आम्ही आणि आमचे संविधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018
Total Views |

आम्ही आणि आमचे संविधान

लेखक :- रमेश पतंगे

प्रकाशक:- साप्ताहिक विवेक

सामन्यपणे भारतात बहुतेक घटना संविधानाच्या चौकटीत मांडण्याची प्रथाच पडली आहे. त्यात प्रामुख्याने ज्यांनी संविधान समजूनच घेतले नाही किंवा ज्यांनी वाचले परंतु समजण्याचा प्रयत्न केला नाही अशी अनेक व्यक्तिमत्वे या देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संविधानाशी संबध लावतात व लगेच संविधानावर हल्ला म्हणून मोकळे होतात. मागच्या काही वर्षांत अशी वक्तव्ये सातत्याने येताना दिसतात.त्यामुळे सामान्य भारतीयांना नेमकी राज्यघटना म्हणजे काय ?, खरच घटना बदलता येवू शकते काय ? किंवा घटनेत दुरुस्ती करता येते कि ती पूर्ण बदलता येते हे समजणे आजची आवश्यकता आहे या साठीच सामन्यांच्या दृष्टीकोनातून घटना व भारतीय नागरिकांचा घटनेशी असलेला संबंध समजूनघेणे आवश्यक ठरते. या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठीचा प्रयत्न श्री रामेशजी पतंगे यांच्या ‘आम्ही आणि आमचे संविधान’ या ग्रंथात दिसून येतो. श्री पतंगे यांच्या काही लेखांचे एकत्रित स्वरूप असलेले हा ग्रंथ, कायद्याचा पदवीधर नसलेल्या व सामान्य भारतीय नागरिकांच्या दृष्टीकोनातून लिहिला गेलेला हा तसा पहिलाच ग्रंथ असावा. आपल्या मनोगतात रामेशजी ते कायद्याचे पदवीधर नाहीत याची प्रामणिक कबुली एकीकडे देतात तर दुसरीकडे प्रत्यकाने संविधान साक्षर होण्याची आवश्यकता हि प्रतिपादित करतात.

 

