कट्याल स्पोर्ट्स केमिकल्सची अल्पावधीत गरुडभरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |


 

साधारण ४० वर्षांपूर्वी नागपूर येथून अवघे १०० रुपये घेऊन घरातून निघालेल्या उदय केळकर यांच्या कट्याल स्पोर्ट्स आणि केमिकल कंपनीने अल्पावधीत उंच भरारी घेतली. जिद्द, सचोटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या आधारे आजमितीस या कंपनीने सात ते आठ कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचा टप्पा गाठला आहे.

 

उद्योजकाचे नाव : उद्य केळकर

कंपनीचे नाव : कट्याल स्पोर्ट्स अॅण्ड केमिकल्स प्रा. लि.

कंपनीची उत्पादन : सिंथेटिक फूड कलर

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

कर्मचारी संख्या : ४५ कर्मचारी

वार्षिक उलाढाल : ७-८ कोटी

प्रेरणास्त्रोत : स्वतःमधील जिद्द सचोटी आणि प्रामाणिकपणा

भविष्यातील लक्ष्य : उत्पादन ४० ते ५० टनापर्यंत वाढवणे.

 

बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कट्याल स्पोर्ट्समध्ये गेल्या आठ वर्षांपासून अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणार्‍या रंगांची निर्मिती केली जाते. या उद्योगापूर्वीनर्मदा डायकेम’ आणि ‘नर्मदा केमिकल्स’ या नावाने उत्पादन केले जात होते. उदय केळकर आणि भागीदार नरवदाशंकर दवे यांच्या नेतृत्वाखाली २००८ सालापासून अन्नपदार्थांसाठी लागणार्‍या रंगांची निर्मिती करण्यात येते. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेल्या उदय केळकर यांनी १९७९ च्या सुमारास नोकरीच्या शोधात अवघे १०० रुपये घेऊन मुंबई गाठली. १९७९ ते १९८८ सालापर्यंत ठाण्यात एका केमिकल कंपनीत त्यांनी नोकरी केली. त्या नोकरीच्या अनुभवाच्या शिदोरीवर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना उदय केळकर यांच्या मनात सुरू झाली. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये १९८८ साली कट्याल स्पोर्ट्स आणि केमिकल प्रायव्हेट लि. कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे भागीदार दवे यांनी भांडवलाची बाजू सांभाळली. रासायनिक प्रक्रिया करणार्‍या दोन कंपन्यांनंतर सिंथेटिक फूड कलर्सच्या कंपनीची त्यांनी सुरुवात केली. व्यवसाय सांभाळत असतानाच बदलापूरमधील शिक्षणसंस्था, रोटरी क्लब या सामाजिक संस्थेशी केळकर यांचा घनिष्ट संबंध आला. कारण, केवळ नफा एके एके नफा अशा व्यावसायिक समीकरणांवर लक्ष केंद्रित न करता त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्येही बहुमोल कार्य केले.

 

"नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा, नव्याने उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍यांनी त्या व्यवसायाची पूर्ण माहिती जाणून घ्यावी, त्यातील बारकावे जाणून घ्यावेत. याशिवाय सचोटी, जिद्द मेहनत करण्याची तयारी ठेवावी."

 
पूर्वी व्यवसाय सुरू करणे कठीण नव्हते. मात्र, आताच्या काळात कायदे खूपच कडक झाले असून त्यावेळी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख रुपये भांडवल पुरेसे होते. आता मात्र पाच कोटी रुपये भांडवल असल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नसल्याची खंत केळकर व्यक्त करतात. व्यवसाय सुरू केला तो काळ सर्वार्थाने कठीण असल्याचे ते सांगतात पण, सध्या त्रयस्थ पार्टीमार्फत उत्पादन-विक्रीची व्यवस्था केली जाते आणि ती उद्योगाच्या पोषकतेस फायदेशीर असल्याचा विश्वास केळकर यांना वाटतो. कुठलाही उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्याच्या विस्तारासाठी वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. पूर्वी बदलापूरमध्येही दळणवळणाच्या फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. लोकलची संख्याही कमी होती पण, आता मात्र बदलापूरला येणार्‍या लोकलची संख्याही वाढली आहे. याशिवाय दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांची सोयही समाधानकारक असल्याने या क्षेत्रात उद्योगासाठी सध्या चांगले आणि पोषक वातावरण आहे. स्थानिकांनाच नोकरीसाठी प्राधान्य देण्याचा निर्णय झाल्याने बदलापूर आणि परिसरातील कामगार कंपनीत काम करत असल्याचेही केळकर अधोरेखित करतात. कट्याल स्पोर्ट्स अॅण्ड केमिकल्स प्रा. लि. मध्ये सध्या कर्मचारी आणि अधिकारी असे मिळून ४५ कर्मचारी काम करतात. या कंपनीचे कामकाज एकूण तीन पाळ्यांमध्ये चालते. या कंपनीची वार्षिक उलाढाल आठ कोटी रुपये आहे. सध्याच्या व्यवसायात उत्तरोत्तर वाढ कशी होईल, याकडे केळकर आणि दवे यांचे लक्ष आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्यांच्या पुढील उद्योजकीय वाटचालीस शुभेच्छा!
  

- श्रीकांत खाडे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@