उद्योग देशसेवेचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |


 


केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत खेळांना उन्नतीच्या शिखरांवर पोहोचवण्याची शपथ घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाने सुवर्णपदकांची कमाई करत त्यादृष्टीने पाऊलही उचलले आहे. मात्र, या सार्‍यांमध्ये आणखी एका ध्येयाने झपाटलेली व्यक्ती म्हणजे प्रेसिहोल कंपनीचे संस्थापक आणि संचालक अयाझ काझी.

 

उद्योजकाचे संपूर्ण नाव : अयाझ काझी

कंपनीचे नाव : प्रेसिहोल मशीन टुल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रेसिहोल स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीचे उत्पादन : डीप होल ड्रिलींग मशीन, स्पोर्ट्स एअर गन्स

व्यावसायिक क्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

कर्मचारी संख्या : २००

वार्षिक उलाढाल : ४० कोटी

प्रेरणास्रोत : नारायण मूर्ती

भविष्यातील लक्ष्य : वाजीव किमतीतील एअर गन्सची निर्मिती

 

आपल्या देशासाठी नेमबाजीत सुवर्णपदके कमाविणार्‍यांची संख्या आणखी वाढावी, खेळाडूंना अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या शुटींग रायफल भारतातच उपलब्ध व्हाव्यात, शुटींगसाठी भारताबाहेरून रायफल आयात करण्यात त्यांचे पैसे वाया जाऊ नये, हे एकमेव ध्येय मनासमोर ठेवत अयाझ काझी यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेसिहोल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडही कंपनी स्थापन केली. एअरगन बनवणारी आणि एअरगन बनवण्यासाठी लागणार्‍या सर्व सुट्या भागांचे उत्पादन करणारी ‘प्रेसिहोल’ ही भारतातील एकमेव कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ३५ हजारांपासून विक्री केल्या जाणार्‍या स्पोर्ट्स शुटींग रायफलची किंमत ‘प्रेसिहोल’ कंपनीत केवळ १० हजारांपासून सुरू होते. देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये नेमबाजी खेळाविषयी जागृती करण्याची आणि त्याचे प्रशिक्षण पुरवण्याचे ध्येय काझी यांनी उराशी बाळगले आहे.

 

खरं तर अयाझ काझी यांचा मूळ व्यवसाय डीप ड्रीलिंग सोल्युशन्स उद्योगांसाठी मशीन बनवण्याचा. लॅपटॉप, वाहने, विमानाचे सुटे भाग, रेमिंग मशीन बनवण्यासाठी लागणारी यंत्रे ‘प्रेसिहोल मशीन प्रायव्हेट लिमिटेड’द्वारे उत्पादित केली जातात. काझी यांचे आई-वडील शिक्षक. त्यामुळे सुरुवातीपासूनच सरकारी नोकरी करण्याचा सल्ला काझी यांना लहानपणापासूनच मिळाला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले काझी यांनी एका खासगी कंपनीत नोकरीला सुरुवातही केली. पण, तिथे त्यांचे मन काही रमत नव्हते. त्यात घरच्यांचा आधीपासूनच उद्योग-व्यवसायाला विरोध. या मानसिकतेतून घरच्यांना बाहेर काढणे काझींना अवघड गेले. या दरम्यान त्यांना दोन समविचारी मित्र भेटले. विश्वनाथ नायक, अनिल कुलकर्णी आणि १९८८ साली सुरुवात झाली ‘प्रेसिहोल मशीन टुल्स प्रायव्हेट लिमिटेड’ची. ड्रिलींग मशीन क्षेत्र तसे सामान्यांपासून दुर्लक्षितच. मात्र, लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांसाठी लागणार्‍या यंत्रणेचा पुरवठादार असलेल्या ‘प्रेसिहोल’ कंपनीचे रोपटे आज तीस वर्षांनी हजारो उद्योजकांना उत्पादन व सेवा पुरवणारा आणि दोनशेहून अधिक कर्मचार्‍यांना रोजगार देणारा वटवृक्ष बनला आहे. या कर्मचार्‍यांपैकी निम्म्याहून अधिक अभियंते आहेत.

 

"मेहनत कराच पण त्या जोडीला हुशारी चिकाटी हवी समाजाला काहीतरी देण्याच्या भावनेतूनच उद्योगाची पायाभरणी भक्कम होऊ शकेल."

