चित्रपट - पाटील: सकारात्मक विचारांचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |



स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा. लि., नचिकेत प्रॉडक्शन, शुभम सिनेव्हिजन प्रा. लिमिटेड निर्मित आणि बॉलिवूड टुरिझम, ए. व्ही. के. एंटरटेनमेंट यांनी ‘पाटील’ हा चित्रपट सादर केला आहे.


आपण आपले करिअर करण्याचा विचार करतो, त्यावेळी सकारात्मक विचारांचा मागोवा घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे घरादाराचा विचार करावा लागतो. प्रेम मिळविण्यासाठी तसेच करिअर घडविण्यासाठी महत्त्वाकांक्षा, जिद्द यांची गरज असते. अशा महत्त्वपूर्ण कल्पनेवर स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा. लि., नचिकेत प्रॉडक्शन, शुभम सिनेव्हिजन प्रा. लिमिटेड निर्मित आणि बॉलिवूड टुरिझम, ए. व्ही. के. एंटरटेनमेंट यांनी ‘पाटील’ हा चित्रपट सादर केला आहे. याचे निर्माते तेजल केतन शाह, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक आहेत. कथा-पटकथा-दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. छायाचित्रण सुधाकर रेड्डी यकांती व राजा यांनी केले आहे. संवाद एस. आर. एम. मिजगर यांनी लिहिले असून, यातील गीते गुरू ठाकूर, समीर पांडा जाफर, संजय वारंग, एस. आर. एम. यांची असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी. एच. हारमोनी, एम. आर. एस. एलियन यांनी दिले आहे. यामध्ये शिवाजी लोटन पाटील, संतोष राममीना मिजगर, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, सुरेश पिल्ले, कपिल गुडसूरकर, प्रतिमा देशपांडे, अभिलाषा पाटील, वर्षा दांडले असे अनेक कलाकार आहेत. शिवाजी पाटील हे एका सरकारी कार्यालयात नोकरी करीत असतात. त्यांचा मित्र भीमा वाघमारे हा तिथेच मोठ्या पदावर असतो. दोघांची बालपणापासूनची मैत्री असते. शिवा पाटीलचा मुलगा कृष्णा याला इंजिनिअर व्हायचे असते पण, कमी गुणांमुळे त्याला सरकारी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही. भीमा वाघमारे यांच्या मदतीने देणगी देऊन खाजगी महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळतो. तेथे पुष्पा वाघमारेशी ओळख होते. दोघांचे प्रेम जमते पण, ते पुष्पाचा भाऊ सम्राट याला आवडत नाही. कृष्णा आणि सम्राट यांच्यात वादावादी होते. कृष्णा गावाला निघून जातो. वडिलांचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे असते. त्यासाठी तो नेमके काय करतो? त्याला मदत कोण करते? पुष्पाचे पुढे काय होते? कृष्णा आणि पुष्पाचे प्रेम सफल होते का? सम्राटचे पुढे काय होते? अशा अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे चित्रपट बघून मिळतील.

 

प्रेम हे आंधळे असते. प्रेम कधीच श्रीमंत-गरीब असा भेदभाव करीत नाही. अनेक भेदभावांच्या सीमारेषा ओलांडून प्रेमाचे खरे अस्तित्व निर्माण होते. तारुण्यात प्रेम जमते. त्यात गुंतून राहिलो, तर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण कसे करणार? आई-वडिलांनी मुलासाठी स्वप्ने पाहिलेली असतात. ती पूर्ण झाली नाहीत, तर दोन मनाच्या विचारांचे सामाजिक युद्ध सुरू होईल. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न, आपले तारुण्यसुलभ प्रेम आणि आपले करिअर पूर्ण करण्यासाठी आपण मनात आदर, प्रेम आणि जिद्द यांचा एकत्रित विचार केला, तर सर्व साध्य होऊ शकते. संतोष राममीना मिजगर यांनी चित्रपट बंदिस्तपणे दिग्दर्शित केला असून, पटकथेने तो गतिमान ठेवला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवाजी पाटील ही महत्त्वपूर्ण भूमिका ताकदीने रंगवली आहे. नरेंद्र देशमुख यांनी कृष्णाची, भाग्यश्री मोटे हीने पुष्पाची, तर सुरेश पिल्ले यांनी भीमा वाघमारेची भूमिका सादर केली आहे. याशिवाय शिवाजी लोटण पाटील, कपिल गुडसूरकर, वर्षा दांडले, यांच्यासुद्धा भूमिका लक्षात राहतात. सुधाकर रेड्डी यकांती व राजा यांचे छायाचित्रण छान असून निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन असून त्यांनी चित्रपट गतिमान ठेवला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचे संगीत सुमधुर आहे. माणसाने आपल्या आयुष्यात आपले करिअर निवडताना आई-वडिलांची सेवा करीत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची मानसिकता अंगीकारली पाहिजेत. त्यांचे आशीर्वाद मिळूनच यशाचा मार्गसुद्धा सापडतो, असा संदेश चित्रपट देतो. एकंदरीत हा चित्रपट ठीक आहे.

 

- दीनानाथ घारपुरे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@