उद्ध्वस्त किल्लारीचा हृदयद्रावक धडा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018   
Total Views |

 


 
 
 
२५ वर्षांपूर्वी एका क्षणात किल्लारीच्या भूकंपाने होत्याचं नव्हतं झालं. आजही जगभरात भूकंपामुळे हजारो नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागते. पण, विज्ञान-संशोधन क्षेत्रातील अवकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रगतीला मात्र जमिनीखालील भूकंपाचे धक्कातंत्र आजही वेळेपूर्वी अचूक नोंदवता आलेले नाही. म्हणूनच इंडोनेशियामध्ये आजही धोक्याच्या पूर्वसूचनेअभावी भूकंपाने शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. तेव्हा, भूकंपाच्या अशा या हृदयद्रावक घटनांमधून धडा घेऊन विज्ञानावर यावर मात करता येईल का?
 

लातूरचा भूकंप’ ही महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील एक मोठी, अघटित नैसर्गिक आपत्ती. २५ वर्षांपूर्वी दि. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी लातूरसह आसपासचा परिसर धरणीकंपाने पुरता हादरला. कोणाला काही समजण्यापूर्वीच साखरझोपेत असलेल्या निष्पापांना या भूकंपाने मृत्यूच्या दाढेत ओढले. या भूकंपात हजारो घरे जमीनदोस्त झाली. माणसेच्या माणसे दगड-धोंड्याखाली गाडली गेली. दहा हजार माणसांच्या आयुष्याची ती अखेरची काळरात्र ठरली, तर ३० हजार माणसे जखमी झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूरच्या किल्लारी गावाकडे होता. आजही त्या भीषण भूकंपातून कसाबसे बचावलेल्यांना ते धक्के आजही तितकेच अस्वस्थ करतात. या भूकंपामुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानीला महाराष्ट्राला सामोरे जावे लागले. कारण, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारी तत्पर आपात्कालीन व्यवस्था त्या वेळी कार्यरत नव्हती आणि आजही परिस्थिती ‘जैसे थे’च म्हणावी लागेल.

 

भूकंपातील महत्त्वाच्या घटना

 

या भीषण भूकंपामुळे एकट्या लातूर जिल्ह्यातील ७८६ गावातील सव्वा लाखांहून जास्त घरे उद्ध्वस्त होऊन, सुमारे सहा हजार गुरे व चार हजार माणसे दगावली, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५३७ गावांतील सुमारे ६० हजार घरे उद्ध्वस्त होऊन, १६ हजार गुरे व चार हजारांहून अधिक माणसांना मृत्यूने कवटाळले. या भूकंपाची तीव्रता जरी ६.२ रिश्टर मापनाची असली तरी केंद्रबिंदू किल्लारी गावात १२ किमी खोल होता. त्यामुळे भूकंपाचे धक्के दाट लोकवस्तीत तीव्रतेने जाणवले आणि आजही भूकंपातून उद्भवलेली मोठी भगदाडे दृष्टीस पडतातप्राचीन काळात दख्खनच्या पठारावर भूकंपाचे मोठे स्फोट व्हायचे व आता हे पठार थंड झालेले असतानाही अचंबित करणारा असा हा भूकंप २५ वर्षांपूर्वी भूकंपप्रवण नसलेल्या क्षेत्रात घडला. महाराष्ट्रातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५२ गावांत दख्खनच्या पठारावर अंतर्गत पातळ (intra plate) पृथ्वी-कवच प्रदेशात आढळला. भारतीय मानक संस्थेने (BIS) हा प्रदेश भूकंपप्रवणतेकरिता अगदी खालच्या विभाग एकमध्ये समाविष्ट केला आहे.

