राहुल गांधी आगे बढो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018   
Total Views |


 


राहुलला पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार केलेले नाही, असे चिदंबरम या ज्येष्ठाने परवाच सांगून टाकलेले आहे. दुसरे ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसला मित्रपक्षांच्या कुबड्या घेतल्याशिवाय लढता येणार नसल्याचे प्रामाणिकपणे सांगून टाकलेले आहे. ही राहुलच्या नेतृत्वाची प्रचितीच नाही काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्विवादपणे बहुमत मिळवण्याच्या गप्पा करत आहेत आणि त्यांचे अनेक सहकारी त्याला दुजोरा देत आहेत. त्याच्या उलट काँग्रेसमधील राहुल गांधींचे विविध मोठे सहकारी स्वबळावर लढणे अशक्य असल्याचे सांगतात.

 

मंगळवारच्या मध्यरात्री केव्हातरी सीबीआयच्या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने सुट्टीवर पाठविण्यात आले. त्यावरून बुधवारी दिवसभर गदारोळ चालू होता. त्याचा संदर्भ घेऊन गुरुवारी राहुल गांधी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत आपली राफेल टेप पुन्हा वाजवली. सीबीआय राफेल घोटाळ्याची चौकशी सुरू करणारच होती, इतक्याच अपरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयच्या प्रमुखालाच सुट्टीवर पाठवून दिले. असा आरोप राहुल इतक्या आत्मविश्वासाने करीत होते की, मला त्यांचा तो आवेश खूप आवडला. अगदी असाच आवेश आणि उत्साह त्यांनी पाच वर्षांपूर्वी सातत्याने दाखवला होता आणि त्याचे परिणाम आपण बघितलेलेच आहेत. त्याची सुरुवात छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेली होती. त्या चारही विधानसभांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्लेला होता आणि दिल्लीत तर १५ वर्षे हाती असलेली सत्ता काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावर नेऊन गमावलेली होती. भाजपचे दिल्लीत बहुमत हुकलेले होते, तर आम आदमी पक्ष नावाच्या नवख्या पक्षाने दुसरा क्रमांक पटाकवताना १५ वर्षांच्या काँग्रेस मुख्यमंत्री शीला दीक्षितांनाही आपल्या मतदारसंघात प्रचंड बहुमताने पराभूत केलेले होते. जेव्हा असे काही व्हायचे, तेव्हा बिळात तोंड लपवून बसणाऱ्यांना काँग्रेसश्रेष्ठी म्हणायची आपली राजकीय संस्कृती आहे. त्याचा खूप गवगवा झाला आणि पराभवाची जबाबदारी घ्यायला राहुल व सोनियांना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर यावे लागले. तेव्हाही राहुल यांनी आजच्या सारखाच आवेश व अविर्भाव दाखवला होता. त्यानंतर त्यांनी कधी क्षणभर विश्रांती घेतलेली नाही. त्यावेळी ज्या आत्मविश्वासाने राहुल बोलले होते, तोच आत्मविश्वास आजच्या त्यांच्या राफेल मोहिमेत पुरेपुर दिसून येतो. राहुल त्यावेळी काय बोलले होते, त्याचे आज अनेकांना स्मरण नाही. म्हणून त्याची आठवण करून देणे योग्य ठरेल.

 

त्या दारूण पराभवानंतर त्रयस्थपणे माध्यमांना सामोरे जाणाऱ्या राहुल गांधी यांना काडीमात्र दु:ख झालेले नव्हते. यातूनही पक्ष कसा ठामपणे उभा राहील, याची पत्रकार मंडळींना ग्वाही देताना राहुल म्हणाले होते, “आमचा पराभव झाला हे खरे आहे पण, त्यातील चुका आम्ही समजून घेतल्या आहेत. काँग्रेसची संघटना इतकी मोठी व मजबूत आहे की, यातून आम्ही सावरून पुन्हा उभे राहू. इतर कुठल्याही पक्षाकडे नाही इतकी शक्ती व कुवत आमच्याकडे अधिक आहे. त्यानंतर सहा महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि इतिहासात काँग्रेसची त्यापेक्षा मोठी वाताहत कधी झालेली नव्हती. पण सगळा काँग्रेस पक्ष खचून व ढासळून पडला असतानाही राहुल गांधींचा तो आत्मविश्वास कायम होता आणि आजही आहे. नंतरच्या चार वर्षांत एकामागून एक राज्ये वा अनेक राज्यांतील सत्ता गमावतानाही राहुल गांधींच्या त्या आत्मविश्वासाला तसूभर धक्का लागलेला नाही. ते तितक्याच ठामपणे आपल्या ‘कुवती’वर विसंबून आहेत. हिमाचल, उत्तर प्रदेशात त्यांनी युवकांना स्थानिक पातळीवर उत्पादन झालेले मोबाईल चीनमध्ये खरेदी व्हायला हवे, असे स्वप्न दाखवले होते. आता ते राफेलच्या विमानात स्वार होऊन उडत आहेत. हा आत्मविश्वास भारतात सहसा कुठल्याही राजकीय नेत्यापाशी आढळून येत नाही. त्याचीच खातरजमा सीबीआय घोटाळ्यानंतरही राहुलच्या भाषणातून दिसून येते. साहजिकच हा आत्मविश्वास काँग्रेसला कुठे घेऊन जाणार आहे, त्याचे वेगळे विवरण देण्याची गरज नाही. पण अलीकडील काळात राहुलमध्ये तेव्हाच्या केजरीवाल यांचीही झाक थोडीफार दिसू लागलेली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर लाथ मारून मग केजरीवालांनी देशव्यापी मोहीम छेडली होती. त्यांची गर्जना होती, “मोदीजी को हराना है।” त्यासाठी अरविंद केजरीवाल वाराणसीला जाऊन उभे राहिले होते. राहुल तेही करणार की काय? इतकाच प्रश्न आहे.

