तीन मूर्ती-हैफा चौक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
१९४८ साली हैफा बंदर आणि आजूबाजूच्या पॅलेस्टाईन प्रदेशातूनच इस्रायल हा ज्यू लोकांचा नवाच देश निर्माण झाला. आज इस्रायलसह मध्यपूर्वेतल्या अन्य देशांमध्ये किमान ९०० भारतीय सैनिक चिरविश्रांती घेत आहेत.
 
 

दि. २३ सप्टेंबर २०१८ ची दुपार. राजधानी नवी दिल्लीच्या साऊथ अॅव्हेन्यू भागातील तीन मूर्ती-हैफा चौक घोड्यांच्या शिस्तबद्ध टापांनी गजबजला होता. भारतीय सेनेच्या ६१ व्या घोडदळ पथकाच्या पराक्रमगाथेचा शंभरावा स्मृतिदिन साजरा होत होता. उंच, देखणे, तगडे, उत्तम सजवलेले, फुरफुरणारे घोडे आणि त्यांच्यावर स्वार झालेले राजपूत, मराठा आणि कायमखानी (म्हणजे मुसलमान राजपूत) सैनिक यांच्या पथकासह अनेक उच्च अधिकारपदस्थांनी तीन मूर्ती स्मारकाला पुष्पचक्रांची मानवंदना दिली. त्यात सेनाप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल एम. जे. एस. कहलोन आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांसह ब्रिटन व इस्रायल देशांचे मिलिटरी अॅटेशे, तसंच इस्रायली वकिलातीच्या शार्झ-डि-अफेअर्स माया कादोश यांचाही समावेश होता. त्याच दिवशी सकाळी ६१ व्या घोडदळ पथकाचं मुख्यालय जे जयपूर, तिथल्या लष्करी छावणीत खूपच मोठं आणि थाटाचं असं घोडदळ संचलन झालं. सेनाप्रमुख जनरल रावत यांनी मानवंदनेसह एका डाक तिकिटाचंही अनावरण केलं. त्यानंतर सगळेच जण ‘बडा खाना’मध्ये सामील झाले. ‘बडा खाना’ याचा अर्थ पथकातल्या अगदी सामान्य ऑर्डलीपासून ते प्रमुखापर्यंत सगळे जण त्या वेळी एकत्र जेवायला बसतात. गप्पा, थट्टामस्करी, हास्यविनोद करीत जेवणं होतात. आपलं पथक हे एक कुटुंब आहे, असा भाव यातून निर्माण होत असतो. जेवणानंतर जनरल रावत दिल्लीला रवाना झाले.

 

तिकडे इस्रायलमध्ये खुद्द हैफा शहरात, तिथल्या मंडळींनी त्यांच्या सोयीप्रमाणे हा अभिवादनाचा कार्यक्रम २३ सप्टेंबरऐवजी ६ सप्टेंबर २०१८ रोजीच साजरा केला. त्याला भारताचे इस्रायलमधील राजदूत पवन कपूर यांच्यासह ६१ व्या घोडदळ पथकाचे प्रतिनिधी म्हणून मेजर जनरल व्ही. डी. डोग्रा; हैफाच्या लढाईत वीरमरण आलेल्या कॅप्टन अमनसिंग महादूर यांचे नातू ब्रिगेडियर एम. एस. जोधा आणि जोधपूरचे राजे महाराज गजसिंह हे उपस्थित होते. या प्रसंगी हैफा शहराचे महापौर यॉना याहाव यांनी फारच उत्कट भाषण केलं. “या लोकांनी, या मेजर दलपतसिंग शेखावतांनी आणि त्यांच्या शूर सैनिकांनी माझ्या शहराचाच नव्हे, तर सगळ्या मध्यपूर्वेचाच इतिहास बदलून टाकला. मला जेव्हा हा सगळा वृत्तांत समजला, तेव्हा मी भारावून गेलो. मी ठरवलं की, माझ्या देशातल्या विद्यार्थ्यांना हा इतिहास समजला पाहिजे आणि आज माझ्या देशातल्या तिसरी ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांत हे सगळं शब्दांकित झालं आहे. आमची भूमी तुर्कांच्या ताब्यातून कुणी मुक्त केली, हे आता विद्यार्थ्यांना माहीत झालं आहे.” भारतीय राजदूत पवन कपूर म्हणाले, “या शूरवीरांनी मायभूमीपासून इतक्या दूरच्या अनोळखी देशात पराक्रम गाजवला, आपले रक्त सांडले. या कार्यक्रमामुळे आम्हाला समजले की, स्थानिक लोक त्यांना विसरलेले नाहीत.”

