ग्लासनोस्त, भारत आणि संघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2018
Total Views |



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक आधार भारतीय चिंतन असल्यामुळे, भारताच्या परंपरेनुसार संघात मुक्त चर्चा नेहमीच होत आली आहे आणि अनेक नव्या सूचनांचे स्वागतही झाले आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. माझा जन्म संघपरिवारातील आहे. माझ्या वडिलांनी १९४१ साली, ते १८ वर्षांचे असताना, आजन्म संघकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. ते त्याचे आजदेखील पालन करत आहेत. लहानपणापासूनच मी शाखेत जात आहे. मला कधीही संघात मुसलमान अथवा ख्रिश्चनांप्रती तिरस्कार किंवा घृणा आढळली नाही. राष्ट्रविरोधी शक्तींचा विरोध (घृणा किंवा तिरस्कार नाही) मात्र जोरदार झालेला पाहिला आहे.

 

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेनंतर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये अपेक्षित चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी याचे स्वागत केले आहे. काही लोकांनी, यात जे सांगितले त्याच्या प्रामाणिकतेवर शंका व्यक्त केली आहे. काहींनी हे सर्व विचार सर्वात खालच्या स्तरापर्यंत कसे जातील, याची चर्चा केली आहे किंवा चिंता व्यक्त केली आहे. या व्याख्यानांमधून सरसंघचालकांनी विविध विषयांवर जो दृष्टिकोन विशद केला तो अनेकांना अगदी नवा, क्रांतिकारी वाटला असेल. परंतु, माझ्या दृष्टीने, यातील प्रत्येक गोष्टींवर संघात कुठल्या ना कुठल्या स्तरावर चर्चा झालेली आहे. एका पत्रकाराने म्हटले की, इतक्या विविध विषयांवर, सर्व प्रश्न स्वीकारून त्यांचे स्पष्ट उत्तर सरसंघचालक देतील, असे वाटले नव्हते. काहींचे मानणे आहे की, संघात मोकळ्या चर्चेला किंवा संवादाला कुठलीच संधी नसते. परंतु, वास्तव हे आहे की, संघात अनेक विषयांवर भरपूर मोकळी चर्चा, संवाद होत असतात. सरसंघचालकांसह सर्व अखिल भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रवासात, दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांशी, प्रबुद्ध नागरिकांशी जिज्ञासा-समाधानाचा कार्यक्रम अवश्य असतो. संघाच्या बाबतीत जो अपप्रचार होत आला. त्यामुळे बाहेरच्या लोकांना असे वाटणे स्वाभाविक आहे की, संघात एवढ्यात मोकळेपणा येऊ लागला आहे, नव्या विचारांचे स्वागत होऊ लागले आहे. त्यामुळे कुणी एकाने याला ‘ग्लासनोस्त’ची उपमाही दिली. विदेशी विचारांचा किंवा विरोधकांच्या शब्दावलीचा आम्हाला इतका सराव होऊन जातो की, आम्हीदेखील नकळत त्याचा वापर करू लागतो. असाच ‘ग्लासनोस्त’ शब्द आहे. त्याचा अर्थ, सामाजिक मुद्द्यांवर मोकळी चर्चा असा आहे. ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका, सामाजिक-आर्थिक मुक्तपणाच्या या संकल्पनांना रशियन संदर्भ आहे.

 

