बंधमुक्तीचा मार्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
कर्म करूनदेखील तो अकर्ता असतो. तो जन्माचं सार्थक करून घेतो. त्यामुळे कर्म त्याला बाधक ठरून बंधनात अडकवत नाहीत. अशा जीवाला अभिमान, अहंकार याचा वारा स्पर्श करत नाहीत. तो ज्ञानी भक्त होऊन भगवंताच्या गळ्यातील कौस्तुभमणी होतो. मग त्याला जन्म-मृत्यूचं भय उरत नाही. त्यांची जन्मांच्या कैदेमधून कायमची सुटका होते.
 

प्रत्येक कर्म फळ देऊन शांत होतं. कर्म म्हणजे केलेली प्रत्येक कृती. कोणतीही कामं केली की त्याची फळंही मिळतात. मागितली नाही तरी, ती प्राप्त होतातच. कोणत्या उद्देशाने कर्म करतो त्यावर चांगलं किंवा वाईट फळ पदरात टाकलं जातं. जीव कर्माची फळं भोगण्यासाठी जन्म घेतो. जितकी कर्म तितके जन्म घ्यावे लागतात. जशी वासना तसा जन्म प्राप्त होतो. समर्थ रामदास स्वामी सांगतात,

 

वासनेसंगे जन्म घेणे ।

 

इच्छा, वासना यामध्ये जीव मृत्युसमयी घोटाळला की त्याला त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. या कर्म, इच्छा, वासनांना अंत नाही. प्रत्येक जन्मामध्ये हे घडतच राहतं. या कर्माच्या कठीण डोंगराला नेस्तनाबूत करायचं कसं? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

 

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश केला आहे, “हे अर्जुना, तू कर्म करताना त्यामध्ये अडकू नकोस.निष्काम भावनेने कर्म कर. कामनारहित कर्म केल्यामुळे तुला त्रास होणार नाही. कर्मामध्ये तू आसक्त होऊ नकोस. आसक्ती असली की मनानंही चिकटणं आलंच आणि जो मनानं चिकटला तो जन्मोजन्मी चक्रात फिरत राहील.” गीतेत अर्जुनाला श्रीकृष्णानं समजावून सांगितल्यामुळे आपल्याला कळलं; नाहीतर कर्माच्या फळापासून सुटण्याचा मार्ग सापडणं कठीण झालं असतं. “अर्जुना, तू कौरवांशी युद्ध कर. त्यांचा पराभव कर. हातात शस्त्र धर आणि युद्धाला प्रारंभ कर. तू धर्मयुद्ध करतो आहेस. अधर्म नाहीसा करतो आहेस. धर्माला विजय मिळणार, हे नक्की आहे. तू धर्माच्या बाजूने लढतोस म्हणून मी तुझ्या बाजूने आहे.” जिथे धर्म असतो ना तिथे मी असतो,”असं भगवंत अर्जुनाला मोठ्या प्रेमानं कथन करतात. धर्मयुद्धाचं सारथ्य प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर करत होता. एक गोष्ट किंवा युक्ती सांगतात, “कर्तृत्व’ स्वत:कडे न घेता कर्म केलं की ते बाधत नाही. जन्माला बंधनकारक ठरत नाही.’ प्रत्येक कर्मामधून ‘कर्तृत्व’ काढून टाकलं की सगळं सोप्पं होऊन जातं. परंतु, प्रत्येक जीव ‘कर्तृत्व’ स्वत:कडे घेऊन ‘मी’मध्ये अडकतो. त्यामुळे तो अनेक जन्मांना स्वत:च कारणीभूत ठरतो. निर्लेप वृत्तीनं कर्म करणं गरजेचं आहे. निर्लेपता ही कला आहे. ती साध्य करण्यासाठी जप, पारायण, ध्यान ही साधनं आहेत. ही साधनं घेऊन साधना करायची. अलिप्तता, निर्लेपता हे गुण बंधमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतात. सकल संतांनी सहजभावानं साधना केली. समाजाला साधनेकडे वळवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

 

‘मी’पणा, कर्तृत्वभाव, अहंभाव संपवण्यासाठी साधना करायची. करवून घेणारा भगवंत आहे. सगळं भगवंताच्या इच्छेनं घडतं. आपण फक्त निमित्त असतो. हे एकदा समजलं, याचं आकलन झालं की सेवाभाव रुजतो. मग, सगळं अज्ञान संपून जातं. ज्ञानसूर्य उदयाला येतो. सगळीकडे प्रकाश पसरतो. अज्ञानाचा अंधःकार नष्ट होतो. ‘मी’पणामुळे प्राप्त झालेलं दु:ख दूर जातं. जीव मुक्तावस्था उपभोगतो. देह ठेवण्याआधीच त्याला मुक्तीचा आनंद घेता येतो. या सुंदर सहजावस्थेलाच ‘सहजसमाधी’ म्हणतात. एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराज लिहितात,

 

निराभिमान निरवधी।

त्या नांव अखंड समाधी॥

 

अभिमानरहित राहीलं की देहबंधात अडकत नाही. अहंकार संपला की समाधीसुख प्राप्त होतं. अहंकार संपून गेलेल्या, निपटून काढलेल्या भक्ताला प्रत्येक क्षणाला समाधीचा आनंद मिळतो. वासना संपल्या की संपल्प-विकल्पसंपतात. त्यामुळे दु:खाचा लवलेशही उरत नाही.

 

ऐशी जे स्वैर समाधिअवस्था।

तोच भोग भोगोनि अभोक्ता।

कर्म करोनि अकर्ता।

जान तत्त्वतां तो एक॥

 

कर्म करूनदेखील तो अकर्ता असतो. तो जन्माचं सार्थक करून घेतो. त्यामुळे कर्म त्याला बाधक ठरून बंधनात अडकवत नाहीत. अशा जीवाला अभिमान, अहंकार याचा वारा स्पर्श करत नाहीत. तो ज्ञानी भक्त होऊन भगवंताच्या गळ्यातील कौस्तुभमणी होतो. मग त्याला जन्म-मृत्यूचं भय उरत नाही. त्यांची जन्मांच्या कैदेमधून कायमची सुटका होते. सद्गुरू प्राप्ती होऊन त्यांच्या सांगण्यानुसार मार्गक्रमण आवश्यक आहे. सुविचार, सुसंगत, सुमती या तीन ‘सु’चा सुपरिणाम साधला जातो. सकारात्मकता संजीवनी होते. सात्त्विकतेचा सुगंध दरवळतो. देहाभोवती तेजोवलय तयार होतं. देहाभिमान गळून गेल्यावर ‘मी’पणा छळण्याचा प्रश्नच संपतो. प्रत्येक कर्माला भगवंताच्या भक्तीचं अष्टगंध अष्टसात्त्विक भावनेनं लावलं जातं. कर्मामध्ये आसक्ती उरतच नाही. त्यामुळे बंधनांचे, जन्मांचे फेरे सुटतात. ‘बंधमुक्त’ अशी अप्रतिम अवस्था प्राप्त होते. हाच तर स्वर्ग आहे. त्या स्वर्गसुखाचीदेखील अभिलाषा नसलेला जीव भगवंताला प्रिय असणे स्वाभाविक आहे.

 
 
- कौमुदी गोडबोले
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@