वृक्षपूजा भाग ६- आंबा, आवळा, कदंब, पळस आणि रुद्राक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018   
Total Views |



आंबा, कदंब, पळस आणि रुद्राक्ष हे वृक्ष भारतात वेदकाळापासून पूज्य ठरत आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या पूजनीयतेबद्दल...


आंबा

 

‘आंबा’ म्हणजे हापूसची कलमं नव्हेत, तर भारतीय जंगली (रायवळ) आंबा. भारतात आंब्याच्या सुमारे २०० पारंपरिक जाती आहेत. भारतीय वाङ्मयात आम्रवृक्षाला आणि त्याच्या मंजिरीला महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. कालिदासाच्या निसर्गवर्णनात वसंतागमनसूचक तांबूस, हिरव्या आणि पांढुरक्या आम्रमंजिरीचं वर्णन आढळतं. बृहदारण्यकोपनिषदात आम्रफळाचा उल्लेख आहे. ज्याप्रमाणे पिकलेला आंबा झाडापासून गळतो. त्याप्रमाणे पुरुष देहापासून मुक्त होतो, असं त्यात म्हटलं आहे. याशिवाय रामायण, महाभारत, पतंजलीचे महाभाष्य, पाणिनीचे अष्टाध्यायी, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता इत्यादी प्राचीन ग्रंथांत आम्रवृक्षाचा आणि आम्रफलाचा उल्लेख वारंवार येतो. आंब्याच्या रसापासून सूर बनवीत, असं कौटिल्यीय अर्थशास्त्रात सांगितलं आहे. भू-सीमा दाखवण्यासाठी आंब्याची झाडं लावण्याची पद्धत होती, असं बृहत्संहितेवरून कळतं. द्रविड भाषांतील अनेक ग्रंथांत आम्रवृक्षाची माहिती मिळते. भारतीय संस्कृतीत आम्रवृक्ष हा मंगलकारक मानलेला आहे. कोणताही धार्मिक विधी आंब्याच्या पानावाचून करीत नाहीत. माघ शु. द्वितीयेच्या दिवशी चंद्राला आणि शिवरात्रीच्या दिवशी शंकराला आम्रमंजिरी अर्पण करतात. लग्नानंतर वधू-वरांनी आम्रवृक्ष शिंपण्याची चाल महाराष्ट्रात आहे. दशहार व्रतात व वटपौर्णिमेला स्त्रिया आंब्याची वाणे देतात. परधान वनवासींपैकी मारकम या टोळीचे आंबा हे दैवत आहे. गदबा आणि बोडो वनवासी जमातीत अंत्यसंस्कार करून घरी परतण्यापूर्वी आंब्याची साल ओलांडण्याची पद्धत आहे. आंबा हा प्रजोत्पादक मानलेला असल्याने लग्नविधीत त्याला महत्त्वाचं स्थान आहे. निर्णयसिंधुमध्ये ‘आम्रपुष्पभक्षण’ नामक एक विधी सांगितला आहे. यात ‘फाल्गुन पौर्णिमेला आंब्याचा मोहोर खाअसं विधान आहे. त्याचा श्लोक असा,

 

चूतमग्र्यम वसंतस्य माकंद कुसुमम् तव ।

सचंदनं पिबाम्यद्य सर्वकामार्थसिद्धये ॥

 

अर्थ - हे आम्रवृक्षा, वसंताचे अग्रपुष्प असलेला तुझा मोहर मी चंदनमिश्रित करून सर्व कामनांच्या सिद्धीसाठी प्राशन करीत आहे.

 

आवळा

 

आवळ्याच्या वृक्षाचे आणि फळाचे उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्मयात आढळतात. जैमिनीय उपनिषद, ब्राह्मणग्रंथ, छांदोग्योपनिषद, शिवोपोनिषद, रामायण, महाभारत, कौटिल्यीय अर्थशास्त्र, जातक कथा, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, काश्यपसंहिता, पाणिनीचे अष्टाध्यायी, पतंजलीचे महाभाष्य इ. ग्रंथांतून या वृक्षाचा उल्लेख आला आहे. जालंधरपत्नी वृंदेच्या चिताभूमीत टाकण्यासाठी सरस्वतीने विष्णूला दिलेल्या बीजातून आवळ्याचा वृक्ष उत्पन्न झाला, अशी शिवपुराणात आख्यायिका आहे. स्कंदपुराणात व पद्मपुराणातही आवळ्याच्या निर्मितीच्या कथा आढळतात. आवळ्याचं झाड नेमकं कुठे लावावं, यासंबंधी ब्रम्हवैवर्तपुराणात काही संकेत आढळतात. आवळा अलक्ष्मीचा नाश करतो. हे फळ सूर्याला आवडत नाही म्हणून रविवारी त्याला शिवत नाहीत, अशी समजूत आहे. कार्तिकात तुळशीचं लग्न करताना वृंदावनात आवळे ठेवतात. त्यापूर्वी आवळे खाऊ नयेत, असा संकेत आहे. आवळीचे झाड लावणारा पुनर्जन्मातून मुक्त होतो आणि ज्याच्या घरी आवळ्याचं झाड आहे त्याच्या घरात कोणालाही भूतबाधा होत नाही, असं पुराणात सांगितलं आहे. मृदुमान्य दैत्याने देवांना स्वर्गातून स्थानभ्रष्ट केले, तेव्हा त्यांनी पृथ्वीवर येऊन आवळीच्या झाडाचा आश्रय घेतला आणि तेव्हापासून या वृक्षाला पूज्यता प्राप्त झाली अशी समजूत आहे. कार्तिक पौर्णिमेस या वृक्षाची पूजा करण्यास सांगितली आहे. या पूजेच्या वेळी आवळीला सूत्रवेष्टन करतात. श्रीफलयुक्त अर्घ्य देतात. अष्टदिशांना तुपाचे दिवे लावतात व पुढील मंत्राने प्रार्थना करतात,

