आता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018
Total Views |



मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सध्या मुस्लीम कट्टरतावादी पक्ष एमआयएमशी युती केली असून या दोन्ही पक्ष सध्या सर्वत्र मैत्रीच्या आणाभाका घेताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर आता प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दिन ओवेसींसोबतची ही मैत्री पक्की व्हावी यासाठी ओवेसींच्या भूमिकाही स्वीकारायच्या ठरवलेले दिसते. म्हणूनच, आता प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसींच्या पावलावर पाऊल ठेऊन चक्क ‘वंदे मातरम्’लाही विरोध केला आहे.

 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच परभणी येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी वंदे मातरमबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, वंदे मातरम् हवेच कशाला, असाही प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. एमआयएमने अनेकदा आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी उघड भूमिका घेतली आहे. ही भूमिका आपल्याला मान्य आहे काय, अशा आशयाचा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् हवे कशाला?” राष्ट्रगीत म्हणणारे सर्वचजण भारतीय असल्याचे सांगत आपला मित्रपक्ष एमआयएमप्रमाणेच भारिप बहुजन महासंघाचाही वंदे मातरमला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

पुरोगामी आणि अभ्यासूपणाची प्रतिमा जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी आघाडी केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. एमआयएम हा पक्ष अनेकदा राष्ट्रवादविरोधी भूमिका घेत आला असून धार्मिकदृष्ट्या प्रक्षोभ निर्माण करणारी, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी भूमिका या पक्षाचे ओवेसी बंधू अनेकदा उघडपणे घेतात. अशा पक्षासोबत जाऊन आता थेट वंदे मातरम् लाच विरोध करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना ओवेसींचा ‘वाण नाही पण गुण लागला’ असल्याची उपरोधिक टीका सध्या समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

 

लोकसभेच्या सर्व जागा लढवणार

 

भारिप बहुजन महासंघ आणि मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएमची ही आघाडी लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जागा लढणार असल्याचे सांगत काँग्रेसशी आघाडी होणे अशक्य असल्याचे स्पष्ट संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले. काँग्रेसला आमच्याशी मैत्री करायची असती तर एव्हाना हालचाली झाल्या असत्या परंतु गेले दोन महिने काहीही हालचाल नाही, असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@