एक सुसाट उद्योगचालक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |


 

 
 

एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरावं, गाड्यांच्या पार्ट्सची निर्मिती सुरू करावी आणि बघता बघता या उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावारूपाला येत मोठमोठ्या कंपन्यांना आपली उत्पादनं पुरवण्यापर्यंत झेप घ्यावी... सर्वसाधारण कुटुंबांच्या जीवनकथांमध्ये दुर्मीळ ही यशोकथा आहे, ‘त्रिमूर्ती ऑटोडेको कम्पोनंट्स प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना करणारे मकरंद जोशी यांची.

 

उद्योजकाचे नाव : मकरंद जोशी

कंपनीचे नाव : त्रिमूर्ती ऑटोडेको कम्पोनंट्स प्रा. लि.

कंपनीचे उत्पादन : गाड्यांमधील विविध भाग

व्यावसायिक कार्यक्षेत्र : देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय

वार्षिक उलाढाल : ९५ कोटी

कर्मचारी संख्या : ५५०

भविष्यातील लक्ष्य : २०० कोटींची उलाढाल

 

थर्मल, अॅकॉस्टिक इन्सुलेशन्स मटेरिअल अर्थात गाड्यांमध्ये उष्णता आणि आवाज कमी करणारे भाग निर्मिती करण्याचं काम त्रिमूर्ती ऑटोडेको कम्पोनंट्स प्रा. लि. ही कंपनी करते. १९९१ मध्ये एका छोट्या ट्रेडिंग बिझनेसपासून सुरू झालेला मकरंद जोशी यांचा हा प्रवास आज एका महत्त्वाच्या आणि मुख्य म्हणजे यशाच्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे आणि पुढेही अखंडपणे सुरू आहे.

 

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जन्मलेल्या मकरंद जोशी यांचं शिक्षण पुण्यात झालं. केमिकल इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या जोशी यांची घरची परिस्थिती कोणत्याही मध्यमवर्गीय, नोकरदार कुटुंबाची असते तशीच होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी नोकर्या करून जोशी १९९१ मध्ये ट्रेडिंग बिझनेसमध्ये उतरले. १९९७ मध्ये जोशींना फोम, टेप्स आदी साहित्याच्या उत्पादन क्षेत्रात उतरण्याचे प्रस्ताव आले. त्यांनी ते स्वीकारले आणि उत्पादन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. फिलिप्सपासून अनेक कंपन्यांना त्यांनी पुरवठा केला. जेमतेम १०-१५ कर्मचाऱ्यांसह, पुण्यातील धायरीमध्ये एक छोटीशी जागा घेऊन जोशी यांचा व्यवसाय सुरू झाला. २००३ मध्ये नर्‍हे गावात जोशींनी १५०० चौ. फुटांची एक जागा विकत घेतली. यानंतर आमच्या प्रगतीला खरी सुरुवात झाली, असं स्वतः मकरंद जोशी सांगतात. “२००६-०७ मध्ये उद्योग बहरला, परंतु २००८-०९ मध्ये पुन्हा जागतिक मंदीचा मोठा फटकाही बसला. या काळात आम्ही खूप शिकलो,” असं ते म्हणतात. त्यानंतर असेच यशापयशाचे आलेख चढत-उतरत २०१३ पर्यंत जोशी यांनी सावधपणे वाटचाल केली. २०१३ नंतर मात्र त्यांच्या ‘त्रिमूर्ती’ कंपनीने प्रतिवर्षी जवळपास २० टक्के वेगाने प्रगती केली. २००६ मध्ये पुणे-सातारा मार्गावर पारगाव-खंडाळा गावी ‘त्रिमूर्ती’ने प्लांट उभारला होता. त्यानंतर आता खेड-शिवापूर भागातच जवळपास नऊ कोटी रुपये खर्चून नवी जागा त्यांनी घेतली असून तिथेही १ लाख चौ. फुटाचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे. आज ‘त्रिमूर्ती’द्वारा टाटा मोटर्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, फोक्सवॅगन, ह्युंदाई आदी मोठ्या कंपन्यांना उत्पादनं पुरवत असून येत्या काळात जॅग्वार-लँडरोव्हरसारख्या कंपनीलाही ‘त्रिमूर्ती’कडून उत्पादनं पुरवण्यात येणार आहेत. ऑटोडेको कम्पोनंटससह ‘त्रिमूर्ती’ कंपनी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचंदेखील उत्पादन करू लागली आहे. तसेच, डोमेस्टिक अॅप्लायन्सेसमध्येही कंपनी कार्यरत असून व्हर्लपूलसारख्या मोठ्या कंपन्यांना उत्पादनं पुरवत आहे. आज भारताबाहेर नऊ देशांमध्ये ‘त्रिमूर्ती’ची उत्पादनं पोहोचलेली आहेत.

 

"आजच्या काळात, नव्या पिढीत क्षमता आहे. अनेकजण उद्योग-व्यवसायात उतरून यशस्वी होत आहेत. मात्र, यासाठी ज्या क्षेत्रात तुम्हाला उतरायचं आहे, त्याचं तुम्हाला ‘पॅशन’ असायला हवं. कोणताही व्यवसाय त्याशिवाय करता येऊ शकत नाही. जेवढं त्या विषयात तुम्ही खोल जाता, नवे प्रयोग करता, तितके तुम्ही यशस्वी होता. यासाठी मन लावून, सचोटीने काम करता आलं पाहिजे."

 

‘बिझनेस’ म्हटलं की संघर्ष वा संकटाचा प्रसंग रोज कधी ना कधी येतच असतो. परंतु, २००८-०९ चा जागतिक मंदीचा काळ आतापर्यंतच्या वाटचालीत अत्यंत खडतर आणि तितकंच नवीन काही शिकवणारा होता, असं मकरंद जोशी सांगतात. त्या काळात लोकांना बसवून पगार द्यावे लागत होते. परंतु, लोकांना सोडूनही चालणार नव्हतं. वर्षभर ही ओढाताण त्यांना सहन करावी लागली. परंतु, याही संकटाचा सामना करत मकरंद जोशी आणि ‘त्रिमूर्ती’ कंपनी पुढे जात राहिली आणि यशस्वीही झाली. या सर्व वाटचालीत कुटुंबाचा आणि विशेषतः जोशी यांच्या पत्नीचा भक्कम पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे ते सांगतात. आज या कंपनीत ५५० कर्मचारी कार्यरत आहेत. भविष्यात इव्हीए फोम, टॉईज आदी उत्पादनांची निर्मिती करण्याचीही कंपनीची योजना असून ‘डिस्ने’सारख्या नामांकित जागतिक कंपनीला ‘त्रिमूर्ती’ उत्पादनं पुरवणार आहे. तसेच, सध्या कंपनीची असलेली ९५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल २०२० पर्यंत २०० कोटी रुपये इतकी करण्याचे लक्ष्यही मकरंद जोशी यांनी निर्धारित केलं आहे.

 
 
 

कंपनीची ही यशस्वी वाटचाल सुरू असतानाच, सामाजिक कृतज्ञतेचं भानही मकरंद जोशी यांनी जपलं आहे. कंपनीने पुण्यातील सीओईपी (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) मध्ये शिकत असलेली चार मुले दत्तक घेतली असून त्यांचा वर्षाचा पूर्ण खर्च कंपनी करते. तसेच कंपनीने एक सेवाभावी संस्थाही चालवली असून त्या माध्यमातून रुग्णालयांतील गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. मकरंद जोशी यांच्या उद्योगक्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल त्यांना ‘टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन्स’साठीचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत पुरस्कार व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

- निमेश वहाळकर

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@