ऊसतोड कामगारांसाठी शासनाची खुशखबर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2018
Total Views |



 

 

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना केली लागू


मुंबई : राज्यशासनाने महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनालागू केली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यातील अंदाजे 8 लाख ऊसतोड कामगारांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सावरगाव येथील दसऱ्या मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मंडळ जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शासन स्तरावर हालचाली होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब करत ही योजना लागू झाल्याचे जाहीर केले.

 

केंद्र शासनाच्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार घर बांधणी, वृद्धाश्रम आणि शैक्षणिक योजनांकरिता संबंधित विभागांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता निधी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंत्यविधी अर्थसहाय्य योजना, जीवन व अपंगत्व विमा छत्र, आरोग्य व प्रसुती लाभ, वृद्धापकालीन संरक्षण, केंद्र शासन निर्धारित करेल असे इतर लाभ, भविष्य निर्वाह निधी, कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, पाल्यांसाठी शिक्षण, हॉस्टेल फी परतावा व शिष्यवृत्ती सहाय्य अशा विविध योजनांचा लाभ ऊसतोड कामगारांना मिळणार आहे.

 

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी योजनेकरिता पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सोबतच ऊसतोड कामगारांची नोंदणी एका विशेष अभियानाद्वारे सुरु करण्यात येणार असल्याचे शासनाने जरी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@