माओवादाकडून धर्मांधतेकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |


 


दिवसाउजेडी पाहिलेली स्वप्ने खरी होत नसतात, तर त्यासाठी जनतेत मिसळून कष्ट उपसावे लागतात. म्हणूनच इथे प्रकाश आंबेडकरांचे स्वतःचेच कष्ट कमी पडल्याचे आणि त्यातूनच धर्मांध वक्तव्यांसाठी, चिथावणीखोर कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बरोबर घेण्याची दुर्बुद्धी त्यांना झाल्याचे स्पष्ट होते.


नव्वदच्या दशकात ‘दलित-मुस्लीम भाई भाई, हिंदू कौम कहाँ से आई,’ अशी एक घोषणा गाजत होती. एखाद्या महानगरपालिकेत फुटकळ नगरसेवक वा कुठल्यातरी विधानसभा मतदारसंघातून एखाद-दुसरा आमदार निवडून आणण्यापर्यंत अशी घोषणा देणाऱ्यांनी मजलही मारली. घोषणा देणारी ही मंडळी पुढे बदलत्या राजकीय अभिसरणात विरघळली आणि सत्ता मिळवत सत्ताधाऱ्यांच्याच पंगतीत जाऊन बसली. यथावकाश आपापसातील उखाळ्या-पाखाळ्यांनी ऐक्याची घोषणा देणाऱ्यांना ग्रासले आणि चिमूटभर सत्तेच्या लोभापायी या लोकांची मोजता न येतील इतकी शकले उडाली. आता मात्र दोन समाजगटांमध्ये विष कालवून आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न या लोकांनी पुन्हा एकदा सुरू केल्याचे दिसते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले प्रकाश आंबेडकर आणि हैद्राबादेतील रझाकारांचे धर्मांध वारसदार ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमिनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी या दोघांनीही आगामी निवडणुकांत एकत्र येत ‘वंचित बहुजन विकास आघाडी’च्या नावाखाली लढवण्याचे जाहीर केले. नुकताच दोन्ही पक्षांतील आघाडीच्या बारशाचा पहिला पाळणा हलला तो औरंगाबादमध्ये. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रित येत येथे सभा घेतली आणि काँग्रेससह भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेतले.

 

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून ते राजेशाही संपल्याने राजासारखे वागू नका, मोदी सरकारमुळे अनुसूचित जाती-जमातीतील लोक पीडित आहेत, असे तारे तोडत प्रकाश आंबेडकर व ओवेसी या दोघांनीही भाजप सरकारवर टीका केली. पण, राजकारणात फक्त टीका करून चालत नाही, तर जनतेला विकासाच्या-प्रगतीच्या पथावर पुढे घेऊन जाण्यासाठी आपण नेमके काय करणार आहोत, हेही सांगणे आवश्यक असते, जे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींनी केलेले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचे सत्ताप्राप्ती हे ध्येय असते. पण, केवळ इतरांवर टीका केल्याने जनता कधीही मतांचे दान कोणाच्या पारड्यात टाकण्यास धजावत नाही. जनतेला हवा असतो तो राजकीय पक्षांचा नेमका कार्यक्रम-उपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीची धोरणे. प्रकाश आंबेडकर-ओवेसींसारखे लोक ही गोष्ट कधीच मान्य करत नाहीत, कारण इतरांवर टीका केली की, सत्तेचा मुकुट स्वतःच्या डोक्यावर ठेवता येईल, या भ्रमात ते वावरत असतात. त्याने शे-दोनशे कार्यकर्त्यांचे मनोरंजन नक्कीच होते. ते तुम्हाला भावी मुख्यमंत्रीच नव्हे, तर पंतप्रधानपदीही पाहतात; अर्थातच स्वप्नांत. मात्र, दिवसाउजेडी पाहिलेली स्वप्ने खरी होत नसतात, तर त्यासाठी जनतेत मिसळून कष्ट उपसावे लागतात. म्हणूनच इथे प्रकाश आंबेडकरांचे स्वतःचेच कष्ट कमी पडल्याचे आणि त्यातूनच धर्मांध वक्तव्यांसाठी, चिथावणीखोर कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमला बरोबर घेण्याची दुर्बुद्धी त्यांना झाल्याचे स्पष्ट होते.

 

