आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, मग राममंदिर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |



 

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला


मुंबई : आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधून दाखवा, मग राममंदिर, अशा शेलक्या शब्दांत खा. नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच, निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला आता राममंदिराची आठवण झाल्याचीही टीका राणे यांनी केली.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सरकारवर प्रचंड टीका केली होती. तसेच, राममंदिराचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी भाजपवरदेखील टीकास्त्र सोडले होते. दरवर्षी रावण उभा राहतो, मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही, असे उद्धव म्हणाले होते. या टीकेला भाजपमधून कोणा बड्या नेत्याची प्रतिक्रिया येण्यापूर्वीच नुकतेच भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेलेले नारायण राणे यांनी उद्धव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. राणे म्हणाले की, शिवसेनेला मुंबईतील समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे नेते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत, मंत्रीपदी आहेत. असे असताना मग इतके दिवस राममंदिराचा प्रश्न शिवसेनेने का उपस्थित केला नाही, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. सेनेला एवढाच स्वाभिमान होता तर राजीनामा देऊन शिवसेनेचे मंत्री बाहेर का पडले नाहीत, असाही उपरोधिक प्रश्न राणे यांनी विचारला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे, ‘किर्तनकार आले आणि किर्तन करून गेलेया ढंगाचे होते, अशा शब्दांत राणे यांनी उद्धव यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.

 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केल्याने हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राममंदिर व अन्य राष्ट्रीय मुद्द्यांना हात घालून शिवसेना राष्ट्रीय पातळीवर आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या मतांचे विभाजन करून आपले उपद्रवमूल्य शिवसेना दाखवेल, असाही राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. असे असताना, दुसरीकडे शिवसेनेचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या नारायण राणे यांनी इतक्या तत्परतेने शिवसेनेवर एवढी शेलकी टीका केल्याने पडद्यामागे शह-काटशहाचे नेमके काय राजकारण सुरू आहे, याबाबत उलटसुलट चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@