१९७५ ची आणीबाणी- एक सत्य! भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2018
Total Views |


 


जेवणात ५२ पत्त्यांची भाजी (म्हणजे भाजीच्या झाडांची पाने), कच्च्या पोळ्या, भातात लेंड्या, वरणाच्या पाण्यात माशांचा थर, वाटीभर मुगात गुंडभर पाणी-ती पाण्याची उसळ, हा जेवणाचा मेनू! पहिले लेंड्या शोधा, मग माशा काढा व नंतर जेवण करा! हे रोजचेच जेवण सुरुवातीला असायचे. नंतर भाज्या आल्या, परंतु भाज्यांचे पाणीच फोडणी घालून मिळायचे, परंतु पर्याय नव्हता.

 

केंद्रातील मोदी सरकारच्या काळात देशात सगळ्यात जास्त सहिष्णुता अनुभवास येत असतानाही विरोधी पक्ष जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत. विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित असतानाही आवाज दाबला जात असल्याची टीका अवास्तव आहे. जे लोक आज मोदी सरकारवर टीका करीत आहेत, त्यांनी जरा आणिबाणीच्या काळात डोकावून पाहिले तर बरे होईल. आणिबाणीत अटक केल्यानंतर आम्हाला कारागृहात पाठविण्यात आले होते. आमची महिलांची राहण्याची सोय नागपूर कारागृहामध्ये फाशीखान्यात होती. फाशी देणाऱ्या महिलांसाठी जी सोय ती आमच्याकरिता! कायपण यांचे विचार! सर्व चांगल्या घरातल्या, सुशिक्षित, शिकलेल्या अशा महिलांना उघड्यावर, अर्धवट सडलेल्या तरट्याच्या आडोशाला प्रातर्विधी करायला जावे लागे. विचार करा, आमची काय अवस्था असेल? उघड्यावर सामुदायिक आंघोळ, खोलीला मोठ्या सळाकींचा दरवाजा- त्यात कपडेबदल! कायपण आमची परिस्थिती होती. सर्व लाज-शरम खुंटीवर टांगली होती. तत्कालीन शासनाच्या निर्लज्जपणाचा कळस होता तो! झोपायला तणसाच्या गाद्या! मी एकदा सुपरिटेंडंटला विचारले, “साहेब, आमच्याकडे मेलेल्या व्यक्तीला तणसावर चादर टाकून झोपवितात, उशाला तणसाची उशी देतात. तुम्ही आम्हाला तेच दिलं. आम्ही तुम्हाला फिरते मुडदे वाटतो का?” हो, तसेही शासनाचे मन, विचार करण्याची स्थिती, माणुसकी मेलेलीच होती. त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करायची, हाच प्रश्न आहे. पुन्हा यांना सत्ता हवी म्हणे? कशासाठी? आमच्या फाशीखान्यात ४ महिन्यांनंतर एका स्त्री भुताचे आगमन झाले. ती कोणालाही रात्री उठवायची! एकदा सुमन पिंपळापुरेला रात्री २.३० वाजता उठवून टाक्यावर घेऊन बसविले. ती तिथे २ तास दात घासत बसली. नंतर तिच्या लक्षात आले व ती माझ्या खोलीत घाबरून बसली. आमच्याकडे सकाळी चहा आणण्याकरिता महिलांची ड्युटी लावली होती. त्या दिवशी वेळकरताईंची ड्युटी होती. तिला पहाटे ३ वाजता उठवून दारात बसवून ठेवले. २ तास बसल्यानंतर लक्षात आले. आता मला सांगा, आम्ही १ वर्ष भुताच्या सान्निध्यात कसे घालवले असेल? फक्त आम्हा कुणाला त्या भुतापासून इतर त्रास नव्हता, मात्र जिवंत भुतांचा त्रास होता! जेवणाच्या बाबत तर विचारूच नका! सकाळचा चहा केटलीत यायचा. त्यावर माशांचा (मेलेल्या) थर असायचा. तो चहा आम्ही गाळून प्यायचो. चहात माशी पडली तर कॉलरा होतो म्हणून आपण घरी पित नाही. तिथेतर शेकडो माशांचा चहा आम्ही गाळून प्यायलो! आम्हाला कॉलराच काय, साधा तापही आला नाही! अशी ईश्वराची मर्जी आमच्यावर होती. ‘देव तारी त्याला कोण मारी?’ हेच खरे! याचे कारणही महत्त्वाचे होते, ते म्हणजे पुन्हा चहा मिळायचा नाही. जेवणात ५२ पत्त्यांची भाजी (म्हणजे भाजीच्या झाडांची पाने), कच्च्या पोळ्या, भातात लेंड्या, वरणाच्या पाण्यात माशांचा थर, वाटीभर मुगात गुंडभर पाणी-ती पाण्याची उसळ, हा जेवणाचा मेनू! पहिले लेंड्या शोधा, मग माशा काढा व नंतर जेवण करा! हे रोजचेच जेवण सुरुवातीला असायचे. नंतर भाज्या आल्या, परंतु भाज्यांचे पाणीच फोडणी घालून मिळायचे, परंतु पर्याय नव्हता.