मुळात बहुसंख्य अनुसूचित जाती-जमातीत विभागलेला समाज द्वेषावर विश्वास ठेवणारा नाही. मात्र, त्याला द्वेषाची शिकवणी देण्याचे उद्योग प्रकाश आंबेडकरांनी नियमितरित्या चालवले. राज्यातील फडणवीस सरकारला पेशवाईची उपमा देत त्यांनी एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे कसे उभे करता येईल, याच्या खेळी वेळोवेळी खेळल्या. कोरेगाव-भीमा दंगलीनंतर प्रकाश आंबेडकरांनी नवनवे डाव टाकत राज्यातील सवर्ण आणि अनुसूचित जाती-जमातीतील समाजात कसे वैमनस्य निर्माण होईल, यासाठी पुरेपूर कष्ट उपसले. अर्थात, आंबेडकरांचे हे उद्योग बिलकुल नवे नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी असले प्रकार याआधीही केलेले आहेतच. शिवाय भाजप, रा. स्व. संघाला मनुवादी, घटनाविरोधी ठरवत मतांची बेगमी करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच माध्यमांसमोर येत, आरोपबाजीही केली. राज्यातल्या अनुसूचित जाती-जमातीतील लोकांनी मात्र ज्यात तथ्य नाही, त्या आरोपांच्या आहारी जात प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभे राहण्याचे प्रगल्भपणे टाळले. आंबेडकरी जनता आपल्यामागे येत नसल्याचे पाहत प्रकाश आंबेडकरांनी माओवाद्यांना सोबत घेण्याचे, त्यांची पाठराखण करण्याचे अनेक कारनामेही केले. आता त्याच प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींच्या शेरवानीचे टोक पकडत एमआयएमला जवळ करण्याचे नाट्य आरंभले.

 

प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू. पण, प्रकाश आंबेडकरांची सर्वच धोरणे नेमकी बाबासाहेबांच्या विचारांना उभा-आडवा छेद देणारीच. बाबासाहेबांनी आपल्या हयातीत मुस्लिमांच्या धर्मांधतेवर टीकास्त्र सोडत परखड चिकित्सा केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ओळख त्यांच्या राजकारणामुळे धर्मांध अशीच झालेली आहे. अशा ओवेसींशी प्रकाश आंबेडकरांनी हातमिळवणी करण्याचे ठरवले. प्रकाश आंबेडकरांच्या हातमिळवणीचा इतिहास मोठा आहे. “माओवादी देशाचे खरे मित्र आहेत, सरकार त्यांच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार करते,” असे विधान करून प्रकाश आंबेडकरांनी याआधी चांगलीच खळबळ उडवून दिली होती. कोरेगाव-भीमा येथील दंगलीनंतर त्यातील माओवादी संबंध उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणी माओवाद्यांची धरपकडही केली. प्रकाश आंबेडकरांनी मात्र याच माओवाद्यांची पाठराखण करत आपण कोणाच्या बाजूने आहोत, हे दाखवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवादी-माओवादी-कम्युनिस्ट विचारसरणीचा खुलेआम निषेध करत देशाला या लोकांपासून धोका असल्याचे सांगितले होते. प्रकाश आंबेडकरांनी मात्र आपल्या आजोबांच्या विचारांनाच तिलांजली देत माओवाद्यांना पाठिंबा देत स्वतःचा स्वार्थ जोपासणे पसंत केले, हे नेमके कसले लक्षण मानायचे?

 

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांचे स्थान खरे तर राजकीयदृष्ट्या तितकेसे मोठे नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाचीच आकडेवारी पाहिली तर दोन्ही पक्षांना एकत्रितरित्या दोन टक्केही मते मिळवता आलेली नाहीत. म्हणजेच जिथे अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लीमबहुल परिसर आहे, तो भाग वगळला तर या दोन्ही नेत्यांना कोणी किंमतही देत नाही. शिवाय ‘माओवाद की आंबेडकरवाद’ असा नवाच संभ्रम प्रकाश आंबेडकरांनी आपल्या अनुयायांत निर्माण करून ठेवला आहे, त्यामुळे आता त्यांच्यामागे नेमकी किती जनता असेल, याचीही मोठी शंका आहे. अर्थात, राजकारणात मते मिळवण्याच्या मूल्यापेक्षा अनेकदा उपद्रवमूल्यालाच जास्त किंमत असते. माध्यमांनाही आपल्या टीआरपीसाठी नाचवायला अशीच पात्रे लागतात. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी माध्यमांची ही गरज भागवत असल्याने त्यांच्या बेकार विधानांना प्रसिद्धीही मिळते. दुसरीकडे ‘वंचित बहुजन विकास आघाडी’सारख्या अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लिमांना सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी आकाराला आलेल्या युती-आघाड्यांचे प्रयोग यापूर्वीही झाले. त्यातून समाजात द्वेष पसरविणाऱ्यांचे राजकीय हित मात्र साधले नाही. पण, या लोकांच्या भाषणबाजीमुळे एकसंध समाजाची मने मात्र दुभंगली. अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लीम एक असून उर्वरित सर्व समाज आपला दुश्मन आहे, अशी दुर्भावना रुजवणे समाजाला सार्वत्रिक हितापासून दूर ठेवणारेच आहे. आगामी काळात मात्र असाच अपप्रचार जोरदारपणे केला जाईल. २०१९ च्या निवडणुकीपर्यंत या अपप्रचाराला चांगलीच रंगत चढेल. मतदानानंतर मात्र या दोन्ही महाभागांना आपली जागा नेमकी कुठे आहे, हे दिसेल. पण, आपल्या मतलबासाठी या दोघांनी समाजात कालवलेले विष प्रदीर्घ काळापर्यंत कलहाचे वातावरण निर्माण करत राहिल, हेही नक्की.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@