कम्युनिस्ट रशियाच्या कठोर साम्यवादी व्यवस्थेच्या पतनाच्या आणि विभाजनाच्या काळात या संकल्पना चर्चेत आल्यात. याच काळात, बऱ्याच वर्षांच्या व्यक्तिवादी, पोथीनिष्ठ हुकूमशाही व्यवस्थेनंतर सामाजिक चर्चेत मोकळेपणा आणि आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात सुधारणा आल्यात. सेमेटिक मूळ असलेल्या विचारांचे अथवा विचारधारांचे हे वैशिष्ट्य राहिले आहे की, विचार करण्याचे काम केवळ एक व्यक्ती (अथवा एक लहानसा व्यक्तिसमूह) करते. त्याचे अनुसरण करणे सर्वांना अनिवार्य असते. याच्या वेगळा विचार कराल, तर तो पंथद्रोह (ब्लासफेमी) होईल. त्यासाठी कठोर शिक्षाही निश्चित असतात. रशियात कम्युनिस्ट क्रांतीच्या नावावर असेच काहीसे झाले होते. चर्चने हा प्रकार ख्रिश्चॅनिटीच्या नावावर सुरू केला होता. ब्रूनो यांना जीवंत जाळण्यात आले होते. गॅलीलिओ यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, चर्चच्या प्रतिपादनाच्या विरुद्ध त्यांनी, पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, असे प्रतिपादन केले होते. कम्युनिस्ट रशिया आणि चीनमध्ये मार्क्सच्या विरुद्ध विचार मांडला म्हणून कितीतरी लोकांना प्राण गमवावे लागले आहेत किंवा देश सोडून परागंदा व्हावे लागले. अशा पोथीबंद विचारांचा अंधार जिथे होता, जिथे नवीन विचार प्रकट करण्याचा कुणी विचारही करू शकत नव्हता, तिथे ‘ग्लासनोस्त’ म्हणजे नवा विचार करण्याच्या उष:कालाचे निश्चितच महत्त्व आहे. परंतु, भारतात पोथीबंद विचारांचा अंधार कधीही नव्हता. देश, काळ, परिस्थितीनुसार समाजाला दिशा देणारे, नवा मार्ग सांगणारे संत, आध्यात्मिक व्यक्ती, समाजसुधारक येथे नेहमीच झाले आहेत. पुढेही होत राहतील, यावर भारताचा विश्वास आहे. आधुनिक काळच घेतला तर, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नारायण गुरू इत्यादी अनेक नावे समोर येतात. समाजसुधारकांना समाजाने मान्यताही दिली आहे. म्हणून मूळ युरोपियन ख्रिश्चन धर्मोपदेशकाची कन्या असलेली स्वामी विवेकानंदांची शिष्या भगिनी निवेदिता यांनी लिहिले आहे की, “ब्रूनो जर भारतात जन्मले असते, तर त्यांना जीवंत जाळण्यात आले नसते.” जिथे पोथीबंद विचारांचा अंधार आहे, तिथे ग्लासनोस्त नवी गोष्ट आहे आणि तिथे त्याचे स्वागत व्हायला हवे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक आधार भारतीय चिंतन असल्यामुळे, भारताच्या परंपरेनुसार संघात मुक्त चर्चा नेहमीच होत आली आहे आणि अनेक नव्या सूचनांचे स्वागतही झाले आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. माझा जन्म संघपरिवारातील आहे. माझ्या वडिलांनी १९४१ साली ते १८ वर्षांचे असताना आजन्म संघकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. ते त्याचे आजदेखील पालन करत आहेत. लहानपणापासूनचमी शाखेत जात आहे. मला कधीही संघात मुसलमान अथवा ख्रिश्चनांप्रती तिरस्कार किंवा घृणा आढळली नाही. राष्ट्रविरोधी शक्तींचा विरोध (घृणा किंवा तिरस्कार नाही) मात्र जोरदार झालेला पाहिला आहे. १९७१ पासून मला एका शाखेची जबाबदारी देण्यात आली होती. ती शाखा नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत चालायची. जवळच सरकारी मेडिकल महाविद्यालयाचे क्वार्टर्स होते. एके दिवशी १०-१२ मुलांचा समूह शाखेत आला. सर्वांचा परिचय झाला. त्यात आमिल खान आणि फिरोज खान हे सातवीत व पाचवीत शिकणारे दोन भाऊही होते. मी कुणा मुसलमानाला प्रथमच भेटत होतो. दोन दिवसांनंतर मी त्यांच्या घरी संपर्कासाठी गेलो. त्या मुलांचे वडील- बशीर खान रुग्णवाहिकेचे चालक होते. मी माझा परिचय दिला आणि त्यांची मुले दोन दिवसांपासून शाखेत येत असल्याची माहिती दिली. त्यांनी चहाचा आग्रह केला. तेव्हा मी चहा घेत नव्हतो. परंतु, मनात विचार आला की, मी चहाला नकार दिला तर ते समजतील की, आम्ही मुसलमान आहोत म्हणून हा चहा पीत नाही. म्हणून मी त्यांच्या घरी अर्धा कप चहा घेतला. चहा पिण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. दहावीपर्यंत ते दोघेही नियमित शाखेत येत होते. आमिल कबड्डी फार छान खेळायचा. संघ मुसलमानांचा तिरस्कार करतो, त्यांना शत्रू मानतो असा संघाच्या बाबतीत अपप्रचार होताना बघून आश्चर्य वाटायचे. ज्यांचे विचार कामच घृणा आणि तिरस्कारावर आधारलेले आहे, असे संघाचे विरोधकच असा खोटा आणि घृणित प्रचार करू शकतात.

