चांगली व्यक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2018
Total Views |



आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बौद्धिक क्षमतेइतकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहेत ती जीवनावश्यक कौशल्ये! समाजात वावरताना, स्वतःच्या पायावर उभे राहताना, वेगवेगळ्या स्तरांतील लोकांबरोबर काम करताना, कौटुंबिक व मित्रत्वाचे नातेसंबंध फुलवताना अनेक कौशल्यांची आवश्यकता असते.

 

त्याला मार्क कमी पडले तरी एकवेळ चालेल. पण त्याने एक चांगली व्यक्ती झाले पाहिजे. एका तेरा वर्षाच्या मुलाची आजी कळकळीने सांगत होती. तिच्या नातवाने शिक्षिकेच्या केलेल्या अनादराबद्दल आम्ही बोलत होतो. गेल्या काही महिन्यांत नातवाच्या वर्तनात झालेल्या बदलाची निरीक्षणे आजीने नोंदवली. उद्धटपणा, अनादर, विद्रोह या नव्याने उत्पन्न झालेल्या वर्तनापाठीमागची कारणे, त्यात वयाचा असलेला भाग, घरातील-शाळेतील वातावरण याची चर्चा झाल्यावर आजीने वरील उद्गार काढले. बरेचसे सुशिक्षित पालक आता आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत जागरूक आहेत ही आश्वासक परिस्थिती आहे. ‘केवळ परीक्षेत मिळालेले मार्क हे हुशारीचे मोजमाप नाहीया विचाराचा काही प्रमाणावर स्वीकार होताना दिसत आहे.

 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बौद्धिक क्षमतेइतकीच किंबहुना जास्तच महत्त्वाची आहेत ती जीवनावश्यक कौशल्ये! समाजात वावरताना, स्वतःच्या पायावर उभे राहताना, वेगवेगळ्या स्तरांतील लोकांबरोबर काम करताना, कौटुंबिक व मित्रत्वाचे नातेसंबंध फुलवताना अनेक कौशल्यांची आवश्यकता असते. त्यामुळे शालेय जीवनात केवळ बौद्धिक विकासाचा आग्रह धरणे हे खूप एकांगी आहे. अहो, खातच नाही तो काही. कधीकधी भरवते मी त्याला चक्क. पोटात तर गेलं पाहिजे ना काही! असे ओशाळून म्हणणारी १४ वर्षांच्या मुलाची आई मी पाहिली आहे. तसेच, माझा आठवीतील थोरला आणि चौथीतील धाकटा दोघेही स्वतःचा दिनक्रम स्वतः नेमाने पाळतात. सकाळी उठण्यापासून ते कधी पाहुणे आले, तर घरकामात मदत करण्यापर्यंत सगळं करतात. त्यांनी स्वावलंबी व्हायलाच हवं. आयुष्य त्यांचं आहे ना! असे ठामपणे सांगणाऱ्या आईलाही मी भेटले आहे. या दोन्ही कुटुंबांचा आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्तर साधारण सारखाच आहे. फरक आहे तो दृष्टिकोनात; वर्तमानात तात्पुरता तोडगा शोधायचा की भविष्याभिमुख विचार करायचा हे ठरवण्याच्या तारतम्यामध्ये.

 

चांगला संवाद साधता येणे, परिस्थितीला अनुरूप निर्णय घेता येणे, समस्या निराकरण साधणे, सर्जनशील विचार करता येणे, भोवतालच्या परिस्थितीबद्दल, व्यक्तींबद्दल संवेदनशील असणे, आत्मविश्वास, समतोल वृत्ती ठेवता येणे, विचारांत लवचिकता असणे आणि स्वतःच्या भावना समर्थपणे हाताळता येणे या मनोसामाजिक कौशल्यांचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तसेच णछखउएऋ नेदेखील यशस्वी व स्वावलंबी जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये म्हणून समावेश केला आहे. ही कौशल्ये अनेक प्रकारे मुलांना शिकवता येतात. दैनंदिन कृतींमधून, निरीक्षणातून, कौटुंबिक निर्णयप्रक्रियेत मुलांना सहभागी करून, शालेय प्रकल्पांतून, कार्यशाळांमधून, सामाजिक भेटींमधून, मुलांवर त्यांच्या वयानुरूप जबाबदाऱ्या टाकून, अशा नाविन्यपूर्ण मार्गांनी जीवनावश्यक मनोसामाजिक कौशल्यांचे शिक्षण आपसूक होत जाते.

 

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी नावाची शैक्षणिक संस्था गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या विभागांतून पौगंडावस्थेतील मुलांच्या कौशल्य विकसन शिबिरांचे आयोजन करत आहे. नववीत असताना दिवाळीच्या सुट्टीत अशाच एका शिबिरात मी सहभागी झाले होते. त्यात एके दिवशी आम्हाला चार-पाचजणांचे गट करून एक गटकार्य दिले होते. नेमून दिलेले काम इतकेच होते की ‘ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या जवळपासच्या परिसरात (पुण्यातील सदाशिव पेठ) फिरून कुठल्याही अनोळखी घरांत जाऊन निदान चहा पिऊन यायचे.’ याला अट एकच होती की असा प्रयोग आम्हाला करायला सांगितला आहे, हे मात्र त्या घरात सांगायचे नाही. बाकी काहीही गप्पा मारायला हरकत नाही. या प्रयोगात सगळ्या गटांना खूप वेगवेगळे अनुभव आले. सगळे परत जमल्यावर गप्पांना ऊत आला होता. अर्थात बहुतांश गट फक्त चहाच काय पण लाडू, चकली, चिवड्यावर पण ताव मारून आले होते. यातून आम्हाला मिळालेला आत्मविश्वास जबरदस्त होता. यातली तेव्हा तितकीशी न जाणवलेली गोष्ट आता स्वतः पालक झाल्यावर आणि संवेदनशील वयातील मुलांबरोबर काम करताना प्रकर्षाने जाणवते. अशा वेगवेगळ्या प्रयोगांतून आमच्या पालकांनी आणि शिबीर घेणाऱ्या इतर मोठ्या व्यक्तींनी पत्करलेली जोखीम, आमच्यावर टाकलेला विश्वास, आम्हाला दिलेली मोकळीक, आमच्या बाबतीत ठेवलेला संयम या सगळ्याचे सार म्हणून आम्ही दीर्घकाळ सोबत करेल, उपयोगी पडेल असे खूप काही शिकू शकलो.

- गुंजन कुलकर्णी


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@