राम मंदिर उभारल्यास देशात सद्भावना आणि एकात्मता : अरुणकुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |
 
 

भाईंदर :राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारल्यास देशात सद्भावना आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी केले. उत्तन येथील केशवसृष्टी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याच्या पूर्वसंध्येला अरुणकुमार पत्रकारांशी संवाद साधत होते. दि. ३० ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरुणकुमार, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख नरेंद्र ठाकूर आणि कोकण प्रांत प्रचारप्रमुख अजय मुडपे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. या बैठकीत या मुद्द्यावरदेखील चर्चा होऊ शकते,” असे अरुणकुमार यावेळी म्हणाले. उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही सध्या असलेली जागा ही रामजन्मभूमी असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. ”या ठिकाणी राम मंदिर उभारले जावे, ही रा. स्व. संघाची भूमिका आहे. या ठिकाणी मंदिर उभारल्यास देशात सद्भावना आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल. तसेच या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी भूमी मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, भूमी मिळण्यास काही अडचणी येत असतील तर केंद्र सरकारने कायदा करून त्या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी जागा द्यावी. राम मंदिरासाठी जे आंदोलन सुरू आहे, त्याला रा. स्व. संघाने समर्थन दिले आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. उच्च न्यायालयाच्या तीनही न्यायाधीशांनी त्या ठिकाणी श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर तेथे राम मंदिर असल्याचेही पुरावे प्राप्त झाले होते. राम मंदिर उभारले जावे, ही संघाचीही भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीबाबतही माहिती दिली.

 

कार्यकारी मंडळाच्या बैठकीबाबत.. ३१ ऑक्टोबर रोजी रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य हे बैठकीबाबत चर्चा करतील. तसेच यानंतर २ नोव्हेंबर रोजी रा. स्व. संघाची अधिकृत भूमिका मांडली जाईल. संघाच्या ११ क्षेत्र आणि ४३ प्रांतांचे संघचालक, कार्यवाह आणि प्रचारक बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे अरुणकुमार म्हणाले. या बैठकीत अनेक योजनांची समिक्षा, अनुभवांचे आदानप्रदान, देशातील अनेक घटनांवर चर्चा आणि संघाच्या पुढील कार्यक्रमांवरही चर्चा करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त देशातील संबंध, संपर्क अशा बाबींवरही चर्चा करण्यात येणार आहे. संघाच्या आंतरिक बाबींवर ही बैठक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@