मगरीची ८ पिल्ले, २ कासवांची तस्करी आणि सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018
Total Views |



नाशिक: वन्यजीव सप्ताहाच्या सुरवातीलाच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. पथकाने जेलरोड आणि कोकणीपुरा परिसरातून दोघांकडून मगरीची आठ पिल्ले आणि दोन कासवे जप्त केली. फैयाज गयासुद्दीन कोकणी (२०, रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) आणि सौरभ रमेश गोलाईत (२०, रा. मराठानगर, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. दोन्हीही प्राणी हे वन्यजीव संरक्षित अधिसूचीत समाविष्ट असल्याने संशयितांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांना शहरात मगरीची पिल्ले व कासवे विक्रीसाठी आणण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना कारवाईचे आदेश दिले.ठाण्याच्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या मदतीने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली. असोसिएशनच्या सदस्यांनी संशयित कोकणी याच्याशी खरेदीदार म्हणून संपर्क साधला. कोकणीपुर्यातील फैयाजच्या घराजवळ खरेदीसाठी ते भेटले. त्यावेळी संशयित कोकणी याने दोन कासवे आणि मगरीची दोन पिल्ले विक्रीसाठी आणली होती. पोलिसांनी त्यास जेरबंद केले. पोलिसांच्या चौकशीमध्ये फैयाजने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सौरभच्या बंगल्यावर छापा टाकला. तेथून मगरीची सहा पिल्ले जप्त करण्यात आली.

 

एका मगरीच्या पिल्लाची किंमत सुमारे २५ हजार रुपये तर कासवाची किंमत एक लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे. जप्त केलेली ही काळ्या रंगाची कासवे आसाममधील गोड्या पाण्यातील आहेत. घरात कासव ठेवल्याने लाभ मिळतो असा समाज असल्याने घरात छुप्या पद्धतीने कासव ठेवले जाते. त्यासाठी कासवांना मागणी आहे. आसाम, पश्चिम बंगालमधील आदिवासींकडून किरकोळ दरात खरेदी करून त्यांची तस्करी केली जाते. कारवाईत जप्त केलेली मगर आणि कासव हे दोन्ही वन्यजीव संरक्षित अधिसूचीमध्ये समाविष्ट असल्याने त्यांची तस्करी करणे किंवा बाळगणे गंभीर स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा आहे.

 

"संशयितांनी वन्यजीव कोठून आणले, कोणाला विकणार होते, याचा तपास सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी प्राण्यांची तस्करी केली असण्याची शक्यता आहे. यासंबंधी वनविभागालाही कळविण्यात आले असून, त्यांच्याकडून स्वतंत्र कारवाई होईल."

- डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलीस आयुक्त, नाशिक


@@AUTHORINFO_V1@@