वेल्थ क्रिएटर्स ही राष्ट्राची संपत्ती : नितीन गडकरी

    02-Oct-2018
Total Views |

 
 
दै.‘मुंबई तरुण भारत’च्या ‘वेल्थ क्रिएटर्स’ विशेषांकाचे प्रकाशन

 

मुंबई : देशातील सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योजकांची (एमएसएमएई) देशाच्या अर्थव्यवस्थेत रोजगारनिर्मितीत महत्त्वाची भूमिका आहे. देशाला आणखी मोठ्या प्रमाणावर ‘वेल्थ किएटर्स’ची गरज असून ते देशाची एक संपत्ती आहेत. वेल्थ क्रिएटर्सचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या ‘वेल्थ क्रिएटर्स’ या विशेषांकाचे प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले,यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 

संघर्षातून स्वतःचा उद्योग,व्यवसाय उभा करणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा सांगणाऱ्या ‘वेल्थ क्रिएटर्स’ या विशेषांकाची निर्मिती दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केली असून यामध्ये २६ उद्योजकांच्या यशोगाथा शब्दांकित करण्यात आल्या आहेत. या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवारी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संघटना ‘कोसिया’चे उपाध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, डीजीएचआयचे एशिया अफेअर्स संचालक आणि ओरीएन्ट इन्फोटेक सर्व्हिसेस इंडियाचे प्रोप्रायटर श्रीकांत परब, टाटा ताज ग्रुप ऑफ हॉटेलचे टिमी मेहेता, टाईम्स ग्रुपचे विनायक प्रभू आदींसह आर्थिक, औद्योगिक तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

 

 
 

 

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, दै. ‘मुंबई तरुण भारतच्या वेल्थ क्रिएटर्स या संकल्पनेमुळे एमएसएमएई क्षेत्रातील उद्योजकांना व्यक्त होण्यासाठी आणि प्रोत्साहन देणारे एक व्यासपीठ मिळाले आहे. आज जगात सुरू असलेल्या व्यापारयुद्ध आणि शीतयुद्धामुळे आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यातून सावरण्यासाठी हेच क्षेत्र फायदेशीर ठरू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. वेल्थ क्रिएटर्स हे व्यापारासह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करू शकतात. त्यातूनच देशात नवे तंत्रज्ञान, विकासदरात वाढ, खेळता पैसा राहणे शक्य होईल. त्यामुळे तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा इतरांना नोकरी कशी देता येईल याचा विचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वेल्थ क्रिएटर्स या व्यासपीठावरून मोठमोठे उद्योजक घडावेत, अशी सदिच्छाही गडकरी यांनी यावेळी दिली. याचबरोबर रोजगारनिर्मिती, सामाजिक कार्य आदींवर उद्योजकांनी भर द्यायला हवा, त्यामुळे तुम्हाला काम करण्याची नवी उर्जा मिळेल, असाही सल्ला त्यांनी दिला. ‘गरीबांना देण्याची कुवत तुमच्यात निर्माण होत नाही, तोपर्यंत तुम्ही खरे श्रीमंत होऊ शकत नाही’ असे ते म्हणाले.
 
  

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, देशाच्या विकासदरात वाटा असलेल्या २४ टक्क्यांचे योगदान असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना स्थिरस्थावर होण्यासाठी सक्षम प्रशासनाची आजही गरज आहे. देशात उद्योगांचा विस्तार होण्यासाठी मुलभूत सोयी उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. लघु उद्योजकांच्या गुंतवणूकदारांची गरज आहे. यातूनच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकेल. शेती व शेतीपूरक उद्योगात ज्याप्रमाणे सिंचन, खते आणि शेतकऱ्याला होणारा कर्जपुरवठा जसा आवश्यक असतो त्याच प्रमाणे एमएसएमएई क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांची गरज असल्याचे ते म्हणाले. एकेकाळी देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून होती. मात्र, कालांतराने हे क्षेत्र दुर्लक्षित होत गेले. आता हे मनुष्यबळ याच छोट्या उद्योगांकडे वळले आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. उद्योगनिर्मितीसाठी प्रोत्साहन आवश्यक असून त्यामुळेच रोजगार आणि गरीबीवर मात करण्यात मदत होऊ शकते. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 
 

जलव्यवस्थापन आणि जैवइंधन या दोन मुद्द्यांवरही गडकरी यांनी यावेळी भाष्य केले. जलव्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे सांगत नदी जोडप्रकल्पाअंतर्गत सरकार जलव्यवस्थापनाबाबतही विचार करत असल्याचे ते म्हणाले. सहा प्रकल्पांतर्गत हे व्यवस्थापन केले जाणार असून महाराष्ट्र-गुजरातसाठी दमणगंगा प्रकल्प, तापी-नर्मदा, गोदावरी आणि आंध्रप्रदेशमध्ये धरणांसाठी सहा हजार कोटींचा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे १० हजार कोटींचे उत्पन्न वाढणार असून याशिवाय ७ हजार दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता तयार केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि पर्यावरणासाठी जैवइंधननिर्मिती आणि त्याला चालना देणाऱ्या उद्योगांची पायाभरणी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शेतीतील उत्पन्नाचे व्यवस्थापन करण्यासाठी जैवइंधन व्यवसायाची गरज असून त्यानुसार संपूर्णतः जैवइंधनावर चालणारी वाहनांची निर्मिती केल्यास यातून इंधनदरवाढ आणि पर्यावरणाची समस्या सुटेल, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय या क्षेत्रात आणखी संशोधन गरजेचे असून देशातील सुक्ष्म व लघु उद्योगातूनच नवीन कल्पना मिळतील, अशीही आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

