गुगलमध्ये वादळ ‘मीटू’चे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |



पिचाई यांना कर्मचाऱ्यांनी अॅण्डी रुबिन यांच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले आहेत. दोन वर्षांत एकूण ४८ कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यावर गुगलने घरी पाठवले, त्यातील १३ जण हे वरिष्ठ अधिकारी होते.


अभिनेते नाना पाटेकर व तनुश्री दत्ता यांच्यातील आरोप-प्रत्यारोपानंतर सुरू झालेल्या ‘मी टू’ मोहिमेने बॉलीवूडनंतर, राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील दुष्कर्मांनाही वाचा फोडली. गेल्या आठवड्यात जगविख्यात कंपनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी लैंगिक गैरवर्तणूक करणाऱ्या एकूण ४८ जणांना घरी पाठवले. एका ईमेलद्वारे त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले होते. या कर्मचाऱ्यांच्या पदाबाबत कोणतीही तमा न बाळगता ही कारवाई केल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे. मात्र, या कारवाईनंतरही कंपनी या वादातून सुटलेली नाही. पिचाई यांना कर्मचाऱ्यांनी अॅण्डी रुबिन यांच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले आहेत. दोन वर्षांत एकूण ४८ कर्मचाऱ्यांना लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यावर गुगलने घरी पाठवले, त्यातील १३ जण हे वरिष्ठ अधिकारी होते. त्यापैकीच एक अॅण्डी रुबिन. अॅण्ड्रॉईड प्रणाली बनवण्यात रुबिनची महत्त्वाची भूमिका होती. लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनीतून बाहेर पडण्यासाठी त्याला ६६० कोटी रुपयांचे एक्झिट पॅकेज दिल्याचा कंपनीवर आरोप केला जात आहे. दरम्यान, पिचाई यांनी गेल्या आठवड्यात म्हटल्यानुसार, लैंगिक शोषणात आरोपी ठरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोणतेही निवृत्तीवेतन मिळणार नाही किंवा सेवा ज्येष्ठतेनुसार कोणतीही रक्कम मिळणार नाही. याच मुद्द्यावर पिचाई यांना कर्मचाऱ्यांनी घेरले आहे.

 

‘न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार २०१४ मध्ये रुबिनविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यानंतर कंपनीच्या नियमांप्रमाणे त्याला पद सोडावे लागले. मात्र, जाताना त्याला ६६० कोटी रुपयांचे एक्झिट पॅकेज दिल्याने खळबळ माजली आहे. ‘मी टू’ मोहिमेनंतर पिचाई यांनी ४८ जणांना काढून टाकल्याची माहिती प्रसारमाध्यांमध्ये जाहीर केली मात्र, रुबिनला प्रकरणातून वाचवण्याचा घाट त्यावेळी घातला होता, असे आरोप आता केले जात आहेत. ऑक्टोबर २०१४ मध्ये रुबिन निवृत्त होत असल्याचे गुगलने जाहीर केले. रुबिन इतक्या रकमेचे एक्झिट पॅकेज मिळणारा तिसरा अधिकारी होता. निवृत्त झाल्यानंतर रुबिनने स्वतःचा दुसरा व्यवसाय सुरू केला. रुबिनने पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतरही पीडितेला न्याय मिळालाच नाही. रुबिनने सहा महिन्यांतच स्वतःचा व्यवसाय सुरू केला; किंबहुना त्यानंतर गुगलने या कंपनीत गुंतवणूक केल्याचाही आरोप होऊ लागला आहे. ही बातमी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पिचाई यांनी ४८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली. मात्र, रुबिन याने पीडितेवर केलेल्या अत्याचाराचे काय? तिला न्याय कसा मिळणार? तिच्या भावानांचे काय?, असे प्रश्न आता गुगलचे कर्मचारी विचारत आहेत.

 

कंपनीने अन्य काही जणांनाही वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. रुबिनचे प्रकरण गाजण्याचे कारण म्हणजे त्याच्या आधीच्या पत्नीनेही या प्रकरणी खटला दाखल केला होता. दोषी आढळल्यानंतर कंपनीने कारवाई करत राजीनामा मागितला आणि रुबिनने तो दिलाही. यानंतर दर महिन्याला पुढील चार वर्ष प्रत्येकी २० अब्ज डॉलर्स इतकी रक्कम दिली. गुगलने मात्र, कंपनीतील वातावरण सर्वांसाठी पोषक बनेल असा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. ४८ कर्मचारी दोन वर्षांत निलंबित झाले आहेत. तरीही अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी झालेला हा प्रयास अनुत्तरितच राहतो. वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका आणि सामान्यांना वेगळा न्याय ही गुगलच्या दरबारातील गोष्ट यानिमित्त चव्हाट्यावर आली. अॅण्डी रुबिन हा अॅण्ड्रॉईड विश्वाचा जनक मानला जातो. ८५ टक्के मोबाईल यंत्रणा ही अॅण्ड्रॉईड प्रणालीवर सुरू आहे. त्याच्याकडूनही असे कृत्य घडावे, यावरून कॉर्पोरेट विश्वाचा आणि परिणामी सभ्य लोकांच्या दुनियेतील एक काळा चेहराही यात समोर येतो. ‘मी टू’ बाबत सध्या भारतात असलेली अनेकांची मते वेगळी असतील, आरोप सिद्ध होईपर्यंत पीडितेला शांत बसण्याचा सल्ला दिला जातो, मात्र, प्रकरण न्यायालयाने पीडितेच्या बाजूने लावल्यानंतरही आरोपीची कातडी वाचवणारी गुगल कंपनी सध्या तरी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निरुत्तर आहे.

- तेजस परब

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@