धरणगावच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू विक्रम वाचनालयस्थापना आणि वाटचालीत रा.स्व.कार्यकर्त्यांचा पुढाकार : विविध उपक्रमांसाठी दामूअण्णा दाते सभागृह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018
Total Views |
 

धरणगावच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू विक्रम वाचनालय
स्थापना आणि वाटचालीत रा.स्व.कार्यकर्त्यांचा पुढाकार : विविध उपक्रमांसाठी दामूअण्णा दाते सभागृह


धरणगाव, २६ ऑक्टोबर
वखार लुटीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि मुक्कामाने पावन झालेल्या ऐतिहासिक आणि बालकवींच्या वास्तव्याने मराठी साहित्य विश्वात ख्यातकीर्त धरणगाव नगरीचे सांस्कृतिक व वैचारिक विश्वाचे हृदयस्थान आहे, विक्रम ग्रंथालय आणि मोफत वाचनालय आणि पहिल्या मजल्यावरील दामूअण्णा दाते सभागृह.
स्पर्धा परीक्षांच्या युगात महत्त्वाकांक्षी तरुणाईला बळ देणारे, काळाबरोबर धावणारे अभ्यास केंद्रही येथे या सभागृहात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेल्या कार्यकर्त्यांनी एकूणच समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी देशभर हजारो विविधांगी सेवाप्रकल्प तन, मन, धनपूर्वक उभारत त्यांना शासन, प्रशासन आणि लोकसहभागाद्वारे प्रगतीपथावर नेलेले आहे. त्या विश्वातील लौकिक अर्थाने लहानशा धरणगावचे हे वाचनालय राज्यभरात नावाजलेले आहे.
ग्रंथ हेच गुरू, वाचाल तर वाचाल, वाचनाने विवेकी, सुसंस्कृत नागरिक घडतो, या सूत्रानुसार सुखी संपन्न, समृद्ध समाजनिर्मितीसाठी रा.स्व.संघाचे अग्रणी कार्यकर्ते, समरसता मंचचे प्रदेशाध्यक्ष व फर्डे, अभ्यासू वक्ते प्रा.रमेश महाजन, संघाचे देवगिरी प्रांत सहकार्यवाह बाळासाहेब चौधरी आणि सहकारी स्व.सुरेश काशिनाथ चौधरी, शिरीष बयस, महेश नारायण आहेराव, सुरेश बाविस्कर, मोहन सरोदे आदींच्या पुढाकाराने २ मे १९९० ला वाचनालयाची स्थापना झाली. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीही झाली. सध्या महाजन हे अध्यक्ष आणि आहेराव हे सचिव असून भगवान कुंभार या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडे १५ वर्षांपासून ग्रंथपालपदाची जबाबदारी आहे.
एम.के.अण्णांनी २४ लाख रु. देत शब्द खरा केला...
सुरुवातीला विश्वकर्मा सोसायटीत लहान स्वरुपात वाचनालय सुरू झाले. नंतर धरणी चौक परिसरात ३ खोल्यांमध्ये स्थलांतरित झाले. तेथे विद्यार्थी सत्कारप्रसंगी तत्कालीन खासदार एम.के.अण्णा पाटील यांनी आपल्याला मंत्रीपद मिळाल्यास वाचनालयाला भरीव निधी देऊ, अशी ग्वाही दिली होती आणि योगायोग दुसर्याच दिवशी त्यांना ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद बहाल झाले. त्यांनी २४ लाख निधी देत शब्द खरा केला.
पदाधिकारी, वाचनप्रेमी आणि संघ कार्यकर्ते यांच्याकडून सुमारे ५ लाख रु. अनामत रक्कम उभी करून ३९०० चौरस फूट बखळ जागा विकत घेण्यात आली. बांधकाम २००३ मध्ये सुरू झाले. धरणगावचे आर्किटेक्ट नितीन करवा आणि बांधकाम व्यवसायी किरण पाटील (सध्या पुण्यात कार्यरत)यांनी २००५ मध्ये ही सुंदर, सुबक वास्तू आणि वर सभागृह बांधून पूर्ण केले आणि विद्यमान सरसंघचालक आणि तत्कालीन सरकार्यवाह परमपूज्य मोहनराव भागवत यांच्या हस्ते ७ जुलै २००५ ला वास्तूचे उद्घाटन प्रचंड उपस्थितीत आणि प्रसन्न, पवित्र वातावरणात झाले.
दरवर्षी वाचकांच्या अभिरुची व इच्छेनुसार नवनवीन ग्रंथ खरेदी केली जाते. यंदा ८५ हजारांची व स्पर्धा परीक्षांसाठीची ३४ हजारांची पुस्तके खरेदी करण्यात आली.
वाचन संस्कृती व चळवळ वृद्धिंगत होवो, यासाठी संस्था काळजी वाहत आहे. तिला सर्व समाजघटकांचे वाढते सहकार्य व सहभाग हवा आहे.

स्व.दामूअण्णा दाते सभागृहात दरवर्षी एकूण ३ व्याख्याने
सर्व शाळांमधील सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान
नाममात्र शुल्कात स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालय
दरवर्षी वाचकांच्या अभिरुचीनुसार ग्रंथ खरेदी

विक्रम जोशीचे नाव का?...
आणीबाणीच्या काळात अवघ्या दहावीतील संघ स्वयंसेवक विक्रम जोशी हे एस.पी.कुलकर्णी यांच्या समवेत दुचाकीने जळगावहून धरणगावला येत होते. त्यांच्याजवळ आणीबाणीचा व इंदिरा गांधीचा धिक्कार करणारी पत्रके होती. पाळधीपुढे दुचाकीला अपघात झाला, ती पत्रके कुणाच्या हाती लागली तर अनेकांना बेमुदत कारावास अटळ. याचे प्रसंगावधान राखत विक्रमने ती मित्राच्या हाती सोपवत प्राण सोडले... त्याचे हे जणू स्मारकच!

...अशी आहे ग्रंथसंपदा, नियतकालिके
संगणकीकृत व भव्य वाचनालय ‘इतर अ’ वर्गात. गुरुवारी सुटी वगळता सकाळी ७॥ ते ११.३० आणि दुपारी ४॥ ते ८॥ या वेळात मुक्त प्रवेश. २० पुस्तकांनी श्रीगणेशा, सध्या ललित वाड्.मय, धार्मिक तसेच विविध प्रकारची तब्बल २१ हजार ५८० ग्रंथसंपदा. मासिक वर्गणी अवघी २० रु. वाचक संख्या १२७५, विविध थरातील जिज्ञासू वाचकांसाठी मराठी -१५, इंग्रजी -२ आणि हिंदी-१ अशी एकूण १८ दैनिके तसेच सुमारे ७५ नियतकालिके.
 
@@AUTHORINFO_V1@@