कॉंग्रेस सरकारच्या जुलमाविरुद्ध लढल्याचा अजूनही अभिमान... धरणगावच्या संघ-जनसंघ परिवारातील निष्ठावंत कार्यकर्ते विश्‍वमोहन तिवारी : एकत्र परिवारामुळे घरची चिंता नव्हती..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |
 
 
 
कॉंग्रेस सरकारच्या जुलमाविरुद्ध लढल्याचा अजूनही अभिमान...
 
धरणगावच्या संघ-जनसंघ परिवारातील निष्ठावंत कार्यकर्ते विश्‍वमोहन तिवारी : एकत्र परिवारामुळे घरची चिंता नव्हती...
 
धरणगाव, २७ ऑक्टोबर
‘सत्तातुराणाम् न भयम् न लज्जा’ या वचनाची आठवण करुन देणारी २५ जून १९७५ ला घोषित आणीबाणी म्हणजे लोकशाही आणि राज्यघटनादत्त सप्तस्वातंत्र्याची जणू क्रूर हत्त्याच...देशाच्या आणि जगाच्या इतिहासातला लोकशाही आणि जीवनमूल्यांचा मोठा संकोच करीत देशाचा तुरुंग करण्यात आला होता. या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधासाठी सर्वपक्षीय हजारो कार्यकर्त्यांनी निदर्शने व सत्याग्रहसुद्धा केला होता. त्यात धरणगाव शहरातील संघ व जनसंघाचे निष्ठावंत, झुंजार कार्यकर्ते विश्‍वमोहन रघुवीरप्रसाद तिवारी हेही होते.
 
 
त्यांच्या स्थानबध्दतेच्या काळात त्यांच्या एकत्र परिवाराने खूप काही सोसले. पण राज्यघटनेने बहाल केलेल्या सप्तस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, दडपशाहीविरुद्ध सर्वसामान्य जनतेतर्फे उठवलेल्या आवाजामुळे पत्करलेल्या कारावासाचा त्यांना आजही अभिमान आहे. त्यांचा रहिवास धरणगावच्या महाराणा प्रताप मार्गावरील पुरभे गल्लीत आहे.
त्यांचा जन्म धरणगावचा... १८ ऑगस्ट १९३५ चा. त्या काळी ११ वी शिकलेल्या विश्‍वमोहनजी यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे. दिलखुलास व विनोदी स्वभाव, त्यांची इंग्रजीवर सुंदर हुकूमत राहिली आहे. काही काळ ते नगरसेवक आणि तत्कालीन भारतीय जनसंघाचे शहर अध्यक्ष होते. पक्षाच्या देशव्यापी आंदोलनातही ते पु.शं.येवले आदींसह थेट दिल्लीला जात. अनेकविध आंदोलनात त्यांचा आक्रमक सहभाग असायचा.
त्यांच्या तेव्हाच्या ३ भावंडांच्या २८ जणांच्या एकत्र कुटुंबातील ते सर्वात मोठे आणि कर्ते. तर दुसरे बंधू स्व.विजयमोहन तिवारी आणि तिसरे बंधू डॉ. वृजेशमोहन तथा व्ही.आर.तिवारी. या परिवाराचे चरितार्थाचे मुख्य साधन शेती. ती धरणगाव, साखरे आणि पातोंडा ता.अमळनेर या ३ शिवारात होती.
 