एकूण चौदा प्रकरणांमध्ये विभागलेल्या या ग्रंथाचा प्रवास संविधानाची गरज का असते? या पहिल्या प्रकरणा पासून सुरु होतो तो पुढे संविधांची ओळख व संविधानातील महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकत पुढे घटनात्मक राष्ट्रवाद विरुद्ध अराजक या प्रकरणा पर्यंत येतो व शेवटी यासंधर्भात वाचावीत अशी पुस्तके सांगून थांबतो. या देशावर झालेली परकीय आक्रमणे व त्यांनी सुरु केलेली कायदे प्रक्रिया ज्यात त्यांना त्यांनी निर्माण केलेल्या कायद्याचे वाटेल तसे अर्थ लावण्याची मुभा होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर भारतास लोकांसाठी त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा कायदा किंवा घटना असावी असे वाटणे काही वावगे नव्हते. लेखकाच्या मते भारतीय राज्यघटना आपल्या देशात कायद्याचे राज्य राहील व प्रत्येकाला त्याच्या इच्छे प्रमाणे जीवन जगता येण्यासोबत समता आणि आणि सर्वांना समान कायद्याच्या संरक्षणाची हमी देते. म्हणजेच व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी, कायद्याच्या राज्यासाठी, लोककल्याणासाठी, न्यायासाठी राज्याला संविधान लागते असे रामेशी पतंगे आपल्या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात नमूद करतात. आपले संविधान राष्ट्राची कोनशीला या दुसऱ्या प्रकारांमध्ये लेखाच्या मते राज्यघटना म्हणजे वेगवेगळ्या कलामांचे गाठोडे असते यात सर्व कलमे लहान परंतु कळण्यास महाकठीण असतात कारण त्यातील शब्दांचा नेमका अर्थ लावणे कठीण असते. ते पुढे मांडतात कि कोणत्याही देशाची राज्यघटना तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नसतो तीत शून्य काव्य असते ती साहित्यकृती नसल्यामुळे सामान्य माणसे राज्यघटना वाचण्याच्या भानगडीत पडत नाहीत. अनेक राजकीय नेते जेंव्हा राज्यघटनेवर बोलत असतात त्यांना ऐकून लेखकास प्रश्नपडतो कि खरच यांनी राज्य घटना वाचली आहे कि नाही ? ग्रॅनव्हिले ऑसटीन या अमेरिकी लेखकाच्या भारतीय राज्याघाटनेवरील दोन पुस्तांचा उल्लेख करीत भारतीय राज्याघटना राष्ट्राची कशी कोनशीला आहे हे विवध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगतांना दिसतात. लेखकाच्या मते ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांचे पुस्तक भारतीय राज्यघटनेकडे एक वेगळ्या नजरेने पाहण्यास शिकविणारे पुस्तक आहे. सदर ग्रंथात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची संविधान निर्मितीतील भूमिका विवध उदाहरणांसहित स्पष्ट केलेली दिसून येते. लेखकाच्या मते घटना समितीत बहुसंख्य हिंदू होते. हिंदू धर्मांच्या या समर्थकांनी हिंदू धर्मावर कठोर टीका करणाऱ्या डॉ. आंबेडकरांची निवड संविधान लेखन समितीच्या अध्यक्षपदी केली. या बाबत लेखक डॉ आंबेडकरांचे पुढील भाष्य देतात यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले की, “जेंव्हा हिंदूंना वेद आणि वेदांत यांची आवश्यकता भासली तेंव्हा त्यांनी हे काम महर्षी व्यासांना दिले. व्यास सवर्ण हिंदू नव्हते. जेंव्हा हिंदूंना महाकाव्याची गरज भासली तेंव्हा त्यांनी हे काम वाल्मिकींना दिले. वाल्मिकी सवर्ण हिंदू नव्हते. आणि जेंव्हा त्यांना संविधानाची गरज भासली तेंव्हा त्यांनी हे काम मला दिले”. याचा अर्थ एव्हडाच कि हि भारताची प्राचीन परंपरा आहे. अर्थात व्यास, वाल्मिकी, आंबेडकर या परंपरेतून भारत उभा राहिला आहे. महान कायदेतज्ञ व घटना समितीचे सल्लागार बी. एन. राऊ यांनी संविधानाचा मुळ मसुदा तयार केला तो २४३ कलमांचा होता. या बाबत ज्या चर्चा झाल्या त्या सर्व चर्चांना बाबासाहेबांनी उत्तरे दिली. बाबासाहेबांची संविधान सभेत दिलेल्या तीन भाषणांचा सारांश या प्रकरणात लेखाने दिलेला दिसून येतो. बाबासाहेबांच्या विचारांतील एक महत्वाचा भाग लेखक श्री पंतंगे यांनी सदर ग्रंथात मांडलेला दिसून येतो यात बाबासाहेबांच्या चिंते बाबत ते लिहितात. भारताचे स्वातंत्र्य मुस्लीम आक्रमकांनी हेरावून घेतले व त्यांना मदत करणारे येथील हिंदूच होते सांगण्यास बाबासाहेब घाबरत नाहीत. अर्थात या राष्ट्रातील बेईमान लोक बाबासाहेबांच्या चिंतेचे प्रथम कारण