मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील साफसफाईच्या तक्रारी आल्यानंतर ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आठ कोटी रुपयांचे कंत्राट दिले जाणार असून याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांची सफाई आता खासगी कंत्राटदारांवर असणार आहे. ३२२ ठिकाणी सफाई कामगारांचा असलेला तुटवडा भरून काढला जाणार आहे.
मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रे या सर्वच ठिकाणी सफाई कामगारांचा तुटवडा आहे. तब्बल ३२२ ठिकाणी सफाई कामगार नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांत, दवाखान्यांत अस्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सध्या असलेल्या अवघ्या ५२ कामगारांना साफसफाई करावी लागते. नियमित साफसफाई होत नसल्याने येथील शौचालयेही अस्वच्छ आहेत. आवारात अस्वच्छता असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर असलेला भार कमी व्हावा, यासाठी नगरसेवकांक़डून यावर सातत्याने आवाज उठविण्यात आला. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील हवी तशी सफाई होणे कठीण असल्याने कामगारांची भरती व्हावी, यासाठी मागणी केली जात होती. मात्र, ही पदे भरण्यास पालिकेक़डून चालढकलपणा सुरू होता.
‘स्वच्छ भारत अभियान’च्या अंतर्गत स्वच्छ मुंबई करण्यासाठी मोहीम सुरू असली तरी, मुंबईत अनेक ठिकाणी शौचालयांचा प्रश्न रखडला आहे. यावर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर शौचालये बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला. देशातील श्रीमंत पालिका म्हणून गणली जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. असे असूनही महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांची स्वच्छता का होत नाही?, असा प्रश्न या निमित्त स्थायी समितीतील यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.
वर्षाला आठ कोटींचे कंत्राट
‘स्वच्छ भारत अभियाना’चा उद्देश महापालिकेकडूनच गुंडाळला जात असल्याची टीकाही अनेक वेळा झाल्यानंतर अखेर सफाई कामगारांची पदे खासगी कंत्राटदारामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी कंत्राटदाराला सफाईचे आठ कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे. स्थायी समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पालिकेच्या रुग्णालयांत आता खासगी सफाई कामगार दिसणार आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/