 

या २०१८ सालच्या सुरुवातीलाच म्हणजे १४ जानेवारी २०१८ रोजी, संक्रांतीच्या दिवशी भारताच्या राजनैतिक क्षेत्रात एक वेगळं संक्रमण घडलं होतं. भारताच्या सर्वसामान्य जनतेला कौतुक वाटणाऱ्या; पण भारताच्या शेळीमेंढीछाप काँग्रेसी सरकारांच्या भीतीचा विषय असलेल्या इस्रायल देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच अधिकृत भारतभेटीवर आलेत्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तीन मूर्ती स्मारकाला पुष्पचक्र वाहिलं आणि तीन मूर्ती चौकाचं ‘तीन मूर्ती-हैफा चौक’ असं नवीन नामकरण केलं. या सगळ्या घटनाक्रमाला १०० वर्षांचा इतिहास आहे. १९१४ साली युरोपात महायुद्ध सुरू झालं. एका बाजूला जर्मनी-ऑस्ट्रिया-हंगेरी-तुर्कस्तान विरुद्ध फ्रान्स-ब्रिटन-रशिया-अमेरिका असं हे युद्ध भडकत-भडकत चार वर्ष, १९१४ ते १९१८ चालू राहिलं. यावेळी भारतावर इंग्रजांची हुकूमत होती. इंग्रजांनी भारतीय सैनिक आणि ब्रिटिश अधिकारी यांचं बनवलेलं सैन्य ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून होतंच. शिवाय इंग्रजांचे मांडलिक असणाऱ्या संस्थानिकांची आपापली सेना होती. या सर्व सैन्याला प्रथम युरोपात फ्रान्समध्ये आणि नंतर मध्यपूर्वेत पाठविण्यात आलं. ब्रिटिश सेनापती जनरल एडमंड अॅलनबी याच्या हाताखालच्या सैन्याशी त्यांना जोडण्यात आलं.

 

भारतीय सैन्यातल्या संस्थानी सैन्यपथकांत घोडेस्वार आणि भालाईत यांच्या तुकड्या होत्या. आधुनिक युद्धतंत्रात भाले, तलवारी आणि घोडे हे सगळंच कालबाह्य झालं होतं. तरीही या संस्थानी सेना भाले-तलवारीसह बंदुकाही वापरत. ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांनी हैदराबाद, म्हैसूर, जोधपूर, पतियाळा, अलवर, काश्मीर, काठेवाड आणि ईडर एवढ्या संस्थानांच्या कॅव्हलरी आणि लान्सर्स म्हणजे घोडेस्वार व भालाईत तुकड्यांना एकत्र केलं आणि नाव दिलं, ‘१५ वी इंपीरियल सर्व्हिस कॅव्हलरी ब्रिगेड.’ आज आपण जिला मध्यपूर्व म्हणतो, म्हणजे सौदी अरेबिया, इराक, यमन, उमान, दुबई, अबुधाबी, जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन, इस्रायल इत्यादी सगळे देश हे त्यावेळी तुर्कांच्या ऑटोमन एम्पायरचा भाग होते. तुर्कस्तान जर्मनीचा मित्रदेश होता. त्यामुळे जनरल अॅलनबीकडे अशी कामगिरी होती की, इजिप्तपासून उत्तरेकडे सरकत संपूर्ण अरेबियन द्वीपकल्पच तुर्कांच्या तावडीतून सोडवायचं. १९१८ सालच्या हिवाळ्यापासून तुर्की सेना माघार घेऊ लागल्या. ब्रिटिश सेना मध्यपूर्वेतलं एकेक महत्त्वाचं ठाणं काबीज करीत हैफा शहरापर्यंत आल्या. हैफा हे भूमध्य समुद्राच्या काठावरचं एक फारच महत्त्वाचं बंदर आहे. हैफा ताब्यात आलं की, दोस्त सैन्याला व्यापारी पुरवठा आणि सैनिकी वाहतूक दोन्ही गोष्टी सुकर होणार होत्या. याच कारणाने तुर्की सैन्याने हैफाचा उत्तम बंदोबस्त केला होता.