 

धात्रिदेवी नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरी ।

निरोगं कुरू मां नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा ॥

 

अर्थ - हे धात्री देवी, तू सर्व पापांचा क्षय करणारी आहेस. तुला नमस्कार असो. तू मला सर्वकाळ निरामय व निष्पाप कर. कार्तिक शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी आवळीच्या झाडाखाली स्वयंपाक करून इष्टमित्रांसह ‘आवळीभोजन’ करतात. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात देवाची मूर्ती पालखीत बसवून आवळीच्या झाडाखाली आणतात. मग देवाला तिथे महानैवेद्य दाखवून भोजन करतात.

 

कदंब

 

कदंब हा वृक्ष वैदिक वाङ्मयात व पुराणांत पूज्य मानलेला नाही. मात्र, भागवत पुराणात कृष्णाच्या कदंब वनातील लीलांचं वर्णन केलं आहे. व्रजमंडलात कदंबाची झाडं सर्वत्र आढळतात. कात्यायनी व्रताच्या प्रसंगी यमुनेत स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रं श्रीकृष्णाने उचलून नेली आणि तो कदंब वृक्षावर जाऊन बसला, अशी कथा आहे. कृष्णलीलेशी संबंधित कदंबाला ‘केली कदंब’ म्हणतात, तर कालिदासाच्या काव्यात वर्णिलेला कदंब हा ‘धूली कदंब’ होय. वर्षा ऋतूच्या आरंभी हा वृक्ष फुलांनी बहरतो. याची फुलं गोल, सोनेरी रंगाची व सुगंधी असून पानं हिरवीगार व सारक असतात. मथुरा जिल्ह्यात बरसाना गावाजवळ कदंबाची वन आहेत. मात्र, त्याची पानं मागच्या बाजूला वळलेली पेल्यासारखी आहेत. कृष्ण व त्याचे सवंगडी यांनी मथुरेला जाणाऱ्या गोपींचे दही लुटले आणि कदंबाच्या पानांचे द्रोण करून त्यातून ते दही खाल्ले. तेव्हापासून एका जातीच्या कदंबाची पानं अशी खोलगट झाली अशी आख्यायिका आहे. मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा या भागांत कदंबाला ‘कर्मा’ म्हणतात. भाद्रपद शुक्ल पक्षात वन्यजमाती ‘कर्मा’ नावाचा उत्सव करतात. त्यात कदंब वृक्षाची पूजा मुख्य असते. मुरूग देवाला कदंब वृक्षाची फुले प्रिय आहेत व तो कदंब वृक्षावर राहतो, अशी समजूत आहे. दक्षिण भारतात मुरूग देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक या वृक्षाची पूजा करतात. गौरी-गणपतीच्या पूजेत कदंबाची पत्री आवश्यक असते. महाराष्ट्रात लग्नसमारंभात कदंबाच्या डहाळीची पूजा करण्याची पद्धत काही समाजांत प्रचलित होती.

 

पळस

 

पळस हा ऋग्वेदकाळापासून पवित्र असलेला वृक्ष. शतपथ ब्राह्मणात त्याची ब्रह्मा व सोम या देवतांशी तुलना केली आहे. पार्वतीच्या शापाने ब्रह्मदेवाचा पळसवृक्ष झाला, अशी आख्यायिका आहे. म्हणून पलाश वृक्षाला ब्रह्मतेजाचं प्रतीक मानतात. म्हणून बटूला उपनयनप्रसंगी पलाशदंड देतात. यज्ञकर्मातही पळसाच्या समिधा वापरतात. पळसाच्या एका डहाळीला तीन पानं असतात. त्यांना अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी नावं असून चातुर्मासात त्याची पूजा करण्यास सांगितलं आहे. हिवाळ्यात पळस लालेलाल फुलांनी बहरतो. पळसाची फुलं पोपटाच्या चोचीसारखी मोठ्या आकाराची असतात. लांबून पाहिल्यावर फुललेला पळस आगीच्या ज्वाळांसारखा दिसतो, म्हणून त्याला ‘फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट’ म्हणतात.

 

रुद्राक्ष

 

‘रुद्राक्षांची माळ’ असं ज्याला आपण म्हणतो ती वास्तविक रुद्राक्ष या वृक्षाची फळं होत. हा वृक्ष भारताच्या बऱ्याच भागांत आढळतो. शिवोपासक लोक भस्मधारणाइतकंच रुद्राक्षधारणालाही महत्त्व देतात. रुद्राक्ष या शब्दाचा अर्थ रूद्र +अक्ष = ‘शिवाचा नेत्र’ असा होतो. रुद्राक्षाच्या फळाला शिवाचा तिसरा नेत्र मानतात. त्रिपुरासुराला ठार मारण्याच्या वेळी कालाग्निरुद्राने जेव्हा ध्यानार्थ डोळे मिटले, तेव्हा त्याच्या डोळ्यातून जे अश्रू ओघळले, त्या अश्रूंपासून रुद्राक्षाची झाडं उगवली, अशी कथा रुद्राक्ष-जाबालोपनिषदात सांगितली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@