शिक्षणाची वेळीच घेतलेली ‘दक्षता’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2018
Total Views |



एका स्त्रीने जर एकदा मनात ठरवले आणि ठाम निश्चय केला, तर ती जिद्दीने अशक्यातील अशक्य गोष्टही शक्य करून दाखवू शकते. याचा प्रत्यय दक्षता सावंत यांच्याकडे पाहून येतो. दक्षता या उरण येथील रहिवासी आहेत. एक सामान्य गृहिणी ते उरण दिवाणी न्यायालयात वकील असा यशस्वी प्रवास त्यांनी केला. तोही वयाच्या ५० व्या वर्षी! तसे पाहायला गेले, तर वयाची पन्नाशी गाठली की, कोणतीही व्यक्ती आपले उर्वरित आयुष्य आपण कसे व्यतित करावे, याबद्दल विचार करत असते. त्याबाबत निरनिराळ्या योजना आखत असते. पण याच वयात पुन्हा शिक्षणाकडे वळण्याचा विचार फारच थोडे जण करतात. कारण, डोळ्यासमोर जेमतेम अर्धे आयुष्य राहिलेले असते. ते कसे आनंदाने, आरामात, जीवनाचा आस्वाद घेत जगता येईल, याचाच विचार बरेचजण करताना दिसतात. दक्षता सावंत मात्र याला अपवाद ठरल्या. वयाच्या ४७ व्या वर्षी दक्षता यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. तीन वर्षे कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर आज त्या उरण येथील न्यायालयात वकिली करत आहेत. गृहिणी म्हणून त्यांनी आधी आपली सर्व कर्तव्ये पूर्ण केली. मुले मोठी झाली, आपल्या गोष्टी स्वत: करू लागली. हे लक्षात आल्यानंतर दक्षता यांनी पुढील शिक्षणाचा निर्णय घेतला. दक्षता आपल्या यशाचे श्रेय त्यांचे पती उमेश सावंत यांना देतात. एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, असे नेहमी म्हटले जाते. परंतु, दक्षता यांच्याबाबतीत हे उलटपक्षी आहे. पती उमेश सावंत यांनी दक्षता यांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. उमेश हे दक्षता यांना अभ्यासातही मदत करायचे, हे त्या आवर्जून सांगतात.

 

दक्षता यांचे आजोबा वकील होते. आपणदेखील आजोबांप्रमाणे वकिलीचे शिक्षण घ्यावे, अशी सुप्त इच्छा दक्षता यांच्या मनात कुठेतरी घर करून होती. ही इच्छा तर त्यांनी पूर्ण केलीच. पण त्याचबरोबर समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. दक्षता या ‘जायंट्स ग्रुप ऑफ उरण’च्या अध्यक्ष आहेत. या क्लबद्वारे त्या अनेक समाजकार्ये करत असतात. या क्लबमार्फत दक्षता यांनी अनेक वनवासींच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे. मुळात शिक्षण हे काय असतं, त्यामुळे आपल्या जीवनात कसा आमूलाग्र बदल होतो, हे सांगत दक्षता यांनी अनेक वनवासी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. दक्षता यांचे कार्य इथेच थांबत नाही, तर एक वकील म्हणून काम करताना त्या त्यांच्याकडे येणाऱ्या गरीब महिलांनाही मदत करतात. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे, खटल्यासाठी केवळ वकिलाची फी परवडत नाही, म्हणून अनेक महिला अन्याय सहन करत राहतात. अशा अनेकजणींसाठी दक्षता यांनी कोणतीही फी न घेता खटला लढवला आहे. दक्षता सांगतात की, अन्याय करणाऱ्याइतकाच तो सहन करणाराही दोषी असतो. स्त्रियांनी अन्यायाला झुगारून दिले पाहिजे. हल्ली सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मी टू’चादेखील त्यांना याबाबतीत उल्लेख करावासा वाटतो. दक्षता सांगतात की, “असे गैरप्रकार स्त्रियांसोबत जेव्हा घडतात, त्यावेळी त्याक्षणीच स्त्रियांनी त्याचे योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे. हात धरणाऱ्याच्या वेळीच दोन कानाखाली मारता यायला पाहिजेत. इतका सक्षमपणा तर आजच्या स्त्रियांमध्ये असायलाच हवा. स्त्रियांकडे नेहमी त्या सहनशील आहेत, याच दृष्टीने पाहिले जाते. परंतु, या सहनशीलतेचीदेखील मर्यादा असायला हवी, असे मला वाटते. कारण, स्त्रिया या जशा सहनशील आहेत तशाच त्या जगदंबाही आहेत. हे समाजाने विसरता कामा नये.”

 

दक्षता या वकील होण्याआधी एक सामान्य गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांच्यासारख्या अनेक सामान्य गृहिणींना त्या हाच संदेश देऊ इच्छितात की, “गृहिणींनीही सतत काही ना काही नवीन करत राहिले पाहिजे. आपण फक्त एक गृहिणी आहोत, म्हणून स्वत:ला कधीच कोणत्याही बाबतीत कमी समजू नये. एक गृहिणी म्हणून आपली जी कर्तव्ये आहेत, ती तर पार पाडावीच; पण त्याचबरोबर आपणही काहीतरी करून दाखवू शकतो. तेवढी ताकद, तेवढी शक्ती एक स्त्री म्हणून आपल्यात आहे, हे विसरू नये. मग ज्या कोणत्या क्षेत्रात रस असेल, आवड असेल त्यात काही ना काही करत राहावे. मुळात आपणही काहीतरी करत आहोत, आपलेही काही अस्तित्व आहे, आपलीही स्वत:ची अशी ओळख आहे, ही भावना महत्त्वाची असते, असे मला वाटते आणि तिच जपणे गरजेचे आहे. कारण, मुलांसाठी, पतीसाठी, कुटुंबीयांसाठी तर जन्मभर कष्ट करतच असतो. मग वयोवृद्ध झाल्यावर आयुष्याकडे मागे वळून पाहताना आपण काय मिळविले आणि काय गमावले याचा हिशेबरुपी अंदाज बांधताना दु:ख होत नाही. मी जर त्यावेळी असे केले असते, हा निर्णय मी घ्यायला हवा होता किंवा नव्हता. या जर-तरच्या भाषेत मग पश्चाताप करत बसावे लागत नाही.”

 

-साईली भाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@