 

गरीबसुद्धा त्यापेक्षा चांगले जेवण जेवतात. आम्ही गुन्हेगार नव्हतो, आम्ही कैदी नव्हतो, कारण त्यांच्या कैदेतही मर्यादा असते. आम्ही स्थानबद्ध होतो. ‘मिसा’त होतो. आम्हाला न्याय मागण्याचा हक्कच नव्हता! हे असे का? हे विचारण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे आम्ही बाहेर जाण्याला मार्गही नव्हता. असे आमचे बेभरवशाचे जीवन होते. ही परिस्थिती या महाभागांना काय माहिती? पूर्वीचे लोक आम्हाला स्वर्ग-नरकाच्या कहाण्या सांगायचे-पाप केलं तर नरक व पुण्य केलं तर स्वर्ग! हे लहानपणापासून मनावर बिंबलेले. इथेतर आम्ही नरकातच होतो! परंतु पाप्यांकडून सज्जनांना मिळालेला नरक होता तो! उघड्या संडासच्या वासाने जीव गुदमरायचा, झोप येईना. खोल्यांमध्ये पांढऱ्या उवा भिंतीवर रांगेनी चालायच्या. आंघोळीला आडोसा नाही. कैदी महिलांच्या सहवासात दिवस घालवायचा, मोकळी हवा नाही. १२-१२ फुटाच्या भिंतीचे बंधन! कसे राहिलो असू आम्ही? ‘स्वर्गात इंद्राच्या अप्सरा नृत्य करतात म्हणे!’ इथेतर माशा घोंघावायच्या, डासांचे संगीत-नृत्य रात्रंदिवस चालायचे, संडासचा वास, ढेकणांचा सहवास, ऊन, वारा, पाऊस, थंडी... सारखेच सहन करायचे. पावसाळ्यात सगळीकडे भांडे ठेवून झोपायचे. कधीकधी पोटावर गंज घेऊन झोपायचे! अगदी स्वप्नात असल्यासारखे तुम्ही चित्र रंगवा. याला काय म्हणावे, ते ठरवा! याला सूड घेणे, जिवंत मरण देणे म्हणतात! इतके अमानुष कृत्य यांचे होते. ते आम्ही कुणाला सांगणार? शेवटी १० महिन्यांनंतर सगळ्यांनाच असह्य झालं आणि न्यायालयात जायचं निश्चित झालं. तोपयर्र्ंत हळूहळू आपल्या हक्काची जाणीव झाली. अन्यायाचा फासही हळूहळू कमी झाला. शेवटी काळ हा मदतीला धावून आला. आम्ही हेबिअर्स कॉर्पस टाकले. ते न्यायालयाने नोंदवून घेतले. आमचा न्यायासाठी, हक्कासाठी लढा सुरू झाला. आम्ही महिलांनी हेबिअर्स कॉर्पस टाकले. एकत्र खटला न्यायालयाने ठेवला. आमचे म्हणणे ऐकले नाही व निकाल दिला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, कोणी ऐकल्याही नाहीत, आम्हाला न्यायालयाने बोलाविलेही नाही. मला राग आला, मी माइया वकिलांवर भडकले. मी न्यायालयातून न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही म्हणून हट्ट केला. तेव्हा वकील मला म्हणाले, एकच उपाय आहे, परंतु त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो, तुला न्यायालय कुठेही पाठवू शकते, तू ठरव. मी म्हटलं, मी ठरवले. या नरकापेक्षा वाईट कुठेच असू शकत नाही! मला त्यांनी, न्यायाधीशांच्या कक्षामध्ये जा आणि त्यांना हे सर्व सांग, असे सांगितले. मी गेले, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घुसले.