 

भूकंपात अडकलेल्यांसाठी साहाय्य म्हणून आंतरराष्ट्रीय देणगीदारांनी पाठविलेले १२० पेक्षाही जास्त ट्रक भरून सामान प्रथम तेथे पोहोचविले गेले. त्या सामानात तंबू, घोंगड्या, खाद्यपदार्थ, कपडे, औषधे आणि राहण्याकरिता कच्च्या घरांचे सामान इत्यादी वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या. स्थानिक देणगीदारांनी स्वयंसेवकही पाठविले. यात रा. स्व. संघामधील स्वयंसेवकांचाही मोठ्या संख्येने मदतकार्यात समावेश होता. भारतीय सैन्यातील, राज्यातील राखीव पोलीस फौजेतील आणि इतर पोलीस फौजेतील जवानांनी भूकंपाच्या ठिकाणी मदतकार्य सुरू केले होतेभूकंप पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्यामुळे बरेचसे लोक झोपेत होते व मृतांमध्ये स्त्रिया व मुलांची संख्या सर्वाधिक होती. लातूरच्या भूकंपाचे भीषण वृत्त कळताक्षणीच जागतिक बँकेकडूनही पुनर्बांधणीच्या घरांकरिता रोख मदत करण्यात आली. भूकंपबाधितांकरिता सरकारने एकूण ४६ लाख रुपयांहून जास्त मदत केली आणि शेतकऱ्यांकरिता सव्वा लाखांहून जास्त शेतीची साधने मोफत पुरविली. ज्यांची गुरेढोरे मेली होती, अशा २९९ शेतकऱ्यांना गुरांचे वाटप केले.

 

या भूकंपानंतर पुढील खबरदारी म्हणून सरकारकडून राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था (NDMA) स्थापन झाली. प्रत्येक जिल्ह्यांकरिता ‘व्हीसॅट’ व ‘व्हीएचएफ’ संपर्कसेवा करण्याची व्यवस्था केली गेली. ही सेवा मात्र अनेक वर्षे कामाविना राहिली. या सेवेचे आता पुनरूज्जीवन करायला हवेपाच वर्षांनंतर पुनर्वसनाकरिता बांधून तयार झालेली ३९ हजार घरे अजून गावकऱ्यांच्या पूर्णपणे ताब्यात सरकारने दिलेली नाहीत. परंतु, या घरांचा बांधकाम दर्जाही सरकारला राखता आलेला नाही आणि त्यांच्या देखभालीकडेही सरकारी दुर्लक्ष झाल्याचे एकूणच चित्र आहे.

 

लातूरचा भूकंप कशामुळे घडला असावा?

 

राष्ट्रीय भूगर्भीय संशोधन संस्थेच्या (NGRI) हैद्राबाद केंद्राच्या भूकंपगणक केंद्रावरील काटा किल्लारीच्या भूकंपानंतर दर्शक-तबकडीच्या मर्यादेबाहेर गेलेला दिसला. हैद्राबाद भूकंप केंद्र हे किल्लारीपासून २६० किमी अंतरावर आहे. दिल्ली केंद्राकडे नागपूर, नाशिक, पुणे, मद्रास व पणजीकडून भूकंपाविषयक ६ रिश्टर विषयक विविध संदेश पोहोचवले गेले. ऑल इंडिया रेडिओवर सकाळपासून लातूरच्या भूकंपाविषयी बातम्या दिल्या गेल्या. त्या दिवशीच्या रात्रीपर्यंतच्या बातमीपत्रांनुसार तब्बल दहा हजार माणसे या भूकंपात दगावल्याचे आकडेवारी सांगते. स्थिर असलेले दख्खनचे पठार भूकंपाविषयीचे प्रवण क्षेत्र नाही, तरी तिथे एवढा मोठा भूकंप व्हावा याचे त्यावेळी शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले. लातूरच्या भूकंपानंतरच्या ज्या घटना घडल्या त्यातून भारतीय वेधशाळेच्या विविध केंद्रांवर शास्त्रीय दृष्टीने असंख्य सुधारणा होण्याची आवश्यकता प्रकर्षाने दिसून आली. ज्या गावात भूकंपाच्या धक्क्याने घरे कोसळली ती सर्व घरे मातीची होती. भूकंपाच्या लहरी आडव्या दिशेने (horizontal) होत्या. उभ्या दिशेने नव्हत्या. यावरून भूकंप सौम्य स्वरूपाचा होता असे निदान काहीजण करत आहेत. किल्लारी गाव पेरणा नदीला लागून वसलेले आहे व लातूर व उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांना पाणी कमी पडायचे म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कूपनलिका खोदून पंपाने पाणी मिळवायचा प्रयास केला होता व त्यामुळे कदाचित हा भूकंप अंशत: मानवनिर्मित कारणांनी घडला असावा, असाही एक कयास बांधण्यात आला. कारण, तिथल्या अनेक काँक्रीटच्या कार्यालयीन इमारती मात्र भूकंपाच्या धक्क्यात टिकून राहिल्या.

