सिंधुताई आणि ‘मी टू’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
 
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना अलीकडेच काही सेक्युलर व लिबरल विचारवंतांनी खडसावले आहे. सध्या गाजत असलेल्या ‘मी टू’ वादावर सिंधुताईंना कुणी प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, जेव्हा अत्याचार झाला तेव्हाच का नाही तक्रार करायची? दहा, पंधरा, वीस वर्षांनी तक्रार करण्याला काही अर्थ नाही. त्यामुळे पुरुष उगाचच बदनाम होत आहेत. सिंधुताई काही राजकारणी नाहीत. सरळसाध्या समाजसेविका आहेत. अनाथांचे दु:ख काळजाला भिडलं म्हणून ते कार्य त्या मनापासून करत आहेत. सेक्युलर, लिबरल छक्के-पंजे त्यांना माहीत नाहीत. तसे असते तर त्या असे बोलल्याच नसत्या. सेक्युलर पठडीतील बाकीचे प्रसिद्धिवलयांकित समाजसेवक कुठे तोंड उघडून राहिले आहेत? तर, झाले काय की, या ‘मी टू’ चळवळीविरुद्ध त्या बोलल्या म्हणून त्यांना फटकारण्यात आले की, ज्या विषयांची माहिती नाही, त्यावर बोलू नये. आपले जे काम आहे, त्यावरच बोलावे. हा उद्धटपणाच नाही, तर हुकूमशाही आहे. ज्यांना आम्ही आतापर्यंत उदार व तटस्थ मानत होतो, ते आतून किती उलट्या काळजाचे आहेत, हे आता बाहेर येत आहे. आमच्याशी तुम्ही सहमत नाहीत तर तुम्हाला बोलायचाही अधिकार नाही. इतकी भयानक जमात आहे ही.
मागे नाही का, डॉ. अभय बंग यांनी संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते, तेव्हा किती गदारोळ झाला होता! या कार्यक्रमाला डॉ. बंग यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्यावर कितीतरी दबाव आला होता. पण, बंग यांनी तो झुगारून दिला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तिथे ते जे बोलले, त्याचा एक लेख करून त्यांनी, महाराष्ट्रातील पुरोगाम्यांचा अभिमान असलेल्या साधना मासिकाला पाठविला. हेतू हा की, आपल्या समविचारी मित्रांना, मी तिथे काय बोललो ते कळावे. साधनाने तो लेख छापला नाही. कारण, डॉ. बंग यांनी, संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून, गुन्हा केला होता. ही यांची वैचारिक पातळी (की लायकी?) म्हणायची का?
 
 
 
हे ‘मी टू’ प्रकरण काय आहे, याची बर्याच जणांना पुरेशी माहिती नाही. ‘मी टू’ म्हणजे ‘मीदेखील.’ लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांच्या समूहात मीदेखील आहे, हे सांगणे. कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडावे लागते, ही बाब एक सभ्य व सुसंस्कृत समाज म्हणून लांच्छनास्पद आहे. शरमेने मान खाली जावी, पुरुष असण्याची लाज वाटावी, असा हा प्रकार आहे. तो समूळ थांबायला हवा, यात दुमत नाही. आतापर्यंत कुणी हा अत्याचार सहन करीत असेल, तर आजपासून तो कुणीही सहन करता कामा नये. अशा पीडितांच्या मागे समाजाने ठाम उभे राहायला हवे आणि तो राहील, याची खात्री आहे. पण म्हणून, या ‘मी टू’ चळवळीत पीडित म्हणून सहभागी होणार्या महिलांच्या तक्रारीचे महत्त्व कमी होत नाही.
 
आजकालच्या संघर्षमय जीवनात, आसपासच्या सहकार्यांना मागे टाकून पुढे जाण्याची प्रत्येक जण खटपट करीत असतो. ती जितकी स्वाभाविक आहे तितकीच ती आवश्यकही आहे. हा संघर्ष पुरुषांच्या आणि महिलांच्या वाट्याला येणारा वेगवेगळा असतो. आपला वरिष्ठ आपले लैंगिक शोषण करीत आहे, हे त्या महिलेला जाणवत नाही असे नाही. पण, काही कारणांमुळे म्हणा, नोकरीच्या आत्यंतिक गरजेमुळे म्हणा, ते या महिला सहन करतात आणि आपले मन पुन्हा कामात गुंतवून प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होतात. काही जणी तो मार्गच सोडून देतात. त्या असल्या अनुभवांचे ओरखडे त्यांच्या मनावर कायमच राहात असतील, यात शंका नाही.
 
 
 
हे सर्व मान्य असतानाही, या ‘मी टू’ चळवळीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहेत. इतक्या वर्षांनंतरच हे सर्व सांगणे का सुरू झाले? आज इतक्या वर्षांनंतर पुराव्यांचे काय? न्यायालयात शेवटी पुरावेच टिकतात ना! पुरुष म्हणतात की हे खोटे आहे. महिला म्हणतात की, हे घडले आहे. कुणावर विश्वास ठेवायचा समाजाने? स्त्रियांच्या बाजूने पक्षपात करायचा का? करायला हरकत नाही. स्त्री-पुरुष समानतेचे कितीही ढोल बडविले तरी अजूनही आपल्या समाजात बर्यापैकी स्त्रीदाक्षिण्य कायम आहे. त्यामुळे समाजाचा साधारण कल स्त्रियांचे म्हणणे सत्य मानण्याकडे असतो. परंतु, याबाबतीत मात्र समाज, या स्त्रियांबाबत सहानुभूती दाखविण्यास कचरत आहे. असे का व्हावे?
 
