वृक्षपूजा : बिल्ववृक्ष, अशोक आणि शमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018   
Total Views |

 


 
 
बिल्ववृक्ष
 

बिल्ववृक्ष म्हणजे बेलाचं झाड. ‘बिल्व’ हे त्याचं संस्कृत नाव. यालाच हिंदीत ‘बिली’, गुजरातीत ‘बीली’, कानडीत ‘बेला’ तसंच संस्कृतमध्ये ‘त्रिपत्रक’ आणि ‘शिवद्रुम’ म्हणतात. या मध्यम उंचीच्या पानझडी वृक्षाचं मूळ स्थान उत्तर भारत असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र झाला आहे. याची पोपटी रंगाची त्रिदल पानं मार्च-एप्रिल महिन्यात झडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी नवी पालवी येते. फुलं हिरवट पांढरी आणि सुगंधी असतात. बेलाचं लाकूड होमहवनाकरिता पवित्र मानलं आहे. आयुर्वेदात बेलफळ हे रेचक आणि पोटाच्या विकारांवर औषध म्हणून सांगितलं आहे.

 

वड, पिंपळ, तुळशीप्रमाणेच बेलाच्या झाडालाही पौराणिक इतिहास आहे. भारतीय संस्कृतीत पवित्र मानल्या गेलेल्या या वृक्षाला शिवाच्या पूजेत महत्त्वाचं स्थान आहे. मंदिरांच्या आसपास बेलाची झाडं सर्रास दिसतात. वैदिक वाङ्मयात याला यक्षीय वृक्षाचं स्थान आहे. पाणिनीची अष्टाध्यायी, महाभारत, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, शतपथ ब्राह्मण, अथर्ववेद, ऐतरेय ब्राह्मण अशा अनेक संस्कृत ग्रंथांत याचा उल्लेख आहे. याला कश्यप सृष्टीतील वृक्ष मानतात. कोणी म्हणतात की, लक्ष्मीच्या तपप्रभावाने बिल्ववृक्षाची उत्पत्ती झाली, तर कोणी म्हणतात की, बिल्ववृक्ष हा आदिकल्पात ब्रह्मदेवाने उत्पन्न केला. शिवरहस्यात बिल्ववृक्षाचं माहात्म्य सांगितलं आहे. ते असं,

 

मूलतो भवरूपाय मध्यतो मृदुरूपिणे ।

अग्रत: शिवरूपाय पत्रैवेदस्वरूपिणे ।

स्कंधे वेदांतरूपाय तरूराजाय ते नमः ॥

 

अर्थ - हे बिल्ववृक्षा, तू मूलभागी भवरूप आहेस, मध्यभागी मृदुरूप आहेस व अग्रभागी शिवरूप आहेस. तुझे त्रिदल हे तीन वेदांच्या रूपाने आहे. तुझ्या शाखा उपनिषदरूप आहेत. हे वृक्षराजा, तुला नमस्कार असो.  बिल्वपत्रे शिवाला अत्यंत आवडतात. त्यासंदर्भातील श्लोक असा,

 

सर्वकामप्रदं बिल्वम् दारिद्रस्य प्रणाशनम ।

बिल्वात्परतरं नास्ति येन तुष्यति शंकर: ॥

 

अर्थ - बिल्ववृक्ष हा सर्व कामना पूर्ण करणारा व दारिद्—याचा नाश करणारा आहे. बिल्वपत्रापेक्षा शंकराला प्रिय व संतोष देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही.

 

बिल्वपत्रावाचून केलेली शिवपूजा निरर्थक आहे असं सांगितलं आहे, काही ठिकाणी स्त्रिया आपल्याला पतीचं प्रेम अविच्छिन्न लाभावं म्हणून बेलाची पूजा करतात. ‘बिल्वोपनिषद’ नामक एक नव्य उपनिषद आहे. बेलाच्या पत्रांनी शंकराची पूजा करणं किती महत्त्वाचं आहे, ते यात ठासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्रिदल बिल्वपत्र हे त्रिकाल, त्रिशक्ती, तीन लिंगे, तीन स्तवने आणि ओंकाराच्या तीन मात्रा यांचं निदर्शक आहे, असं बिल्वोपनिषदात सांगितलं आहे. यातील एक श्लोक असा,

 

उत्तानबिल्वपत्रं च य: कुर्यान्मम मस्तके ।

मम् सायुज्यमाप्नोति नात्र कार्या विचारणा ।

 

अर्थ- (सदाशिव म्हणतो), जो कोणी उताणे बिल्वपत्र माझ्या मस्तकी वाहील त्याला शिवसायुज्य प्राप्त होईल, याविषयी शंका नको.