 

भूकंपाच्या पूर्वसूचनेसाठी सरकारी उपाययोजना

 

नवीन भाजप सरकारने नजीकच्या काळात विविध राज्यांत ३१ वेधशाळा स्थापण्याचे ठरविले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात ५ केंद्रे, बिहार व हरियाणात प्रत्येकी ४ केंद्रे, दिल्ली व हिमाचल प्रदेशात प्रत्येकी ३ केंद्रे, जम्मू-काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश प्रत्येकी २ केंद्रे, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, छत्तीसगढ, लक्षद्वीप प्रत्येकी १ केंद्र

 

भूकंप प्रवणतेप्रमाणे भारतीय मानक संस्थेने भारताचे पाच विभाग पाडले आहेत.

सर्वात तीव्र प्रवणतेचा प्रदेश विभाग पाच - सर्व ईशान्येकडील राज्ये, उत्तर गुजरात

जरा कमी तीव्रतेचा विभाग चार - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हिमालय रांगा, (नेपाळ व उत्तर पकिस्तान)

त्याहून कमी तीव्रतेचा विभाग तीन - पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल

मध्य तीव्रतेचा विभाग दोन - गंगा नदीचा प्रदेश, राजस्थान, बिहार, ओडिशा, केरळ

तीव्रता नसलेला वा अगदी कमी तीव्रतेचा प्रदेश विभाग एक - दख्खनच्या पठारातील, महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगण, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू

 

मानवनिर्मित भूकंप

 

मोठे जलसाठे व मोठ्या इमारतींमुळे भूकंपप्रवणता वाढल्याचेही अनेक संशोधनांतून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील कोयना-वारणा प्रदेशांत दि. १० डिसेंबर, १९६७ मध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप घडला. त्यानंतरही भूकंपाचे धक्के अनेक वर्षे सुरू राहिले. नेदरलॅण्डमध्ये मानवनिर्मित प्रकल्पांमुळे २०१६ मध्ये भूकंप घडले. अशाचप्रकारे जगात विविध १७० ठिकाणी जलाशय बांधल्यामुळे भूकंपप्रवणता वाढल्याची नोंद आहे. खाणकामामुळेसुद्धा भूकंपप्रवणता वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेतसुद्धा विविध ठिकाणची ७० लाख लोकं मानवनिर्मित भूकंपाच्या सावटाखाली वावरत आहेत. बोस्टनमधील शास्त्रज्ञांनी मानवनिर्मित घटनांमुळे होणाऱ्या भूकंपाचे भाकित सांगता येते, अशा एका सॉफ्टवेअरचा शोध लावला आहे.

 

भूकंपाविषयी नवीन शोध

 

रुरकी आयआयटीमधील शास्त्रज्ञांनी भूकंपप्रवण शहरांकरिता भयसूचना मिळावी, अशा प्रणालीचा शोध लावला आहेलंडनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून भूकंपाचे भाकित करण्याकरिता शोध लावला आहे. जपानमधील टोकिओच्या शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की, भूकंप झालेल्या ठिकाणच्या भूजलात भूकंप घडल्यानंतर हेलियमचा आयसोटोपची (हेलियम-४) उत्पत्ती वाढते. त्यावरून भूकंपाचे निदान करता येते. न्यूयॉर्कच्या शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की, पृथ्वीच्या कवचाखाली खोल गेल्यानंतर जर कोठे भूकंप झाला असेल, तर भूकंपाचा आवाज व चित्रे अनुभवता येतात. लंडनच्या शास्त्रज्ञांनी २०११ मधील जपानमधील तोहोकूच्या घडलेल्या भूकंपानंतर गुरुत्वाकर्षणावर (Gravity) आधारित प्रणालीचा शोध लावला आहे. या प्रणालीच्या साहाय्याने मोठ्या भूकंपाची तीव्रता तत्परतेने जाणता येते. भूकंप घडल्यानंतर नजीकच्या ठिकाणी गुरुत्वामध्ये बदल घडतात. त्याच्या मापनातून या प्रणालीचा शोध लावला गेला आहे.

