आनंदवन भुवनी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |



गेली काही वर्षे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घडणारे राजकारण, मानापमानाचे प्रसंग, वशिलेबाजीची बजबजपुरी, निवडून येणारी प्रभावहीन माणसे यामुळेच साहित्य संमेलन चर्चेच्या केंद्रस्थानी राहात होते. गेल्या काही काळात तर यांचे एक तरी पुस्तक कुणी वाचले आहे का? असा प्रश्न पडावा, अशी मंडळी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पाहायला मिळाली.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणाताई ढेरे यांची निवड जाहीर झाली. साहित्य संमेलनाला जी काही साहित्यिक परंपरा आहे, त्याला अनुसरून एका योग्य अशा व्यक्तीची निवड झाल्याचा आनंद महाराष्ट्रभर पसरला आहे. गेली काही वर्षे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घडणारे राजकारण, मानापमानाचे प्रसंग, वशिलेबाजीची बजबजपुरी, निवडून येणारी प्रभावहीन माणसे यामुळेच साहित्य संमेलन चर्चेच्या केंद्रस्थानी राहात होते. गेल्या काही काळात तर यांचे एक तरी पुस्तक कुणी वाचले आहे का? असा प्रश्न पडावा, अशी मंडळी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पाहायला मिळाली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूकच या ऱ्हासाला कारणीभूत ठरली होती. निवडणुकीचा हा सगळा प्रकार उत्तरोत्तर काळात इतका किळसवाणा झाला की, साहित्य क्षेत्रातही राजकारणाचा वास यायला लागला. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने अशाच प्रकारे आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून लोकांना आवाहन केल्याची चर्चाही याच पार्श्वभूमीवर रंगली होती. आता अशा प्रकारे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होता येत असेल तर मग जे जे करावे लागेल ते ते करताना ही मंडळी दिसत होती. एकंदरीतच साहित्यप्रेमींना उबग यावा, किळस वाटावा अशा गोष्टी घडताना दिसत होत्या.

 

अरुणा ढेरेंच्या निवडीमुळे साहित्यातून प्रसविणाऱ्या मूल्यप्रक्रियेमध्ये पुन्हा विश्वास प्रस्थापित व्हावा, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. निवडणुका टाळल्याने राजकारण करून त्या जिंकणाऱ्या मंडळींना चाप बसला आणि डॉ. अरुणा ढेरेंचे नाव पुढे आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सर्वच घटक संस्थांनी अरुणा ढेरेंचे नाव एकमुखाने सुचविले आणि त्यातून अरुणाताईंची निवड झाली. वस्तुत: साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत उतरायचे नाही, अशी अरुणा ढेरेंची भूमिका. मात्र, निवडच इतक्या निकोप पद्धतीने झाल्यामुळे त्यांनाही अध्यक्षपद नाकारता आले नाही. साहित्यातील राजकारणाचा त्यांनी सुरुवातीपासून तिटकाराच केला. महिलांची प्रतिनिधी म्हणून त्यांनी हा सन्मान स्वीकारला. कर्तृत्ववान भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारे ‘त्यांची झेप, त्यांचे अवकाश’ हे पुस्तक याच भावविश्वाचा एक भाग मानावा लागेल. भारतीय परंपरांमध्ये सगळे काही भूषणावह नाही तसेच सगळे काही टाकाऊही नाही, असे त्या ठामपणे म्हणतात. विवेकाचा धागा धरून अशाप्रकारे अभिव्यक्त होणाऱ्या अरुणा ढेरेंसमोर आता अनेक आव्हाने आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना ती पेलावीच लागतील.

 

आपल्या एक वर्षाच्या कारकिर्दीत त्या काय काय करतील, हा प्रश्नच असेल. मात्र साहित्य संमेलनाने गेल्या काही वर्षांत गमावलेली प्रतिभेची झळाळी संमेलनाला पुन्हा मिळवून देण्याचे कार्य त्यांना करावे लागेल. आपल्या प्रतिभेच्या आधारावर त्या ते नक्कीच करतील, यात शंका नाही. कवितांपासून संहितालेखनापर्यंतचे सगळे साहित्यप्रकार अरुणा ढेरेंनी ताकदीने हाताळले आहेत. काव्यवाचन, गद्याचेच नव्हे तर पद्याचेही सादरीकरण अनुभवण्याची संधी लोकांना यापूर्वीही मिळाली आहे. त्यांच्या लिखाणात सृजनाचे लालित्य तर आहेच पण त्याला संशोधनाची पक्की बैठकही आहे. राजकीय टिप्पण्या करून वायफळ चर्चांत राहण्याचे काम त्यांनी कधीही केलेले नाही. आपल्या मतावर ठाम राहणारी ही विदुषी साहित्यसंमेलनाला अध्यक्षपदी लाभल्याने मराठी जनांचा साहित्य संमेलनांसारख्या उपक्रमांवरचा विश्वास दृढ होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@