 

२३ सप्टेंबर, १९१८ या दिवशी सकाळी दोस्तांच्या १५ व्या इंपीरियल सर्व्हिस कॅव्हलरी ब्रिगेडने म्हणजे मुख्यतः जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबाद लान्सर्सनी हैफावर कजाखी हल्ला चढवला. तुर्कांच्या तोफा आणि मशीनगन्सच्या माऱ्याला युक्तीने चकवत, हैफा शहराच्या बाजूने वाहणाऱ्या किशोन नदीच्या दलदलयुक्त भूमीला टाळत हे बहाद्दर हैफाच्या अगदी जवळ भिडले आणि अगदी जवळ भिडल्यावर तर त्यांनी कमालच केली. त्यांनी बंदुका बाजूला ठेवल्या आणि ४०० भारतीय घोडेस्वार भाले नि तलवारी उपसून १५०० तुर्कांवर तुटून पडले. जबरदस्त कचाकची झाली. परिणामी दोन जर्मन अधिकारी, २५ तुर्की अधिकारी, ६६४ शिपाई, २ तोफा आणि १० मशीनगन्स ताब्यात आल्या आणि हैफा काबीज झालं. भूमध्य समुद्रातला दोस्त सैन्याचा पुरवठा मार्ग ताब्यात आला. जोधपूर लार्न्ससचा मेजर ठाकूर दलपतसिंग शेखावत, हा या आक्रमणाचा म्होरक्या जबर जखमी होऊन दुसऱ्या दिवशी मरण पावला. कॅप्टन अनूपसिंग, कॅप्टन अमनसिंग बहादुर, सेकंड लेफ्टनंट सगतसिंग, दफादार जोरसिंग यांनीही मोठा पराक्रम केला. पुढे महायुद्धानंतर ही सगळी मध्यपूर्व अँग्लो-फ्रेंचांनी आपल्या ताब्यात घेतली. आणखी पुढे म्हणजे १९४८ साली हैफा बंदर आणि आजूबाजूच्या पॅलेस्टाईन प्रदेशातूनच इस्रायल हा ज्यू लोकांचा नवाच देश निर्माण झाला. आज इस्रायलसह मध्यपूर्वेतल्या अन्य देशांमध्ये किमान ९०० भारतीय सैनिक चिरविश्रांती घेत आहेत. खरं पाहता, या युद्धाशी भारताचा काहीही संबंध नव्हता. इंग्रजांचे गुलाम म्हणून भारतीय सैनिक भाडोत्री, पोटार्थी सैनिकांप्रमाणे एका पूर्णपणे अपरिचित, परक्या भूमीवर लढले आणि मेले. पण, या युद्धानेच भारतीय सैनिकाला आधुनिक यांत्रिक युद्धाचा, युद्धतंत्राचा परिचय करून दिला, जो स्वतंत्र भारताच्या सैन्यासाठी आत्यावश्यक होता.

 

नव्या दिल्लीतील व्हाईसरीगल लॉज म्हणजे व्हाईसरॉयच्या निवासस्थानापासून (आताचं राष्ट्रपती भवन) जवळच इंग्रजांनी १९२२ साली एक स्मारक उभारलं. त्रिशंकूच्या आकाराच्या एका स्तंभाभोवती जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबाद संस्थानांचे लढवय्ये त्यांच्या विशिष्ट लष्करी गणवेशात उभे आहेत. स्तंभाच्या चौकोनी शिळेवर मध्यपूर्वेतल्या लढायांच्या ठिकाणांची नावे कोरलेली आहेत. १९३० साली या तीन मूर्ती स्मारकासमोर भारताच्या ब्रिटिश सेनाप्रमुखांचं भव्य निवासस्थान उभं करण्यात आलं, त्यावेळी त्याला नाव देण्यात आलं, ‘फ्लॅगस्टाफ हाऊस.’ स्वातंत्र्यानंतर हाच बंगला पंतप्रधान निवास झाला. समोरच्या स्मारकावरून त्याचं नाव ठेवण्यात आलं ‘तीन मूर्ती भवन.’ पंतप्रधान पंडित नेहरूंची संपूर्ण कारकीर्द इथे घडली. १९६४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर नवे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी इथे राहायला येण्याऐवजी स्वतःच पुढाकार घेऊन त्याला पंडित नेहरूंचं स्मारक बनवलेत्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर १५ व्या इंपीरियल ब्रिगेडचं पुनर्संघटन होऊन तिला ६१ वी कॅव्हलरी ब्रिगेड बनविण्यात आलं. आता प्रत्यक्ष लढाईत घोडे वापरले जात नाहीत. पण तरीही प्रदर्शनीय समारंभांकरिता भारतीय सेनादलाने हे अश्वपथक जपलं आहे. इंग्रजी कालखंडात उभारलेली स्मारकं ही त्याज्य न ठरवता भारतीय सैनिकांच्या क्षात्रतेजाची आठवण करून देणारी स्मारकं असा सकारात्मक आयाम त्यांना देण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@