 

भूकंप विरोधक संरचित इमारती

 

भूकंपाच्या लहरी आडव्या, उभ्या वा वर्तुळाकार येऊ शकतात. पण, त्याकरिता विरोधक शक्ती स्थापण्याकरिता विरोधक-संरचना करावी लागते. पण, ती अत्यंत महाग स्वरूपाची असते आणि त्यापासून भूकंप संरक्षणाची १०० टक्के हमीही देता येत नाही. याकरिता काही पर्यायी संरचनेचे शोध लागले आहेत. ते असे- ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी फायबरसह काँक्रीटच्या साहाय्याने बांधलेले स्ट्रक्चर भूकंपाला दाद देऊ शकतील, अशा संरचनेचा शोध लावला आहे. फायबर वस्तू मात्र भक्कम, पोलादासारख्या तारा व पत्रे करतायेण्याजोगे (EDCC) असायला हव्यात. संदर्भित शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांअंतर्गत भिंतींवर १० मिमी फायबर (EDCC) थर देऊन केलेले बांधकाम भूकंपप्रवणतेला विरोधक ठरले.

 

एका रशियन शास्त्रज्ञाने भूकंपमुक्त बिछान्याकरिता पोलादी खोका तयार केला आहे. भूकंप घडल्यानंतर सेन्सरच्या साहाय्याने आपोआप बिछान्याचे एका पोलादी खोक्यात रूपांतर घडते. बिछान्यावर एक झाकण येऊन बसते. भिंती वा इतर काहीही जिनसा पडल्या तरी इजा होत नाही. आतील पेटीत मदत मिळेपर्यंत, सुटका होईपर्यंत खाण्याचे पदार्थ, पिण्यासाठी पाणी व प्राथमिक शुश्रूषेकरिता औषधे ठेवलेली असतात ती वेळेवर कामाला येऊ शकतातपुण्याजवळील मलीन गावातील घरांना भूस्खलनांनी २०१४ मध्ये बेचिराख केले गेले. त्यामुळे १५१ जण मृत्युमुखी पडले होते व नऊजण जखमी झाले. त्या गावाला पाणी आणण्याकरिता फार कष्ट घ्यावे लागत होते. महाराष्ट्र सरकारने मार्च २०१७ मध्ये गावकऱ्यांसाठी ६७ भूकंपमुक्त घरे बांधली. टेकडीच्या माथ्यावर एक पाणी साठविण्याची मोठी टाकी बांधली. सगळी घरे जलवाहिन्यांनी जोडली. ही घरे लवकरच उर्वरित कामे झाल्यावर गावकऱ्यांच्या ताब्यात दिली जातील.

 

सरकारने मोठे प्रकल्प हातात घेण्याअगोदर त्या ठिकाणची भूकंपप्रवणता वाढत नाही ना, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच खेडोपाडी कूपनलिकांच्या वापरावर बंधन आणणेही गरजेचे आहे. कारण, हे भूकंप जीवितहानीपलीकडेही मानवी संस्कृतीच्या, टप्प्याच्या एका पर्वाची राखरांगोळी करणारे ठरतात. त्यामुळे २५ वर्षांपूर्वीचा किल्लारीचा भूकंप असेल किंवा आता दूर इंडोनेशियामध्ये भूकंप-त्सुनामीमुळे उद्भवलेली भीषण स्थिती, याचा सामना मानवाला आगामी काळातही करावा लागेच. त्यासाठी नवतंत्रज्ञान, संशोधन याच्या बळावर भूकंपाची पूर्वसूचना देणारी संरचना उभारण्याची आज नितांत गरज आहे, अन्यथा दुसरा किल्लारी दूर नाही...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@