भीष्म शरपंजरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |



अर्जुनाच्या बाणांनी विद्ध झालेले पितामह भीष्म जवळ जवळ ५८ दिवस शरपंजरी पडले होते! महाभारताचे युद्ध तर केवळ १८ दिवसच लांबले आणि भीष्मांना मात्र ५८ दिवस असं खितपत पडावं लागलं. याची एक कहाणी आहे.

 

अर्जुनाच्या बाणांनी विद्ध झालेले पितामह भीष्म जवळ जवळ ५८ दिवस शरपंजरी पडले होते! महाभारताचे युद्ध तर केवळ १८ दिवसच लांबले आणि भीष्मांना मात्र ५८ दिवस असं खितपत पडावं लागलं. याची एक कहाणी आहे. असे म्हणतात की, भीष्मांना एक विशेष देणगी जन्मजात मिळाली होती. त्यांना आपल्या प्रत्येक जन्मात काय काय घडले ते पूर्णपणे आठवत असे. त्यांचे एकूण ७३ जन्म झाले. परंतु अंती शरपंजरी पडल्यावर त्यांना कळेना की त्यांच्या हातून असे कोणते पातक कोणत्या जन्मात घडले, ज्यामुळे आता त्यांना हे क्लेश सहन करावे लागत होते. याविषयी श्रीकृष्णाने त्यांना मदत केली जेणेकरून त्यांना नीट आठवण व्हावी आणि त्यांना समोर एक घटना स्पष्ट दिसू लागली.
 

एक युवराज आपल्या रथातून स्वगृही जात होता. अचानक रथ थांबला. काय झाले ते पाहण्यासाठी तो युवराज खाली उतरला. पाहतो तर काय, रथाच्या घोड्यांच्या समोर एक भला मोठा सर्प निपचित पडला होता. त्यामुळे घोडे अचानक थांबले होते. त्या युवराजास वाटले की साप मृत असावा. म्हणून त्याने आपल्या बाणाच्या टोकाने तो सर्प उचलला आणि बाजूच्या झाडीत भिरकावून दिला. मात्र, युवराज एक गोष्ट विसरला होता, ती म्हणजे घोडे कधीही जीवंत प्राणिमात्राला ओलांडून जात नाहीत, तर जागीच उभे राहतात, थांबतात. याचा अर्थ दुर्दैवाने तो साप अजून जीवंतच होता आणि तो बाभळीसारख्या एका काटेरी झाडावर जाऊन पडला. काटे लागता क्षणीच तो वळवळू लागला. तसे त्याच्या शरीरात आणखीन काटे घुसून त्याला अधिक जखमा झाल्या. पुढे तो साप त्याच जखमांनी बेजार होऊन मृत पावला. भीष्मांना आता आठवले की, तो युवराज म्हणजे दुसरे- तिसरे कोणी नसून पूर्वजन्मीचे भीष्मच होते. त्यांनी श्रीकृष्णाला वंदन केले आणि हे आपले चुकीच्या कर्माचे प्राक्तन आहे ते आपल्याला भोगावेच लागणार म्हणून मनोमनी कृतनिश्चय केला की ते क्लेश भोगून मरण पत्करायचे.

 

याशिवाय भीष्मांना जेव्हा बाण लागून ते क्षतविक्षत झाले, तेव्हा दक्षिणायन चालू होते आणि भीष्मांना स्वर्गप्राप्तीसाठी उत्तरायण चालू होईपर्यंत वाट पाहावी लागणार होती. त्यांना त्यांचे पिताश्री शंतनू महाराज यांनी वर दिला होता की, “देवव्रत, तू इच्छामरणी होशील.” तोच वर आता स्वर्गप्राप्तीसाठी वापरून उत्तरायण चालू होईतो त्यांनी शरपंजरी पहुडणे पसंत केले. शिवाय त्यांना हस्तिनापूरविषयी अधिक आत्मीयता होती. जोवर हस्तिनापूर नगरीस योग्य राजा मिळून ती नगरी सर्वतोपरी सुरक्षित होत नाही, तोवर आपण प्राण त्याग करायचे नाही, असे त्यांनी ठरविले होते. पुढे युधिष्ठिराने राज्यारोहण केले आणि त्यांनी सुखाने डोळे मिटले. यापुढे ‘द्रोण पर्व’ सुरू होते आणि राधेय द्रोणांना सेनापती म्हणून धुरा सांभाळण्याची विनंती करतो.

 
 

- सुरेश कुळकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@