केडीएमटी हा पांढरा हत्ती : सुभाष म्हस्के

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2018
Total Views |



परिवहन व्यवस्था खाजगीकरणाच्या मार्गावर


कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला दर महिन्याला केडीएमटीवर साडेतीन कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र असे असताना दर महिन्याला पालिका प्रशासनाने यातील १ कोटी, ३५ लाख रुपये केडीएमटीला देणे आवश्यक आहे. मात्र या महिन्यात केडीएमटीला आयुक्त बोडके यांनी केवळ १ कोटी रुपयेच दिले. त्यामुळे परिवहन व्यवस्था चालविण्यास एक कोटी रुपये पुरेसे नाहीत, असे सांगत परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के यांनी पालिकेने दिलेला खर्च नाकारला. परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के आणि सदस्य संतोष चव्हाण यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील परिवहन कार्यालयात बुधवारी अचानक भेट दिली. यावेळी म्हस्के आणि चव्हाण यांनी बसचालक आणि वाहक यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी वाहक आणि चालकांनी परिवहन व्यवस्थेतील त्रुटींचा पाढाच वाचला. यानंतर म्हस्के यांनी परिवहन समिती डबघाईला कशी आली आहे, याची माहिती दिली. यावेळी, “केडीएमटीच्या एकूण ११८ बसेस असून त्यातील फक्त ४० ते ४५ बसेस रस्त्यावर धावतात. यातील १० व्होल्वो बसेस असून त्यापैकी फक्त तीन बसेस रस्त्यावर धावतात. परिवहन उपक्रमाचे दिवसाचे उत्पन्न ४ लाख रुपये असून महिन्याला १ कोटी, २० लाख रुपये उत्पन्न आहे.

 

कर्मचाऱ्यांच्या पगारावर १ कोटी ६० लाख रुपये, डिझेलवर ८० लाख रुपये आणि पीएफ आणि देखरेखीकरिता एकूण सव्वा तीन कोटी रुपये खर्च केडीएमटीला होतो. याचा परिणाम केडीएमटीच्या उत्पन्नावर झाल्याने ठेकेदारांची बिले प्रलंबित राहतात. दुरुस्तीला गेलेल्या बसेस सर्व्हिस सेंटरमधून बाहेर पडू शकत नाही. केडीएमटी हा पांढरा हत्ती असून याला पालिका प्रशासनाची योग्य साथ मिळत नाही,” असा नाराजीचा सूर म्हस्के यांनी लावला, तर सदस्य संतोष चव्हाण यांनी, “केडीएमटीचे उत्पन्न घटण्यामागे फक्त प्रशासन जबाबदार नाही तर पालिका प्रशासन आरटीओ आणि वाहतूक पोलीसही जबाबदार आहेत. त्यांचा योग्य पाठिंबा मिळत नाही,”असे मत व्यक्त केले तर दुसरीकडे पालिका हद्दीत केडीएमटीचे उत्पन्न घटण्यावर शहरातील अनधिकृत रिक्षाथांबे जबाबदार असून अशा थांब्यावर रिक्षा उभ्या करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास केडीएमटीच्या अधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांची भेट घेतली असता, “तुम्ही आधी बसेस वाढवा,” असे उत्तर देण्यात आले. या सर्व कारणांमुळे परिवहन व्यवस्था भविष्यात खाजगीकरणाकडे वळेल, असे दिसून येत आहे.

 

एका व्होल्वो बसेसच्या दुरुस्तीचे बिल आठ लाख रुपये

 

परिवहन उपक्रमात २०१५ साली १० व्होल्वो बसेस दाखल झाल्या. कल्याण ते नवी मुंबई आणि डोंबिवली ते नवी मुंबई या मार्गावर व्होल्वो बसेस धावतात. या बसचे तिकीट प्रत्येकी ६५ ते ७० रुपये आहे. या एक बसचे महिन्याचे उत्पन्न सुमारे ९ लाख रुपये होते. मात्र, वसई येथील सर्व्हिस सेंटर येथे तीन व्होल्वो बसेस दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. यातील एक बसचे ६० हजार, दुसऱ्या बसचे ४० हजार तर, तिसऱ्या बसचे तब्बल ८ लाख रुपये बिल झाले आहे. मात्र परिवहन व्यवस्थेने या बसेसच्या दुरुस्तीचे बिल भरले नसल्याने या बसेस रस्त्यावर धावू शकत नाही.

 

डेपोत पालिकेच्या वाहनांत डिझेल भरण्याचे बिल ४७ लाख रुपये

 

पालिकेची सर्व वाहने डिझेल भरण्यास परिवहन व्यवस्थेच्या गणेश घाट येथील डेपोत जातात. या महिन्यात याचे ४७ लाख रुपये बिल आले आहे. पालिका प्रशासनाने यापैकी फक्त ३० लाख रुपये भरले आहेत. अजून १७ लाख रुपये बिल भरणे बाकी आहे. याचा केडीएमटीच्या सेवेवर परिणाम होत असून पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सभापती सुभाष म्हस्के यांनी सांगितले.

 

कल्याण- डोंबिवली बससेवा बंद

 

दिवसाला साडेतीन हजार रुपये उत्पन्न मिळत असलेल्या कल्याण-डोंबिवली मार्गावरील बससेवा काही महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. पुन्हा ही बससेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. मात्र पुन्हा या मार्गावर बससेवा सुरू केल्यास पूर्वीप्रमाणे प्रवासी मिळण्यास कमीत कमी ३ महिने लागतील, असे एका बसवाहकाने सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@