 

गुजरात प्रांत प्रचारक म्हणून माझ्याकडे १९९६ ते २००६ पर्यंत जबाबदारी होती. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील अनेक बैठकांमध्ये जाणे व्हायचे. मला कुठला नवा विचार सुचला की त्यावर मी तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्रींशी चर्चा करीत असे. तो विचार चर्चेसाठी बैठकीत ठेवण्यास ते मला नेहमीच प्रोत्साहित करायचे. पूजनीय रज्जूभैय्या सरसंघचालक होते. त्यांनीदेखील नवा विचार, नवी सूचना करण्यास मला कधी रोखले नाही. हां, एकदा मात्र त्यांनी आपली भाषा शालीन असली पाहिजे, असे सांगून टोकले होते. संघात कसे मुक्त वातावरण आहे, याचे आणखी एक उदाहरण मला आठवते. एका विभाग प्रचारकाला काही काळासाठी, भारताबाहेर चाललेल्या हिंदू स्वयंसेवक संघाच्या कामाची जबाबदारी मिळाली. हिंदू स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच आहे, फक्त प्रार्थना वेगळी आहे. या प्रचारकाला तिथे गेल्यावर लक्षात आले की, भारतातील संघाच्या प्रार्थनेतील दोन महत्त्वाच्या बाबी, तिथल्या प्रार्थनेत नाहीत. त्या अंतर्भूत करायला हव्या. त्याने जेव्हा हा विचार त्याच्या निकटच्या अधिकाऱ्यांच्या कानावर टाकला, तर उत्तर मिळाले की, ही प्रार्थना माननीय भिडे यांनी तयार केली आहे आणि पूजनीय श्री गुरुजी यांनी ती पाहिली आहे आणि ती बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. म्हणून आम्ही असा विचार करू नये. त्या प्रचारकाला हे उत्तर ‘संघाचे’ वाटले नाही. म्हणून त्याने ही बाब संघाचे ज्येष्ठ प्रचारक व चिंतक दत्तोपंत ठेंगडी यांना सांगितली, तर ठेंगडीजी म्हणाले की, “हे जर खरे असेल, तर प्रार्थनेत बदल करून हे जोडायला हवे.” नंतर जेव्हा ही बाब भारतातील संघाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली, तर त्यावर विचार करण्याचा निर्णय झाला आणि २००० सालापासून विश्व विभागाच्या ५० वर्षांपासून प्रचलित प्रार्थनेत एक नवा श्लोक जोडण्याचा निर्णय झाला. एका विभाग प्रचारक स्तराच्या कार्यकर्त्याकडून सूचना आल्यावर, प्रार्थनेसारख्या गंभीर विषयाबाबत चर्चा करून, सहज परिवर्तन करणे ही संघाच्या कार्यपद्धतीची शक्ती आहे तसेच संघात किती मोकळेपणा आहे याचे निदर्शकही आहे.

 

संघ एक जीवंत संघटन असल्यामुळे, असे परिवर्तन होत राहणे स्वाभाविक आहे, संघात अशी परंपरादेखील आहे. म्हणून इथे ग्लासनोस्तची आवश्यकता नाही. हां, इतके विशाल व व्यापक संघटन असल्यामुळे असे परिवर्तन शब्दश: व सारत: खालपर्यंत समजावून सांगणे व लागू करणे, यात वेळ आणि प्रयत्न लागू शकतात. १९९० नंतर सेवा, संपर्क आणि प्रचार विभाग संघात नव्याने जुळले गेले. त्या वेळी त्याची आवश्यकता आणि उपयोगिता खालच्या स्तरापर्यंत समजावून सांगण्यास पाच ते दहा वर्षे लागली होती. नव्या गोष्टींचा स्वीकार करण्याला विरोध नसतो. परंतु, चर्चा निश्चितच होते. प्रश्नही विचारले जातात. हे अत्यंत स्वाभाविक आहे. २०१५ साली जेव्हा ८५ वर्षांनंतर संघाच्या गणवेशातहाफ पॅण्ट बदलून फुल पॅण्ट स्वीकारली गेली, तेव्हादेखीलया निर्णयावर सहमती होण्यास पाच वर्षे लागली आणि नंतर या बदलाला स्वीकारण्यात आले. एवढेच नाही तर लागूही करण्यात आले. म्हणून जिथे पोथीबंद विचारांचा अंधार आहे, तिथे ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’ यांचे महत्त्व आहे. परंतु, जिथे सतत नवनवीन विचारांचे चिंतन होत असते. प्राचीन शाश्वत तत्त्वांच्या आधारावर नव्या गोष्टींचा सहज स्वीकार होत असतो, तिथे ना ‘ग्लासनोस्त’ची, ना ‘पेरेस्त्रोइका’ची गरज असते!

 

प्रसिद्ध गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांच्या एका कवितेतील ओळ आठवली...

रात्रीचे जागरण तर पृथ्वीचे होत असते,

सूर्याची तर कधी रात्रच होत नसते...

याच धर्तीवर-

पोथीबंद विचारांचा अंधार, तेथे ग्लासनोस्तचे महत्त्व आहे...

शाश्वत मूल्यांच्या प्रकाशात सुरू असलेली आविष्काराची परंपरा,

तिथे ‘ग्लासनोस्त’ अप्रासंगिक आहे...


- डॉ. मनमोहन वैद्य


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@