तर परस्परविरोधी असणाऱ्या विचारप्रणाली व राजकीय पक्ष देशाला मोठा मानतील की आपल्या विचारधारेला ? हा प्रश्न बाबासाहेबांच्या चिंतेचे दुसरे कारण दिसून येतो. या सोबतच पुढची चिंता ते व्यक्त करतात की या देशात लोकशाही शासन टिकेल का? कारण एकाच पक्षाला जर प्रचंड बहुमत मिळाले तर लोकशाहीचे बाह्य स्वरूप राहील, परंतु प्रत्यक्षात हुकुमशाही असेल. बाबासाहेबांच्या संविधान टिकून राहण्या संबंधीच्या अशा विविध चिंतांचा उहापोह लेखाने सदर ग्रंथात केलेला दिसून येतो. पुढे लेखक संविधानाच्या उद्देशिकेवर विस्तृत भाष्य करतात. या नंतर संविधान आणि आरक्षण या विषयावर सखोल विचार श्री पतंगे यांनी विविध संदर्भ घेऊन मांडलेले दिसतात. समतेच्या इतर कालमांसोबातच समतेचे कलम १५, अनुच्छेद ४ अतिशय महत्वाचा मनाला जातो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात राज्याला कसलाही प्रतिबंध होणार नाही, असे म्हंटले आहे म्हणजेच या वर्गाच्या उन्नतीसाठी राज्य वेगवेगळे कायदे करू शकते आणि वेगवेगळ्या व्यवस्था उत्पन्न करू शकते. त्याच प्रमाणे कलम १६, अनुच्छेद ४ नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये जर असे आढळून आले कि समजतील मागासवर्गीयांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही तर त्यांच्या प्रतिनिधित्वाची व्यवस्था राज्य करू शकते आणि त्याला कोणताही प्रतिबंध असणार नाही. या प्रकारची उदाहरणे देत आरक्षणा संदर्भात पडणाऱ्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपणास या प्रकरणात मिळतात. आरक्षण किती टक्के असावे या बाबत डॉ आंबेडकरांचे संविधान सभेतील भाषणातील वाक्ये या प्रकरणात आहेत. यात डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या चर्चेत म्हणाले कि “देशातील मागासवर्गीयांचा विचार करता त्यांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास जाते. एव्हड्या जागा आरक्षित ठेवल्यास समतेच्या तत्वाला अर्थ राहत नाही म्हणून राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये”. संविधान आणि समरसता या बाबत परखड विचार या ग्रंथाचे लेखक मांडतांना दिसतात संविधानातील प्रत्येक शब्दाला अगदी स्वल्पविरमाला देखील अर्थ आहे असे ते म्हणतात. संविधानात समरसता हा शब्द नाही समता हा शब्द प्रयोग आहे या बाबत लेखक विवध शब्दांचा व घटनादुरुस्तीचा उल्लेख करीत आपले विचार मांडतांना दिसतात. या सोबतच केशवानंद भारती खटला, न्यायमूर्ती हंसराज खन्ना यांचे निकालपत्र व संविधान या बाबत स्वतंत्र चर्चा सदर ग्रंथात केलेली दिसून येते. पुढे राज्यघटना आणि राज्य घटनेतील बदल या प्रकरणात लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटना बदलून टाकेल या अपप्रचाराचे विवध संदर्भ देत खंडन करतांना दिसतात. उलटपक्षी पुढच्या प्रकरणात ४२ वी घटना दुरुस्ती जिस लघुघटना म्हणून संबोधले जाते घटना बदलण्याचा डाव कशी होती या बाबत विवेचन केले गेले आहे. या नंतर भारत आणि अमेरिकेच्या राज्यघटनांच्या निर्मितीच्या परिस्थितींचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. आपले राष्ट्र आणि राज्यघटना व घटनात्मक राष्ट्रवाद विरुध्द अराजक या पुढच्या दोन प्रकरणांत वाचकांचे डोळे उघडणारे संदर्भ देत लेखक काही प्रश्न उपस्थित करतात व काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करतात. शेवटी या बाबत वाचावीत अश्या पुस्तकांबाबत विवेचन या संदर्भातील वाचन समृध्द करण्यासाठी उपयुक्त ठरते.

आम्ही आणि आमचे संविधान श्री रमेश पतंगे लिखित ग्रंथ सामान्य नागरिकास पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकीकडे देतोच परंतु दुसरीकडे भारतीय संविधानाविषयी पसरविण्यात येणाऱ्या अनेक अपप्रचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. प्रत्येकाने संग्रही ठेवण्यासारखा हा ग्रंथ अनेकांनी वाचून समजून घेणे आवश्यक आहे. शेवटी सामान्यांच्या नजरेतून सामान्यांसाठी लिहिलेले अभ्यास पूर्ण हे लिखाण आहे.

प्रा.जयेंद्र दिनकर लेकुरवाळे

प्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महीला महाविद्यालय, जळगाव

 
@@AUTHORINFO_V1@@