 

राहुलना १०० वर्षांहून अधिक काळ बांधलेली संघटना मिळालेली आहे आणि केजरीवालांनी दिल्लीच्या यशानंतर १०० दिवसांत देशव्यापी संघटना उभी करून मोदींना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. दिल्लीतील आपले सहा-सात हजार सवंगडी घेऊन कुठल्याही शहरात, महानगरात जायचे आणि धमाल उडवून द्यायची, हा केजरीवाल यांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यातून माध्यमांत रोजच्या रोज झळकले की मोदी हरलेच म्हणून समजा. याविषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. त्यांच्या अशा आत्मविश्वासाने अनेकांना भुरळ घातली होती. इन्फोसिससारख्या जगात कौतुक होणाऱ्या कंपनीचे माजी मुख्याधिकारी, एक हवाई वाहतूक कंपनी उभी करून दाखविणारे धाडसी उद्योगपती वा स्वयंसेवी क्षेत्रात आपली प्रतिष्ठा निर्माण करणाऱ्या मेधाताई पाटकर असे एकाहून एक दिग्गज केजरीवालांच्या त्या गर्जनांनी भारावून गेलेले होते. त्यांनी आपली प्रतिष्ठा आम आदमी पक्षाच्या झोळीत भिरकावून दिली. काही वाहिन्यांचे संपादक व पत्रकारही त्यात ओढले गेले. या सर्वांना क्षणात मातीमोल करून टाकणारा केजरीवालांचा आत्मविश्वास आपण आज राहुल गांधींमध्ये बघू शकतो. त्यांची देहबोली व कर्कश्श बोलण्याने मोदी आधीच पराभूत झाले आहेत. आता फक्त मतदान व्हायचे बाकी असल्याची आपली खात्री पटायला वेळ लागणार नाही. मुद्दा इतकाच असतो की, अशी मते यंत्रात नोंदवली जात नाहीत की, मोजणीच्या दिवशी मोजली जात नाहीत. त्यावर निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या जात नाहीत. अन्यथा आज मोदींना हरविण्याची वेळच राहुल यांच्यावर आली नसती. त्याऐवजी त्यांना ‘केजरीवाल को हराना है।’ असली भाषा बोलावी लागली असती. कारण, आज राहुल जे करत आहेत तेच केजरीवाल पाच वर्षांपूर्वी करून मोकळे झालेत. म्हणूनच नंतर अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुका लढविण्याचा विषयही त्यांनी कधी चर्चिला नाही.

 

बाकी मतदार काय करतील, ते नंतर दिसेलच. पण राहुल गांधींच्या या आत्मविश्वासाने बहुतांश काँग्रेसनेत्यांना खूप धीर येऊ लागला आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकहाती सत्ता मिळवू शकत नाही की, स्वबळावर निवडणुकाही लढवू शकत नाही, याविषयी आता अनेक ज्येष्ठ काँग्रेसनेते खुलेपणाने बोलण्याचे धाडस करू लागले आहेत. राहुलना पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार केलेले नाही, असे चिदंबरम या ज्येष्ठाने परवाच सांगून टाकलेले आहे. दुसरे ज्येष्ठ काँग्रेसनेते व माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसला मित्रपक्षांच्या कुबड्या घेतल्याशिवाय लढता येणार नसल्याचे प्रामाणिकपणे सांगून टाकलेले आहे. ही राहुलच्या नेतृत्वाची प्रचितीच नाही का? भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निर्विवादपणे बहुमत मिळवण्याच्या गप्पा करतो आहे आणि त्याचे अनेक सहकारी त्याला दुजोरा देत आहेत. त्याच्या उलट काँग्रेसमधील राहुल गांधींचे विविध मोठे सहकारी स्वबळावर लढणे अशक्य असल्याचे सांगतात. राहुलची उमेदवारी मित्रपक्षांना रुचणारी नाही, अशी ग्वाही देऊ लागले आहेत. याचे कौतुक कोणी करीत नाही. राहुलचे सहकारीही असे दांडगे आहेत की, आपल्यामुळे किती व कोणती मते पक्ष गमावणार, त्याचाही आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला दिसतो. दहा वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले दिग्विजय सिंग आपल्या बोलण्याने पक्षाची मते कमी होतात, असे सांगत आहेत. या सगळ्या राहुलच्या आत्मविश्वासाच्या खाणाखुणाच नाहीत का? जो आत्मविश्वास जयपूरच्या पक्ष अधिवेशनात त्यांनी दाखवला होता. त्याचे इतके परिणाम समोर असताना भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भयभीत होऊन जाण्याला पर्याय उरतो काय? तशी भाजपची घाबरगुंडी उडाली नसती, तर त्यांनी सहा-सात महिने आधीच लोकसभेच्या तयारीला लागण्याची काय गरज होती? राहुलच्या त्या आवेशाला घाबरूनच मोदी-शहा आतापासून एप्रिल-मे महिन्यातील लोकसभा मतदानाच्या कामाला लागलेले आहेत, नाही का?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@