 

‘बिल्वत्रिरात्रीव्रत’ हे एक काम्य व्रत असून ज्येष्ठ पौर्णिमेला हे करतात. मोहरीचे दाणे पाण्यात टाकून स्नान करणे, बिल्व वृक्षाची पूजा करणे आणि वर्षभर एकभुक्त राहणे, असा या व्रताचा विधी सांगितलेला आहे. विशेषतः स्त्रिया हे व्रत करतात. व्रताच्या उद्यापनाच्या वेळी बेलाच्या झाडाखाली उमा-महेशमूर्तीची पूजा करतात. सहस्र बिल्वपत्रांचा होम करतात. हरिद्वारजवळ ‘बिल्वकेदार’ नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. हे रानात असून तिथे शंकराचं लहानसं देऊळ आहे. इथे बेलाची झाडं भरपूर असल्याने याला ‘बिल्वकेदार’ असं नाव मिळालं आहे.

 

अशोक

 

 
 

‘नास्ति शोक यस्मात’ म्हणजे ज्याच्यापासून शोक होत नाही तो अशोक, असं हलायुधाने अशोक वृक्षाचं वर्णन केलं आहे. सौंदर्य व औषधी गुणधर्मांमुळे हिंदू आणि बौद्ध धम्मात या वृक्षाला पवित्र स्थान आहे. भगवान बुद्धाचा जन्म अशोक वृक्षाखाली झाला, अशी आख्यायिका आहे. संस्कृत महाकाव्य आणि चंपूकाव्य यातून अशोक वृक्षाचे उल्लेख येतात. रावणाने सीतेला लंकेत नेल्यावर अशोकवनात ठेवलं होतं. मदनाच्या पंचबाणांत याचं फूल आहे. अशोकाचे लालसर भगवं फुल प्रेमाचं प्रतीक मानलं आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला अशोक वृक्षाची पूजा करावी, असं सांगितलं आहे.

 

अशोकाला दुःखपरिहारक आणि कल्पवृक्ष मानलं आहे. बंगालमध्ये अशोकषष्ठीच्या दिवशी स्त्रिया याच्या कळ्या भक्षण करतात. निर्णयसिंधूत ‘अशोककलिकाप्राशन’ विधी सांगितला आहे. चैत्र शुद्ध अष्टमीला पुनर्वसु नक्षत्रावर अशोक वृक्षाच्या आठ कळ्या भक्षण करतात. त्याचा श्लोक असा,

 

त्वामशोकवराभीष्ट्म मधुमाससमुद्भवम ।

पिबामि शोकसंतप्तं मामशोकं सदा कुरू ॥

 

अर्थ - हे अशोकश्रेष्ठा, इष्ट फळ देणार्‍या व चैत्र मासात उत्पन्न झालेल्या तुझे (तुझ्या कळ्यांचे ) मी प्राशन करीत आहे. शोकसंतप्त अशा मला तू विशोक कर.

 

स्त्रिया अश्विन शुद्ध प्रतिपदेला अशोक वृक्षाची पूजा करतात. अशोकाचे लाल अशोक आणि हिरवा अशोक, असे दोन मुख्य प्रकार आहेत. लाल अशोक हा ‘सीतेचा अशोक’ म्हणून सामान्यतः ओळखला जातो. भारतातील सदाहरित जंगलांत हा आढळतो.

 

शमी

 

 
 

शमीच्या झाडाला अग्निगर्भा, केशमथनी, ईशानी, लक्ष्मी, तपनतया, हविर्गंधा अशी कितीतरी नावं आहेत. अथर्ववेदापासून पुढच्या वाङ्मयात शमीचे उल्लेख आढळतात. शमी ही प्राचीन काळापासून पवित्र मानलेली आहे. हडप्पा येथील उत्खननात शमी या वनस्पतीचे अवशेष सापडले आहेत. पांडवांनी अज्ञातवासात जाताना एका शमीवृक्षामध्ये आपली शस्त्रं लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. दसर्‍याच्या दिवशी लोक शमीपूजन करून मग सीमोल्लंघनाला निघतात. सीमोल्लंघनाला जाताना लोक पुढील श्लोक म्हणून शमीची पूजा करतात.

 

शमी शमयते पापं शमी लोहितकंटका ।

धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥

करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया ।

तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥

 

अर्थ - शमी पाप शमवते. शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर. शमी हा एक हवनीय वृक्ष आहे. ग्राहयज्ञात शनीसाठी याच्या समिधा वापरतात. यज्ञात अग्नी उत्पन्न करण्यासाठी खालची अरणी शमीच्या लाकडापासून करतात.

 
संदर्भ : 1. भारतीय संस्कृतिकोश

2. मराठी विश्वकोश

 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@