समाज महिलांबाबत इतका असंवेदनशील का झाला? खरेतर, समाज महिलांबाबत असंवेदनशील झालेला नाही. तो फक्त या ‘मी टू’ महिलांच्या बाबतीतच तसा झाला आहे. कारण, या ज्या महिला, आपल्यावरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घेऊन समोर आल्या आहेत, त्या बहुतेक महिला ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यापासून सर्वसाधारण समाज फार दूर आहे. सर्वसाधारण समाजापासून सर्वस्वी भिन्न वाटावा, इतका फरक या दोन समाजामध्ये आहे. शहरी भाषेत याला ‘पेज थ्री’ संस्कृती म्हणतात. या संस्कृतीत कुठलाच धरबंध नसतो. सर्वकाही मुक्त. मुक्त म्हणजे अगदीच मुक्त. शील, मर्यादा, स्त्रीसुलभ लाज, पौरुषाच्या सीमा... काही म्हणजे काहीच नसते. स्त्री आणि पुरुष यांच्यातील निसर्गत:च असलेली भेदरेषाच त्यांना मान्य नसते. अशा या समाजाशी इतर सामान्य समाज कधीच जुळू शकला नाही. आपला समाज फार मोठा आहे. त्यामुळे असेही काही लोक असतात, असे मानून सर्वसाधारण समाज चूप बसतो. त्यामुळे या संस्कृतीतील लोकांच्या समस्या, उर्वरितांना आपल्या वाटतच नाहीत. उर्वरित समाजाला पैसे कसे वाचवायचे याची भ्रांत असते, तर या पेज थ्री समाजातील लोकांना पैसे कसे खर्च करायचे याची चिंता असते. इतका विरोधाभास असतो.
 
त्यामुळे जेव्हा, ‘मी टू’ चळवळीच्या माध्यमातून विविध महिलांनी आपले भूतकाळातील लैंगिक अत्याचाराचे अनुभव सविस्तर सांगणे सुरू केले, तेव्हा सर्वसामान्य समाजाला ताबडतोब एक प्रश्न पडला की, हे त्यांनी अत्याचार झाला तेव्हा का सांगितले नाही? त्यावेळच्या समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला असता/नसता, हे नंतरचे प्रश्न आहेत. अत्याचार झाला, मनाविरुद्ध घृणास्पद घडले, मग तेव्हाच ते जाहीर करायला हवे होते, अशी माफक अपेक्षा समाजाची आहे. आणि हे नेमके आताच का?
‘मी टू’ चळवळीच्या वर्धापनदिनी अमेरिकेतील तनुश्री दत्ता भारतात येऊन, नाना पाटेकर यांच्यावर दहा वर्षांपूर्वी घडलेल्या गैरवर्तनाचा आरोप का करते? त्यानंतर, पटकथा लिहिल्याप्रमाणे एका मागोमाग एक इतरही महिला आपल्या कथा का सांगणे सुरू करतात? नेमकी हीच वेळ का म्हणून? 2019 साली लोकसभा निवडणुका आहेत म्हणून? की बिशप मुलक्कल बलात्काराच्या आरोपात पुरता फसला म्हणून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी? दुसरे असे की, या सर्वांची प्रकरणेही फार जुनी आहेत. त्यामुळे असेल कदाचित, समाजाची सहानुभूती या महिलांना मिळू शकत नसावी. कुठेतरी पाणी मुरते आहे, हे नक्की!
सर्वसामान्य समाजातील एखाद्या महिलेबाबत जर हा प्रकार घडला असता तरी तिने, माझी नोकरी, माझे करीअर, माझ्या आकांक्षा वगैरे सर्व काही तत्क्षणीच बाजूला ठेवून, एक तर त्या नराधमाला पुरता उघडा पाडला असता किंवा उगाच बदनामी नको म्हणून त्या नोकरीच्या ठिकाणी जाणेच बंद केले असते. काहीतरी घडलेच असते. स्त्रीत्वावर एवढा मोठा घाला पडल्यावर, सर्वसामान्य महिला शांत बसूच शकली नसती. मग या महिला, इतके दिवस नाही तर, इतकी वर्षे शांत का बसल्या? याचे उत्तर उर्वरित समाजाने शोधण्यापेक्षा, त्या महिलांनीच सांगितले पाहिजे. तरच, हा संशय दूर होण्यास मदत होईल.
 
 
 
स्त्री-पुरुष समानता, मुक्त जीवन इत्यादी पाश्चात्त्य संकल्पनांना विकृत रूपात भारतात रुजविणे सुरू झाले आणि त्याला अनेकानेक गोंडस नावे देत, सतत भारतीय प्राचीन संस्कृतीचा उपहास, तिरस्कार करणे सुरू झाले, तेव्हाच या विचारांची केव्हा ना केव्हा चांगलीच फजिती होणार, हे निश्चित होते. ती वेळ आता आली आहे का? मी कशीही वागेन, समाजाने ते सहन केले पाहिजे, कारण माझ्यावर खूप अन्याय झाला आहे, ही मनोवृत्ती कमी झाली तर कदाचित समाजाची सहानुभूती या महिलांकडे वळेल असे वाटते.
@@AUTHORINFO_V1@@