 

 
 
 

कोसियाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम आगवण यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या दशकपूर्तीनिमित्त अभिनंदन केले. एमएसएमई क्षेत्राशी संबधित सन्मान सोहळ्यात दैनिक मुंबई तरुण भारतसह काम करणे हे गौरवास्पद असून लघुउद्योजकांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, ‘कोसिया’सह उद्योजकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ यातून मिळाल्याचे ते म्हणाले. भारतीय विचार दर्शनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वेल्थ क्रिएटर्सच्या योगदानामुळेच देश आज प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी केले. वेल्थ क्रिएटर्स या संकल्पनेची यावेळी त्यांनी माहिती दिली. देशाच्या विकासात एक प्रमुख वाटा असणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा आणि त्यांचा गौरव करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी वेल्थ क्रिएटर्स हा सन्मान सोहळा आणि विशेषांक प्रकाशन आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई तरुण भारतचे बिझनेस हेड रविराज बावडेकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला कोसिया, टीसा, टीबीआयए आणि टीमा आदी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांच्या संघटनांचा सहभाग लाभाला. मिरर नाऊ, ईटी रायझिंग हे कार्यक्रमाचे मिडीया पार्टर्नर होते तर निवेदिता सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 
 

 
 
 
 
‘मुंबई तरुण भारत’ म्हणजे विचारधारेचा वसा :
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे विचारधारा मानणारे वृत्तपत्र आहे आणि त्याचीच आज देशाला जास्त गरज आहे आपल्याकडे डावे-उजवे लेखक आहेत मात्र मुंबई तरुण भारतने नेहमीच विचारधारा तत्वज्ञान सामाजिक दायित्त्व डोळ्यापुढे ठेऊन वाटचाल केली आहे राष्ट्रीय पुनर्निमाणाचा वसा घेऊन आजच्या युगात वेगळेपण जपण्याची परंपरा कायम दै. ‘मुंबई तरूण भारत’ने ठेवली आहे.  
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालय  


 

 
 
 
वेल्थ क्रिएटर्सच्या योगदानामुळेच देश प्रगतीपथावर :
 
देशातील उद्योजक म्हणजेच वेल्थ क्रिएटर्स हे देशाच्या विकासासाठी योगदान देतात. या क्षेत्रातील योगदानामुळेच देश आज प्रगतीपथावर आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल साऱ्या उद्योजकांचे मनःपूर्वक अभिनंदन. 
 
- डॉ. सुरेश हावरे, अध्यक्ष, भारतीय विचार दर्शन
 
 
 

 

सन्मान उद्योजकांचा सन्मान वेल्थ क्रिएटर्सचा - उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही निवडक उद्योजकांचा यावेळी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हे पुरस्कार व पुरस्कारप्राप्त उद्योजक पुढीलप्रमाणे :
 

मल्टी टॅलेंटेड वेल्थ क्रिएटर - श्रीकांत बापट, लॅब इंडीया

यंग अचिवर वेल्थ क्रिएटर – प्रशांत करुलकर, साई रिदम

एक्सपान्शनिस्ट वेल्थ क्रिएटर – विजय गावडे, हॉटेल बल्लाळेश्वर

इनोव्हेटीव वेल्थ क्रिएटर – मकरंद जोशी, त्रिमुर्ती ऑटो डेको कंपोनेन्टस् प्रा. लि.

सोशली कॉन्शिअस वेल्थ क्रिएटर – परीक्षित प्रभुदेसाई, पितांबरी

मल्टी टॅलेंटेड वेल्थ क्रिएटर – नारायण पवार, जीएनपी ग्रुप

जॉब क्रिएटींग वेल्थ क्रिएटर – महेश खेडकर-राजेंद्र खेडेकर, श्रीकृपा सर्विसेस

जॉब क्रिएटींग वेल्थ क्रिएटर – हरीष मेहेता, ऑनवर्ड टेक्नोलॉजी पब्लिक लिमिटेड

इनोव्हेटीव वेल्थ क्रिएटर - विल्यम तुस्कानो, गार्डवेल

इनोव्हेटीव वेल्थ क्रिएटर – नितीन मेटकर-तुषार वाघ, अॅक्मे

इकोफ्रेन्डली वेल्थ क्रिएटर – डॉ. निलेश अमृतकर, एन्वायरो केअर

इंडीयन ट्रेडीशनल प्रॅक्टिसिंग वेल्थ क्रिएटर्स – राजन दळी, कृपा औषधालय

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.