सुरुवातीला काझी आणि इतर सहकार्‍यांनी एका लहानशा कारखान्यात एक मशीन बनवले होते. त्यानंतर प्रयोग यशस्वी झाल्यावर अनेक कंपन्यांची कंत्राटे मिळाली. प, जागेची वानवा, पैशांची अडचर होतीच. मोठी कंत्राटे पूर्ण करण्यासाठी तितकेच भांडवल आवश्यक होते. मात्र, उद्योगविश्वात यशस्वी भरारी घेण्यासाठी सज्ज असलेल्या काझी यांच्यासमोरील हे आव्हानही तितक्या लवकरच मिटले. मोठी स्वप्न बघा, ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, चातुर्य आणि जिद्द अंगी बाळगल्यास ती पूर्ण होतील, हा काझी यांचा शाचा मंत्र त्यावेळेसही लागू झाला. गुंतवणूकदारांना कंपनीला मिळालेली कंत्राटे दाखवल्यावर त्यांनी भांडवल देण्यास होकार दिला आणि बघता बघता कंपनीची पाळेमुळे देशविदेशात पसरली. प्रेसिहोल प्रा. लि. आज डीप होल ड्रिलिंग कंपनीचे तंत्रज्ञान देशविदेशात पोहोचवत आहे. १९८८साली स्थापन केलेल्या कंपनीच्या विकासाचा आलेख हा दरवर्षी वाढत आहे. ‘प्रेसिहोल’च्या प्रगतीचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे, ते म्हणजे काझी यांनी कामगारांना दिलेला मंत्र. काझी यांनी तंत्रज्ञानात आपण जर्मनीतील उद्योगांशी, तर किमतीच्या बाबतीत चिनी उद्योगांशी स्पर्धा करावी, असे म्हणतात. या दृष्टीने काम सुरू झाल्यावर नफ्यात वाढ आणि खर्चात आमूलाग्र घट झाली. एक मशीन बनवण्यापासून सुरुवात झालेल्या या कंपनीची आजमितीला ४० कोटींची उलाढाल आहे. पाच वर्षांपूर्वी काझी यांची ओळख डॉ. योगेंद्र शिरसाट यांच्याशी झाली. डॉ. शिरसाट हे पेशाने डॉक्टर, पण त्यांना एअर रायफल शुटींगचा छंद. छंद व्यवसाय म्हणून निवडलेले डॉ. शिरसाट राष्ट्रीय स्तरावर नेमबाज. नेमबाजीसाठी त्या काळात भारतात रायफल मिळणे कठीण. मग ओळखीच्या खेळाडूंना विनवण्या करून रायफलद्वारे सराव सुरू केला. स्पोर्ट्स रायफल बाहेरच्या देशातून खरेदी करण्यातही मोठी अडचण आली. काझी यांचा ड्रिलींग उद्योग पाहिल्यावर त्यांना खेळासाठी रायफल बनवण्याची कल्पना सुचली. काझी आणि इतर संचालकांनाही ती आवडली आणि सुरुवात झाली प्रेसिहोल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नव्या कंपनीची.

 
 

 

आज देशविदेशातून नेमबाज त्यांच्याकडे एअरगन खरेदीसाठी येतात. नव्याने येणार्‍या खेळाडूंना सुरुवातीला सुरक्षितता आणि प्रशिक्षण देण्याचे काम येथील प्रशिक्षक करतात. खेळाडूला प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षकांच्या संमतीनेच ही रायफल दिली जाते. चुकीच्या हातात रायफल पडू नये, त्याचा गैरवापर होऊ नये याची पुरेपूर काळजी कंपनी प्रशासन घेते. व्यवसाय झाला नाही तरी चालेल, पण चुकीच्या हातात हे हत्यार पडून त्याचा गैरवापर नको, हे कंपनीचे तत्व आहे. खेळासाठीच याचा वापर व्हायला हवा, असा स्वतः काझी यांचा कटाक्ष आहे. शाळेपासूनच नेमबाजीची विद्यार्थ्यांना ओळख व्हायला हवी अर्थात प्रशिक्षकांच्या देखरेखीत अशी डॉ. शिरसाट आणि काझी यांची इच्छा आहे. तसेच नेमबाजीत देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळावीत, असेही त्यांना वाटते. नेमबाजीत आणखी खेळाडू घडावेत हेच कंपनीचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. देशातील नेमबाजांना जागतिक दर्जाची उत्पादने कमी किमतीत आपल्याच देशात मिळावीत, असा या कंपनीचा उदात्त हेतू. डॉ. शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली एअर रायफलसाठी संशोधन आणि विकास विभाग कार्यरत असतो. जगभरातील तंत्रज्ञानाशी त्यांची स्पर्धा सुरूच असते. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवतात, त्याप्रमाणे देशाच्या कामासाठी या ध्येयाने झपाटलेली कंपनीतील ही चार माणसे याचे उदाहरण. नेमबाजीतील स्पर्धांना प्रायोजकत्व देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कंपनीची योजना आहे. कंपनीला ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’चा (टीसा) सर्वोत्तम कंपनीचा पुरस्कारही मिळाला आहे.
 

-तेजस परब

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@