ऊर्जेचे आरसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
आठवीच्या वर्गातील मुलांबरोबर झालेला संवाद :

मी : मोठे होण्याचे काही फायदे आहेत का रे?

सई : काही नाही. उलट अभ्यास वाढला आहे. होमवर्क देतात भरपूर.

अदिती : वेगवेगळ्या क्लासेससाठी पळापळ. आयुष्य एकदम बिझी आहे.

मी : अच्छा, खरंच का?

अजिंक्य : सगळे सतत कामं सांगतात. स्वतःला वेळच मिळत नाही.

वरद : हो ना! त्यात माझी धाकटी बहीण वेडं करून सोडते मला. मी जाईन तिथे मागे येतेच.

मी : हं! एकंदर मोठं होण्याचे काही फायदे नाहीत तर...

राघव : मी सांगतो एक फायदा. घरात उंचावर ठेवलेल्या वस्तू काढायला आई मला बोलावते. वस्तू काढून दिली की हसून म्हणते, “हाताशी आला बाई लेक आता.” एकदम भारी वाटतं तेव्हा.

सई : परवा आईला एका सेमिनारला जायचं होतं. तिने माझ्या सल्ल्याने बॅग भरली. सेमिनारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना साजेसे कपडे मी निवडून दिले. आई मला नेहमी सांगते की, माझा कपड्यांच्या रंगसंगतीचा अंदाज खूप चांगला आहे.

मी : अरे वा! तुझा सल्ला घेतला पाहिजे मग!

यश (त्याच्या मित्राला) : ए, आपल्या त्या प्रोजेक्टबद्दल सांग ना.

चिराग : अरे हां! आम्ही चार मित्रांनी मिळून दिवाळीत आकाशकंदील करून विकले. दोन हजार ३८४ रुपयांचा फायदा झाला आम्हाला.

मी : काय सांगतोस? कसा केलात हा प्रोजेक्ट?

हर्षवर्धन : ‘दिवाळीत आम्ही मुलांनी पैसे कमवायचेही कल्पना मुळात माझ्या बाबांची होती. आम्हा चार मित्रांना त्यांनी ती सांगितली. मग काय करायचं, बजेट काय, मार्केटिंग, जाहिरात, कच्चा माल, निर्मिती, वितरण, हिशेब हे सगळं आम्हीच केलं. आता पुढच्या वर्षी आधीपासून तयारी करणार आणि पाच हजारांपेक्षा जास्त फायदा मिळवणारच.

मी : क्या बात है! हे करताना काही अडचणी आल्या का रे?

चिराग (हसत आणि मित्रांकडे पाहून डोळे मिचकावत) : आमच्या बिल्डिंगमधील पाच घरांतील आकाशकंदील नरकचतुर्दशीला दुपारी दोननंतर लागले. दाते आजोबा फारच चिडले आमच्यावर. “दात्यांच्या घरात आजतागायत दिवाळीला इतक्या उशिरा आकाशकंदील लागला नाही,” म्हणाले. पण आमच्या मालाचा दर्जा पाहून खूश झाले मग.

अजिंक्य : हो हो... पुढच्या वर्षी त्यांची ऑर्डर पहिली येणार बघा आणि आम्ही ती सर्वात आधी पूर्ण पण करणार. एक गोष्ट वाईट झाली मात्र. आम्ही कच्चा माल आणायला दुसऱ्यांदा बाजारात गेलो होतो. कमालीची गर्दी. गर्दीत पैशाचं पाकीटच हरवलं. काय करणार? तसेच परत आलो. आईने दिले अजून पैसे पण, त्यामुळे प्रॉफिट कमी झाला ना! आता नेहमी पैसे एकतर नीट ठेवणार आणि सगळे एकाच पाकिटात तर कधीच नाही ठेवणार.

मी : छान. पुढच्या वर्षी आकाशकंदिलाची ऑर्डर मीही देणार हं!

अदिती : यावर्षी मी माझ्या आजी-आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं बजेटींग आणि नियोजन केलं. पार्टी कुठे, कोणाला बोलवायचं, निमंत्रण पत्र, मेनू, कार्यक्रम, भेटवस्तू, सजावट, फोटोग्राफ्स, संगीत सगळं व्यवस्थित. आजी-आजोबा आणि सगळे नातेवाईक एकदम फिदा झाले माझ्या नियोजन कौशल्यांवर.

मी : वाह! तू स्वतः फोटोही छान काढतेस ना गं?

अमिषा : हो. ती शाळेतील फोटोग्राफी स्पर्धेत पहिली आली होती.

मी : आपल्याला खरंच मोठं समजलं गेलं, तर त्याचे काही फायदेही लक्षात येतात, नाही का?

निखिल : हो ना. ‘तुम्हाला जमेल’ असा विश्वास टाकला पाहिजे मात्र. ‘तुला नाही जमणार’ असं आधीच ऐकावं लागलं, तर प्रयत्न तरी कशाला करायचा?

आर्या : घरात काही वस्तू आणायची झाली किंवा पाहुणे येणार असले की, आई-बाबा मला आजकाल नियोजनाच्या चर्चेत सहभागी करून घेतात, तेव्हा खरंच मोठं झाल्यासारखं वाटतं.

मुलांच्या चर्चेतून त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन लक्षात येतो. पौगंडावस्थेतील मुलांच्या अपरिमित ऊर्जेला चालना देणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रेरणेने मुलांच्या स्व-निर्मितीला हातभार लावू शकतील, अशा पालकांच्या या प्रातिनिधीक कृती प्रोत्साहनपर आहेत, नाही का?

 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@