जगाला भेडसावणारा रोग..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018   
Total Views |

 

काही शतकांपूर्वी ज्या आरोग्याच्या समस्या माणसाला भेडसावत होत्या, त्या समस्यांचे आज काय झाले? याचा मागोवा घेतला तर जाणवते की, कधीकाळी जागतिक स्तरावर जे रोग माणसाचा जीव घेतल्याशिवाय राहात नसत, ते रोग आज हद्दपार झाले आहेत. देवी, पोलिओ वगैरेंचा नायनाट झाला आहे. आरोग्यविषयक अज्ञान, निसर्गाविषयीचे भीतीयुक्त अज्ञान आणि दैनंदिन जगण्यासाठीचा संघर्ष यामुळे माणूस या ना त्या कारणाने प्रत्येक शतकात कोणत्या ना कोणत्या विशिष्ट आजाराचा बळी ठरला आहे.
 

अर्थात अज्ञान हाच सर्वात मोठा आजार असल्याने त्यातून उद्भवणारे आजार तर गंभीर असणारच. १४ व्या, १५ व्या शतकाचा विचार करता देवी, कांजण्या, गोवर वगैरेंनी यमदूताचे सेवक बनून जगभरात विध्वंस केला. १६ व्या, १७ व्या शतकात देवी गोवर या आजारांसोबतच महामारी या आजाराने जगभरात धुमाकूळ घातला. तोपर्यंत भारतात अशी वदंता होती की, सिंधू नदी ओलांडून महामारीच्या अंतर्गत येणारे विविध रोग भारतातल्या वातावरणात प्रवेश करू शकत नाहीत. पण १८ वे शतक उजाडले आणि देवी, गोवर, पोलियो आणि सोबत महामारीही भारतात रूजून गेली. अर्थात कारण होते की, तोपर्यंत पाश्चात्त्यांचे बर्‍यापैकी बस्तान भारतात बसले. याचवेळी औद्योगिक क्रांतीचे वारे सावकाश पावलाने भारतात रूजले गेले. त्यानंतर भारतातच काय देशभरात नव्याने काही रोगांची मरणसत्ताच सुरू झाली. त्यापैकी घटसर्प आणि क्षयरोग हे प्रमुख होते. पुढे १९ व्या शतकामध्ये जगभरात पटकी ज्याला इंग्रजीत कॉलरा म्हटले जाते, त्याने माणसाला पटापटा मारण्याचा विडाच उचलला. महाराष्ट्रात तर एखाद्याचे वाईट चिंतायचे झाले तर लोक आजही म्हणतात, ’मेल्या, तुला पटकी येवो.’ तर १९ व्या शतकामध्ये जगाला विविध आजारांनी काबिजच केले. या दरम्यान जगात पटकीसोबतच विषमज्वर म्हणजे टॉयफॉईडनेही जगाला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केले. यासोबतच पितज्वर या रोगानेही जगभरात चांगलेच पाय पसरवले. डांग्या खोकला, फ्लू, मलेरिया, धनुर्वात, न्युमोनिया, पोलिओ या सर्व रोगांनी जगभर आरोग्याच्या गंभीर समस्या उभ्या राहिल्या.२० वे शतक उजाडले आणि आरोग्यसेवेच्या विज्ञानात मोलाची कामगिरी झाली. जगाला भयचकित करून मृत्यूच्या दारात ओढणार्‍या आजारांपैकी कितीतरी आजारांवर जय मिळवण्यास माणसाला यश आले. देवी, घटसर्प, फ्लू, मलेरिया, गोवर, डांग्या खोकला, न्युमोनिया, पोलिओ, धनुर्वात, टॉयफॉईड, पितज्वर, कांजण्या यासारख्या तब्बल १२ आजारांवर २० व्या शतकात माणसाने मात केली.

 
 

पुढे क्षयरोग, कर्करोग, मधुमेह, हदयविकार, कॉलेस्ट्रॉल, रक्तदाब, किडनीसंबंधी आजार, एड्स यांचा हैदोस जगभर सुरू झाला. तो आजतागायत आहे. या सर्वांची जगाला भीती तर वाटतेच पण स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया या आजारांनी जगभरात दहशतवादी काय माजवतील इतकी दहशत माजवली आहेरावणाचे शीर धडावेगळे केल्यावर ज्याप्रमाणे नवीन शीर निर्माण व्हायचे तसेच या रोगांचे आहे. रोगाला नेस्तनाबूत केले की, पुन्हा नव्या दमाने, नव्या जोमाने हे रोग माणसाला गिळायला तयार आहेत. जगभर या आजारांवर संशोधन सुरू आहे. पण या सर्व आजारांच्या पलीकडे आत्महत्या हा नवीन रोग जगाला भेडसावत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार वर्षाला ८० लाख व्यक्ती आत्महत्या करतात. १५ ते २९ वर्षीय व्यक्तींच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे. २०१८ च्या आत्महत्याग्रस्त देशाच्या जागतिक सर्वेक्षणानुसार १७७ देशांचे सर्वेक्षण केले गेले. त्या यादीत श्रीलंका आत्महत्याग्रस्तांच्या क्रमवारीत क्रमांक १ वर तर भारत ३० व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १७० व्या क्रमांकावर आहे तर अँटिग्यू अँड बारूडा या देशात आत्महत्या झालीच नाही म्हणून त्याचा क्रमांक १७७ वा आहे. थोडक्यात २१ व्या शतकामध्ये प्रदूषणामुळे होणार्‍या विविध आजारांसोबतच मानसिक नैराश्य या आजारानेही थैमान घातले आहे. जगभर लोक या आजाराशी लढत आहेत. पण ही लढाई जागतिक स्तरावर लढता लढता माणसाच्या मनातही लढली गेली तरच जगभरातला माणूस या आजारावर मात करेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@