणे सुलभ होईल. अशा प्रकारची यंत्रणा भारतात प्रथमच या प्रकल्पात वापरली जाणार आहेआगीची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यांमध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत राहणार आहे. या बोगद्यांमध्ये पुरेशा प्रमाणात उजेड असावा, यासाठी जागोजागी विद्युत दिव्यांची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहनचालकांना बोगद्यातील भिंतींचा निश्चित अंदाज यावा, यासाठी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बोगद्यातील भिंतींमध्ये सुरक्षा दिवेदेखील बसविले जाणार आहेत. तसेच या बोगद्यांमध्ये जागोजागी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@