वैद्यकीय क्षेत्राचा दिशादर्शक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |


 


जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्राची दिशा ठरविणाऱ्या अतुल गावंडे यांच्या नावाचा सामावेश ‘टाईम’ मासिकाच्या २०१८च्या अंकात करण्यात आला. त्यानिमित्त गावंडे यांच्या कार्याची ओळख...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘आयुष्मान भारत’ या योजनेप्रमाणेच जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या आणि आरोग्य संरक्षण योजना राबविणाऱ्या’ तीन भारतीयांचा ‘टाईम’ मासिकाने नुकताच गौरव केला. अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल अतुल गावंडे, दिव्या नाग आणि राज पंजाबी यांचा ५० जणांच्या यादीत सामावेश करण्यात आला. अतुल गावंडे यांच्या जागतिक स्तरावरील कामगिरीबद्दल झालेले कौतुक हे भारतासाठी किंबहुना ते मराठी असल्यामुळे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पदच! वैद्यकीय सेवा कमी खर्चात उपलब्ध व्हावी, यासाठी आयुष्य वेचलेल्या गावंडे यांचा आजवरचा प्रवासही तितकाच खडतर आहे. महागडे उपचार आणि औषधे परवडण्यायोग्य व्हावीत, यासाठी तयार केलेली ‘आरोग्य सेवा योजना’ आज लाखो लोकांना आरोग्य संरक्षण कवच देत आहे. ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अॅमेझॉन आणि वित्तीय सेवा देणाऱ्या जे. पी. मॉर्गन कंपन्यांच्या कर्मचार्यांना ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आरोग्य सेवा देण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘टाईम’ मासिकाने त्यांच्या याच योगदानाचा गौरव केला. दहा लाखांहून अधिक कर्मचारी या पारदर्शी सेवेचे लाभार्थी आहेत, हे विशेष. दोन दशकांपासून एक शल्यचिकित्सक, लेखक, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे ख्यातनाम प्राध्यापक, ‘दी न्युयॉर्कर’ या नियतकालिकाचे स्तंभलेखक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील नेतृत्त्व ही अतुल गावंडे यांची ओळख. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची सुरुवात मुळात एका प्रश्नापासून झाली. त्यांना पडलेला प्रश्न असा होता की, ‘जगात कुठेही, कधीही आणि केव्हाही किफायतशीर दरात आरोग्य सेवा पोहोचवता येण्यासाठी काय करावे लागेल?’ औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि डॉक्टरांचे शुल्क कमी करून सर्वांना परवडेल, अशा किंमतीत ही सेवा देण्यावर त्यांनी भर दिला. झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्राचाही वैद्यकीय क्षेत्रासाठी कसा फायदा घेता येईल, याचाही त्यांनी विचार केला. सुरुवातीला ‘अॅरिदने लॅब’च्या मदतीने ब्रीजहॅम आणि हार्वर्ड वुमन्स हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. गावंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून वैद्यकीय क्षेत्रात शिस्त आणण्यावर भर दिला. या माध्यमातून लाखो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी नवनवीन योजना आखल्या. त्यांच्या या कामाने प्रभावित होऊन अमेरिकेतील प्रसिद्ध कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांसाठी आरोग्य योजना तयार करण्यासाठी अतुल गावंडे यांना आमंत्रित केले. पुढे चार कंपन्यांच्या दहा लाख कर्मचार्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गावंडे यांनी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या.

 

जगातील सर्व रुग्णांना समान उपचार मिळायला हवेत, असा त्यांचा संकल्प आहे. वैद्यकीय सेवा क्षेत्राचा वसा त्यांना घरातूनच मिळाला. वडील आत्माराम गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातील. कालांतराने गावंडे कुटुंबीय अमेरिकेत स्थलांतरित झाले. २०१२ मध्ये ‘अरिदने लॅब्स’ या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि विकास या अंतर्गत सुमारे १०० कर्मचारी आणि १०० हून अधिक संस्थांच्या मदतीने वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. अमेरिकेतील सार्वजनिक संस्था, जगभरातील सार्वजनिक संस्था, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक पातळीवरील औद्योगिक संस्था यांच्यासह अनेक संस्थांना त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. त्यातून त्यांना वर्षाला २० दशलक्ष डॉलर्सचा महसूलही मिळत गेला. जून २०१८ मध्ये अॅमेझॉन, जे. पी. मॉर्गन, ब्रकशेअर, हॅथ वे या चार कंपन्यांनी एकत्र येऊन वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका कंपनीची स्थापना केली. गावंडे यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्यानंतरही त्यांनी त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचे काम सुरूच ठेवले. अमेरिकेतील आणि जागतिक वैद्यकीय व्यवस्था सुधारावी, यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना या कार्याबद्दल प्रतिष्ठित ‘मॅक ऑथर’ पुरस्कारही मिळाला आहे. ‘बीईंग मोर्टल’, ‘दी चेकलिस्ट मेनिफेस्टो’, ‘बेटर’, ‘कॉम्प्लिकेशन्स’ ही त्यांची पुस्तके. त्यांच्या ‘चेकलिस्ट मेनिफेस्टो’ या पुस्तकात त्यांनी डॉक्टरांना देव समजणाऱ्या’ रुग्णांच्या मानसिकतेचा फायदा घेणार्यांना लक्ष्य केले आहे. डॉक्टरांनी स्वत: देव होण्यापेक्षा एक माणूस म्हणून रुग्णांची सेवा केली, तर वैद्यकीय क्षेत्राला लागलेला नफेखोरीचा कलंक मिटेल, यावर त्यांनी भाष्य केले. डॉक्टरांच्या चुकांवर बोट ठेवताना हलगर्जीपणामुळे जीव गमावणाऱ्या’ रुग्णांची चूक काय, असा प्रश्नही ते विचारतात. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वर्षाला जगभरात ७० लाख रुग्णांना अपंगत्व येते. १० लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. वैद्यकीय क्षेत्रात काळाबाजार करणार्यांवरही त्यांचा आक्षेप आहे. वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होणारी कारणेही त्यांनी अधोरेखित केली आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी ‘मिशिगन स्टेटनी’ ही संकल्पना मांडली आहे. अमेरिकेत या उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यानंतर अमेरिकेतील मृत्यूदर ६६ टक्क्यांनी घसरला आहे. याद्वारे १८ महिन्यांत १५०० जणांचे जीव वाचले. ‘दी चेकलिस्ट मेनिफेस्टो’ पुस्तकाचा अवलंब केला असता जंतुसंसर्गामुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या ५० टक्क्यांनी घटेल, असा दावा त्यांनी केला आहे. गावंडे गेली २५ वर्षे अमेरिकेतील न्यूटन शहरात राहतात. वडिलोपार्जित मिळालेला वैद्यकीय सेवेचा वसा त्यांनी त्यांच्या तीन मुलांनाही दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रात मूलभूत बदल घडावेत, यासाठी ते कायम प्रयत्नशील आहेत.

 

- तेजस परब

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@