 
डॉ. वृजेशमोहन हे तर १९९६ ते २००२ पर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत. धरणगावातील सर्वाधिक मोठ्या व नामवंत शिक्षण संस्थेचे, १९८३ मध्ये स्थापित विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच धरणगाव सहकारी बँकेचे १९८२ ते १९९९ या कालावधीत अध्यक्ष राहिले आहेत. सध्या त्यांनी वैद्यकीय सेवेला प्राधान्य दिले आहे.
असा हा पूर्ण परिवार निष्ठावंत आणि समाज व पक्षकार्याला समर्पित. विश्‍वमोहन यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी उमादेवी या ८-१० वर्षापूर्वीच दिवंगत झालेल्या आहेत. सुुपुत्र परेश (नाशिक) हे संरक्षण खात्याच्या लेखा विभागातून निवृत्त, मुकेश हे धरणगावलाच असून शेती पाहतात तर धाकटे कमलेश तिवारी... हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक राहिलेले. तिवारी यांची २३ जानेवारी ७७ ला सुटका झाली. नाशिकहून रेल्वेने जळगावला आणि तेथून एस.टी.बसने धरणगावला घरी आले तेव्हा अभूतपूर्व मिरवणुकीने जल्लोषात स्वागत झाले.
गेले दिवस परत येणार नाहीत, हे खरे पण जे काही सोसले, ते कशासाठी? याचा विचार केला तर त्यांना स्थानबद्ध राहिल्याच्या त्या दिवसाचा अभिमान वाटतो...
दिग्गज नेत्यांचे प्रेम लाभले...
विनोदी स्वभावाच्या विश्‍वमोहन तिवारी यांना घरात, परिवारात ‘दादा’ संबोधले जाते. कारागृहात गिरीश बापट (आता मंत्री) या तेव्हाच्या पंचविशीतल्या कार्यकर्त्याबरोबर रिंगटेनिस रंगे...तेव्हा दादा त्यांच्या टपलीवर हळूवार मारत म्हणायचे...‘अरे तू इथे इतक्या लवकर कसा?...७०-८० च्या जनसंघाच्या प्रतिकूल काळात ते नगरसेवक होते, त्या काळात धरणगावला जनसंघाचे किकाभाई बोहरी यांना नगराध्यक्ष बनविण्याचे श्रेय जाते ते तिवारींना. ज्येष्ठ नेते उत्तमराव पाटील यांचा त्यांच्यावर मोठा लोभ. ते धरणगावला आले की हमखास भेटत, घरी येत...,त्यांच्या हस्ते हनुमाननगराची मुहूर्तमेढ झाली. साकरे येथे ७८-७९ मध्ये डॉ.आंबेडकर यांचा पुतळाही बसवण्यात आला. तो तिवारी यांच्या पुढाकारामुळे...गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन हे दिग्गज नेतेही घरी येत...
 
विधानसभेची उमेदवारी नाकारली..
१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात कॉंग्रेसचा सफाया झाला...महाराष्ट्रात पुढे विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली. माजी केंद्रीय मंत्री आणि आणीबाणीसह इंदिराजींना रोखठोक विरोध करीत कारावास पत्करणारे मोहन धारिया यांनी त्यांना पत्र पाठवत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरवल्याचे कळवले होते. पण घराची जबाबदारी लक्षात तिवारींनी ते टाळले.
 
‘ पारदर्शी, निर्मोही नेतृत्त्व ’
संघ, जनसंघाच्या कित्येक कार्यकर्त्यांच्या त्याग, मेहनतीने भाजपला आजचे चौफेर यश दिसते आहे. पक्षाने जनहिताशी प्रतारणा न करता समाज व देशहिताला प्राधान्य द्यावे...मोदी यांच्या रुपाने देशाला निर्मोही,राष्ट्रभक्त नेता मिळाला आहे, सर्वानी त्यांना कायम साथ द्यावी, असे तिवारी यांचे निक्षून सांगणे आहे.
 
घराची आठवण यायची, पॅरोल मिळत असूनही घेतलाच नाही...
विश्‍वमोहनजींना धरणगावला अटक करण्यात आली. नंतर पारोळा येथे नेण्यात आले, तेथून त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. ते एवढे निग्रही आणि विचाराने ठाम होते की, परिवारातील सदस्यांना भेटण्याची अनुमती असूनही त्यांनी पॅरोल (कारागृहातून मिळणारी सुटी) घेतली नाही. पूर्ण १८ महिने ते कारागृहात राहिले. दर पंधरपत्रव्यवहाराने घरचे क्षेमकुशल कळायचे... तेथे संघशाखा, वाचनात ते व्यस्त असत. तत्कालीन जनसंघ कार्यकर्ते ( सध्या राज्य सरकारमध्ये अन्न व पुरवठामंत्री) गिरीश बापटांसोबत ते रिंगटेनिस खेळत. सोबत होते धरणगावातील बंधुतुल्य कार्यकर्ते गोपीचंद पेंढारे, प्रा.रमेश महाजन, ध्रुवसिंह बयस, पु.शं.येवले, रघुनाथ येवले, ताराचंद कोठारी आदी सोबत होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@