दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संगणकाची दृष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
स्वत: अंध असताना इतर अंधांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न तान्या बलसारा करत आहेत. दृष्टिहीनांना संगणक शिक्षण देऊन त्यांनी त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे.
 

लहानपण म्हणजे प्रत्येकाचे खेळण्या बागडण्याचे दिवस. परंतु, या मौजमजा करण्याच्या ऐन उभारीच्या दिवसांत तिच्यावर काळाचा एकाएकी आघात झाला आणि आयुष्यासमोर फक्त अंधार उभा ठाकला. पण, तिनेही अजिबात हार न मानता आपल्या अंधकारमय आयुष्यावर जिद्द, मेहनतीने मात केली. तिला प्रकाशाचा मार्ग सापडला. केवळ स्वत: यशस्वी होऊन ती थांबली नाही, तर इतरांच्या वाट्याला असा अंधकारमय जीवनप्रवास येऊ नये, म्हणून ती आजही प्रयत्नशील आहे. ही धाडसी तरुणी म्हणजे मुंबईची तान्या बलसारा. तान्याने एमएनबी इंडस्ट्रीयल होम फॉर दी ब्लाईंड, जोगेश्वरी येथे तान्या संगणक केंद्र सुरू केले. या संगणक केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे, एक अंध व्यक्तीने दृष्टिहीनांसाठी सुरु केलेले हे अनोखे, आगळेवेगळे संगणक केंद्र. याविषयी तान्या सांगते की “या विद्यार्थ्यांना शिकविताना एका शिक्षकाप्रमाणे नाही, तर मित्राप्रमाणे मी शिकविते. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली की माझ्याकडे या. मी काहीही करून तुमची गरज पूर्ण करण्याचा सर्वोपरी प्रयत्न करेन.”

 

तान्याच्या या संगणक केंद्रात शिक्षण घेतलेले विद्यार्थी यशाची विविध शिखरे आज पादाक्रांत करत आहेत. “माझ्या काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या असून काहीजण सिंडिंकेट बँक, देना बँक, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या बँकेत सध्या काम करत आहे.” या केंद्राचा विस्तार करण्याचे सध्या नियोजन सुरू असल्याचेही तान्या म्हणाल्यातान्याचा जन्म ३८ वर्षांपूर्वी एका चांगल्या घरात झाला. तान्या बलसारा ही सॅम बलसारा यांची मुलगी. सॅम हे फक्त ‘मॅडिसन कम्युनिकेशन’ पुरते मर्यादित नसून ते भारतीय जाहिरात एजन्सी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते ‘ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन’ आणि ‘अॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्डस कौन्सिल ऑफ इंडिया’चेही यापूर्वी अध्यक्षही होते. सगळे काही अगदी सुरळीत असताना बलसारा कुटुंबीयांवर मात्र दु:खाची कुऱ्हाड कोसळली. तान्याची दृष्टी हळूहळू कमी होत असल्याचे तिच्या पालकांना जाणवले. त्यानंतर तान्याच्या पालकांना उपचारासाठी डॉक्टरांच्या वार्‍याही कराव्या लागल्या आणि अखेर त्याच्या डोळ्यांच्या हालचालींबाबत निदान करण्यात आले. तिला ‘रेटिनाइटिस पिगमेंटोसा’ नावाचा डोळ्यांचा आजार झाल्याचे सांगण्यात आले आणि कालांतराने तिची दृष्टी पूर्णपणे हरपली.

 

पण, या कठीणसमयीही सर्वात महत्त्वाची असते ती आपल्या माणसांची साथ. तान्याला तिचे कुटुंब आणि तिच्या भोवतालच्या लोकांनी कधीही सापत्न वागणूक दिली नाही. तिला कधीही तिच्या अंधत्वाची जाणीव करुन दिली नाही. सुदैवाने, शालेय जीवनात तिला चांगले शिक्षकही मिळाले. ते अतिशय आश्वासक होते, त्यांच्या मार्गदर्शनामुळे तिचा प्रवास सहज आणि काहीसा आरामदायी बनलाशालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पाही तान्याने यशस्वीरित्या पार केला. पहिल्यावर्षी तिने आपली मैत्रिण प्रिया आणि नंतर तिची बहीण लारा सोबत जीवनप्रवास सुरू केला. २००० मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून पदवी प्राप्त केली. तिची पदवी पूर्ण झाल्यानंतर, तान्याने ‘इंडियन असोसिएशन ऑफ व्हिज्युअल हॅन्डिकॅप’मध्ये (आयएव्हीएच) मूलभूत संगणकाच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला, ज्याने तिच्या आयुष्याला संपूर्णपणे कलाटणी मिळाली. संगणकाच्या जगतात प्रवेश केल्याने तिच्या आधीच्या जीवनात बदल झाला. त्यानंतर तिने घोषणा, प्रसारण, तुलना आणि डबिंग, क्रिएटिव्ह जाहिरात इ. सारखे अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले.

 

तान्याने संगणक प्रशिक्षणाचा पहिला अनुभव २००४-०५ साली घेतला. मुकेश जैन नावाची एक व्यक्ती संगणकासंदर्भात शंका विचारण्यासाठी आणि सल्ला मागण्यासाठी तान्याकडे आली. मुकेश जैन आल्यानंतर दृष्टिहीनांबाबत काही करता येईल का? हा विचार पुढे आला. यामुळे तिच्या कुटुंबाला संगणक केंद्र उभारण्याची कल्पना सूचली, जेणेकरुन अधिक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. जानेवारी २००६ मध्ये एमएनबी इंडस्ट्रीयल होम फॉर दी ब्लाईंड, जोगेश्वरी येथे ‘तान्या संगणक केंद्रा’चा जन्म झाला. तेव्हापासून खरोखर एक आश्चर्यकारक हेतूने समाधानकारक प्रवास सुरू झाला आहे. टीसीसीच्या व्यतिरिक्त, तान्या दृष्टिहीन लोकांच्या कल्याणासाठी उभारली जाणारी एक स्वयंसेवी संस्थाब्लाईंड ग्रॅज्युएट फोरम ऑफ इंडिया’शी (बीजीएफआय) सोबतही काम करत आहे. ‘बीजीएफआय’ विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करते, जसे ज्ञान सामायिकरण सत्र, ट्रेक, पिकनिक आणि अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम यांचे आदानप्रदान करतेकेंद्राच्या बाहेरसुद्धा तान्या हरवून जाते. तान्या तिच्या जिवलग असलेल्या भाच्याशी आणि भाचीशी गप्पा मारण्यात रमते. फोनवर गप्पा मारत, चॅटिंग करत आणि जिमला जाण्यासाठीचा तिचा उत्साह ओसंडून वाहत असतो. तिला उच्च स्वरात संगीत ऐकणे, बागेत फिरायला जाणे आणि आईबरोबर वादविवाद करणे खूप आवडते. अशा या तान्याच्या कार्यकर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

 - नितीन जगताप
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@