भविष्य सांगण्याचा धंदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2018   
Total Views |



२०१४ सालच्या लोकसभा आणि तद्नंतरच्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने त्याआधी १०-१५ वर्षे सत्तेत असलेल्यांना भरपूर मोकळा वेळ मिळाला. काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना अतिव्यस्त दिनक्रमामुळे शेतकऱ्यांच्या, वनवासींच्या, ग्रामीण जनतेच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहायला वेळ नसलेल्यांना सत्ता गेल्यानंतर मात्र मुलाखतींचे समारंभ साजरे करायलाही वेळ मिळू लागला. हो, मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातल्या त्यात शरद पवारांचाच आहे. जाणतेपणाची बिरुदावली मिरवणाऱ्या शरद पवारांना गेल्या साडेचार वर्षांत रिकामटेकडे राज ठाकरे वगळता अन्य कोणी काही फार भाव दिल्याचे दिसले नाही. महाआघाडीची चर्चा सुरू होती, तेव्हाही शरद पवार कोणालाही नकोसेच वाटत होते, अर्थात ते त्यांच्या विश्वासघातकी गुणावगुणांमुळेच. दोन्ही डगरींवर पाय ठेऊन स्वतःचा जास्तीत जास्त स्वार्थ कसा साधता येईल, हेच राजकारण शरद पवारांनी केले व त्याचीच फळे त्यांना वेळोवेळी मिळालीही. आता २०१९ च्या निवडणुकीनंतरही लोकसभा असो वा विधानसभा, सत्तेवर येण्याची कुठलीही संधी नसल्याचे ओळखून चाणाक्ष शरद पवारांनी नवीनच दुकान थाटल्याचे समोर आले. स्वतःला पुरोगामी म्हणवत श्रद्धाळूंच्या भावभावनांना अंधश्रद्धेचे लेबल चिकटविणाऱ्या शरद पवारांनाही काहीतरी वेगळे करून दाखवण्याची हुक्की आली. मग मोदीबागेत की गोविंदबागेत कुडमुड्या ज्योतिषासारखे भविष्य सांगण्याचे उद्योग शरद पवारांनी सुरू केले. भविष्य सांगण्याच्या व्यवसायात प्रसिद्धी आणि पैसाही असल्याने शरद पवारांनी नुकतेच, २०१९ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी सत्तेत येणार नसल्याचे भाकीत केले. खरे म्हणजे ज्यांना स्वतःच्या राजकीय भविष्याचाच अगदी काँग्रेसची शकले होण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करेपर्यंत आणि नंतरही वेध घेता आला नाही, त्यांनी अन्य कोणाचे भविष्य वर्तवणे म्हणजे मोठा विनोदच. दुसरीकडे पवारांनी असेही सांगितले की, “आगामी काळात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल.” बरोबरच आहे, ज्याला जिथे आपला फायदा दिसतो, त्याला बरोबर तसेच काहीतरी घडावे, असे वाटत असते. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर आपल्याला सत्तेची लॉटरी लागू शकते, शिवाय कुठल्यातरी गूढ पॉवरच्या जोरावर अन्य काही जुळवाजुळवही करता येऊ शकते, हा त्यांचा यामागचा होरा असावा. म्हणूनच पवारांना असली विधाने करून चर्चेत राहण्याची हौस होत असावी. पण जनता सुज्ञ आहे आणि जनतेला सत्तेवर टपलेल्या बोक्यांना दूर ठेवण्याची कलाही चांगलीच अवगत आहे, हे पवारांनी लक्षात ठेवलेले बरे.

 

उमेदवारांनाच काँग्रेस नकोशी!

 

गर्भश्रीमंत घरातल्या एखाद्या लाडावलेल्या पोराला महागडे खेळणे द्यावे आणि त्याने त्या खेळण्याचीच माती करून टाकावी, तसा काहीसा प्रकार राहुल गांधींचा सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसेपर्यंत आणि त्यानंतरही राहुल गांधींनी स्वतःच आपल्या पक्षाची वासलात लावण्यात पुढाकार घेतला. सदासर्वकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि रा. स्व. संघाच्या नावाने खडे फोडत जनतेला आपल्यामागे खेचण्याचे प्रयत्न त्यांनी चालवले. पण ज्यांची अकार्यक्षमता जनतेला चांगलीच माहिती आहे, त्यांना जनतेने कार्यक्षमपणे सत्तेपासून दूर ठेवण्याचेच धोरण स्वीकारले. गेल्या साडेचार वर्षातल्या निरनिराळ्या निवडणुकांतही त्याचा प्रत्यय सर्वांनाच आला. बेछूट, बेभान आणि बेताल विधाने करायची, ज्याचा कशाशी ताळमेळ नाही, त्याचा संबंध कशाशीही जोडायचा आणि वर मतांचा जोगवा मागायचा, हा शिरस्ता राहुल गांधींनी चालवला. शिवाय अॅन्थनी अहवाल जसा काही आपल्या मनीमानसी कोरून ठेवल्यासारखा राहुल गांधींनी हिंदू मठ-मंदिरांचे उंबरठे झिजवण्याचाही खेळ मांडला, पण एवढे सगळे करूनही राहुल गांधींच्या हाती भल्यामोठ्या शून्याशिवाय दुसरे काही लागलेही नाही. आता आपल्या नेत्याच्या अन् पक्षाच्या नाकर्तेपणाची त्याच पक्षातल्या उमेदवारांनाही खात्री पटल्याचे नुकत्याच समोर आलेल्या एका ध्वनिचित्रफितीतून उघड झाले. मध्य प्रदेशच्या राऊ मतदारसंघातून काँग्रेसतर्फे विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या जीतू पटवारी यांनी मतदारांकडे मते मागताना स्वपक्षालाच वाऱ्यावर सोडले. “माझ्याकडे लक्ष द्या, माझी अब्रू राखा, पक्ष गेला तेल लावत,” अशा शब्दांत जीतू पटवारी यांनी मतदारांकडे निवडून देण्यासाठी याचना केली. म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून जो पक्ष सत्तेत नाही, तो पक्ष आजही मध्य प्रदेशात लोकांसाठी नकोसा असल्याचे त्याच पक्षाच्या उमेदवाराने कबूल केल्याचे यावरून स्पष्ट होते. अॅण्टी इन्कम्बन्सीचा आपल्याला फायदा होईल, या आशेवर स्वतःच्या पक्षाची विकासविषयक कोणतीही धोरणे जाहीर न करणाऱ्या पक्षाला त्याच पक्षाच्या उमेदवाराने दिलेला हा घरचा आहेरच म्हणता येईल. अशा परिस्थितीत उमेदवारानेच जर पक्षाकडे पाहू नका, म्हणत पक्षाची लायकी जनतेसमोर मांडली तर जनता काँग्रेसला कशाला निवडून देईल. शिवाय उमेदवारावर काँग्रेसचे नावही लपविण्याची वेळ का आली, याचा त्या पक्षानेही विचार करणे गरजेचे आहे. अर्थात भेटायला आलेल्या नेते-कार्यकर्त्यांपेक्षाही ज्यांना पाळीव कुत्र्याशी खेळणे जास्त महत्त्वाचे वाटते, ते याचा विचार करतीलच, याची काय खात्री?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@