 

न्यायाधीश दचकले. “काय आहे हे?” त्यांनी मला विचारले. मी त्यांना सांगितले, “आम्ही आपल्या न्यायालयात महिलांचा खटला टाकली. आपण त्याचा विचारही केला नाही व निर्णय दिला! आम्हाला न्याय कोण देईल?” त्यावर त्यांनी सरकारी वकिलाला बोलावले व त्यांना आमचे म्हणणे सांगितले. त्यावर त्या वकिलाने न्यायाधीश साहेबांना सांगितले, “सर, मी त्यांच्या कारागृहामध्ये गेलो होतो, पाहणी केली. सर्व ठीकच तर आहे! शेवटी कारागृह म्हणजे घर नव्हे, हॉटेल नव्हे, हे त्यांना कळायला हवे!” मला संताप आला. हा वकील खोटं बोलत होता. मी न्यायाधीश साहेबांना विनंती केली, “सर, यांच्या बायकोला आमच्याबरोबर चार दिवस ठेवा म्हणजे आमचे हाल यांना कळतील सर! आम्ही चांगल्या घरच्या महिला आहोत. आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही खून केलेले नाही, मग आम्ही नरकात का राहायचे?” यावर न्यायालयाने दुसऱ्या दिवशी विशेष खटला लावला. सर्व कारागृह अधिकार्यांना नोटीस दिली. आम्हालाही उपस्थित राहण्याची नोटीस दिली व आमचा खटला आम्ही लावून घेतला. खटला पूर्ण वाचल्यानंतर न्यायाधीश साहेबांना आमची गंभीर परिस्थिती कळली. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. एका महिन्याच्या आत पक्के संडास, बाथरूम बांधण्याचा, वाळ्याच्या ताट्या लावण्याचा, बंद डब्यात स्वच्छ व चांगले जेवण देण्याचा आदेश दिला. आम्ही जिंकलो, आनंद व्यक्त केला. असा आमचा कारागृहप्रवास होता. न्यायाधीश साहेबांच्या कक्षामध्ये घुसून बेकायदेशीर प्रवेश करूनही काही झाले नाही. मग कारागृहामध्ये हक्कासाठी भांडायचे, आपले हक्क मिळवायचे, ही मनाशी खूणगाठ बांधली व आमचे हक्कासाठी आंदोलन सुरू झाले व यशस्वीही झाले. आम्हाला बाहेर निघण्याची आशा नव्हती. कुणाचीही मध्यस्थी काम करीत नव्हती. आम्ही जिथे होतो त्याच्या मागे तेवढ्याच खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत आमच्या दोघींच्या समाध्या बांधण्याचे पत्र आम्ही सुपरिंटेंडंटना दिले. भविष्यात कुणी आमच्या घरचे आले व त्यांनी काही आणले, तर कैद्यांना वाटून द्याल, असे कळविले. त्या वेळी मात्र तुरुंगाधिकारी, सुपरिंटेंडंट यांच्या डोळ्यांत पाणी आले. “हे सर्व सहजरीत्या तुम्ही कसे सहन करता? एवढे असूनही तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य कमी होत नाही! धन्य तुम्ही!त्यांच्यातली माणुसकी, त्यांच्यातला माणूस जागविण्याचे काम आम्ही केले, याचाच आनंद आम्हाला झाला. दुसऱ्या दिवशी ते राखी घेऊन आले व म्हणाले, “ताई, तुम्हाला माझ्यासारखा, आमच्यासारखे भाऊ आवडणार नाही, अत्याचारी भाऊ कुठल्याच बहिणीला नको असतो. परंतु, तुमच्यासारखी बहीण आम्हाला चालेल. फक्त एवढं ऐका व आम्हाला राख्या बांधा.तो सोहळा अतिशय भावनिक होता. पाषाणालाही पाझर फोडण्यात आम्ही यशस्वी झालोत. याला म्हणतात आणिबाणी! ही यांना कुठे दिसली ते दाखवा? उगीचच ‘उचलली जीभ व लावली टाळूला!’ असे करू नका. मलातर भीती वाटते. समजा, चुकूनही वाईटातले वाईट म्हणून त्यांचे राज्य आले, तर हे आमच्यासाठी पुन्हा आणीबाणी आणणार तर नाहीत? कारण त्यांच्या मनात आणीबाणीचे भूत भरलेले आहे! लोकांना, ‘सावधान’ एवढेच मला म्हणावयाचे आहे. विषाची परीक्षापणनको!

 

शोभा फडणवीस

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@