उद्धवजी, राम मंदिर बांधाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |



एका निश्चित वेळापत्रकात राम मंदिर बांधून देण्याची शिवसेनेची तयारी असेल तर त्यांनी ते खुशाल बांधावे. मात्र, शिवाजी पार्कवर लोकांना गोळा करून मनोरजंनाचे कार्यक्रम होत राहिले तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे नाव ‘हसरा मेळावा’ झालेले असेल.


दसरा हा हिंदूंसाठी विशेषत: मराठी माणसासाठी महत्त्वाचा सण. महाराष्ट्रात तर त्याला अनेक भावनिक क्षण जोडले आहेत. मात्र, गेले काही दिवस दसरा मराठी मुलखात मनोरंजनाची मोठी पर्वणी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. लोक दसऱ्याची वाट अगदी मन लावून पाहात असतात ते शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणासाठी. शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची मराठी माणसाची परंपरा बाळासाहेबांनी अचूक हेरली आणि महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा एक महत्त्वाचा घटनाक्रम होऊन बसला. दसरा मेळाव्यात बाळासाहेब काय बोलणार याची उत्सुकता केवळ शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य मराठी माणसालादेखील असायची. त्यामुळे शिवसैनिकांव्यतिरिक्तही बाळासाहेबांचे कितीतरी चाहते या दसरा मेळाव्याला हजेरी लावायचे. काळ बदलला आणि शिवसेनाप्रमुखपदाची वस्त्रे घराण्याच्या नियमानुसार उद्धवजींना मिळाली. राज ठाकरेंपेक्षा काहीसे परिपक्व असलेल्या उद्धव ठाकरेंनी स्वत: शिवसेनाप्रमुख होणे टाळले, कारण त्यांना माहीत होते की, दुसरे शिवसेनाप्रमुख होणे शक्य नाही. शिवसेनाप्रमुख ओळखले जायचे, ते त्यांच्या बेदरकार स्वभावासाठी. सत्तेच्या कुठल्याही पदावर स्वत: बसण्याची अभिलाषा बाळासाहेबांनी कधीच केली नाही. त्यामुळे ‘खिशात राजीनामे’ वगैरे कुचेष्टा सेनेच्या मंत्र्यांना कधीच सहन करावी लागली नाही.

 

उद्धव ठाकरे मात्र बाळासाहेबांच्या तुलनेत नेमके इथे मागे पडले. संख्याबळ, भाजपचा वाढता प्रभाव यासारख्या गोष्टींचा अंदाज त्यांना बांधता आला नाही. संजय राऊतांसारख्या राजकीय पक्षात कार्यकर्ता म्हणून काम केल्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या माणसाकडे आपली सवाई सूत्रे सोपविल्याने शिवसेनेची आजची स्थिती दयनीय झाली आहे. शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ काम केलेले लोक नाहीत, असे मुळीच नाही. मात्र, कुठूनही निवडून न येण्याची क्षमता असलेल्या मंडळींनी उद्धवजींना असे काही घेरले आहे की, खुद्द शिवसैनिकांनाच काय करावे ते कळत नाही. या सगळ्या मंडळींच्या वकुबाच्या आधारावर २०१४ साली शिवसेनेने युती तोडली आणि त्यातून जे काय व्हायचे ते झाले. जे काही झाले तो सगळा इतिहास आणि आज जे काही चालले आहे ते आहे शिवसेनेचे वर्तमान. हे वर्तमान पाहाता, शिवसेनेचे भविष्य काय असेल, हे सांगणे अवघडच. स्वत:चे काही उभारण्यापेक्षा दुसऱ्याच्या वाटेत काटे कसे पेरता येतील, असे शिवसेनेचे काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेसारखी महाकाय महानगरपालिका एका बाजूला शिवसेनेच्या हातात आणि मरणयातना भोगणारा मुंबईकर दुसऱ्या बाजूला, असे गेल्या अनेक वर्षांचे चित्र. खराब रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट यासारखे कितीतरी प्रश्न शिवसेनेला अद्यापही सोडविता आलेले नाहीत. मुद्दा हा आहे की, इतके विषय तुमच्यासमोर असताना नको ते उद्योग करून स्वत:चे हसे करून घेण्याची इतकी हौस शिवसेनेला का? घराण्यातून आलेल्या बहुसंख्य नेत्यांची हीच शोकांतिका असते. कार्यकर्ता म्हणून काम न केलेल्याने किंवा स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी झगडावे न लागल्याने, भवताली काय सुरू आहे हेच या मंडळींना समजत नाही. आपले हसे होत आहे, याचेही भान त्यांना राहात नाही. अवतीभवती असलेली खुशमस्कर्‍यांची फौज या सगळ्या गोष्टी आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचूच देत नाही.

 

गेली तीन वर्षे शिवसेना मोदी सरकारला घेरण्यासाठी निरनिराळ्या कारणांनी आदळआपट करीत आहे. राम मंदिर हा त्यातला एक मुद्दा. ‘मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बताएंगे,’ हे उद्धव ठाकरेंना चांगलेच भाव मिळवून दिलेले गेल्या वर्षीचे वाक्य. मात्र, गेल्या वर्षभरात मंदिर बांधण्यासाठी यांनी काय केले याचा कुणाला पत्ता नाही. मुळातच राम मंदिर असो किंवा मराठी माणसाचा मुद्दा; शिवसेनेने या मुद्द्यांचा वापर भावनिक राजकारण तापविण्यासाठीच केला. शिवसेनेने उचललेला मराठी मुद्दा एकेकाळी फिका पडू लागला आणि मराठी माणसेच शिवसेनेकडे उत्तर मागू लागली. अशावेळी बाळासाहेबांनी आपल्या आक्रमक स्वभावानुसार शिवसेना आक्रमक हिंदुत्वाकडे नेली. रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळाच काळ आक्रमक हिंदुत्वाचा होता. या सगळ्यात शिवसेना बेमालूमपणे मिसळून गेली. बाबरी ढाचा कोसळल्यानंतर विधानांची जी गर्दी झाली, त्यात बाळासाहेबांनी अगदी सहजपणे “जर ते कृत्य शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,” असे बिनधास्तपणे सांगितले. हा सगळा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेला काळ होता. राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात गेला. न्यायालयाने त्यावर सुनावण्या सुरू केल्या आणि मग हा मुद्दा काहीसा रेंगाळत गेला. अनेक भाजपद्वेष्ट्यांना हा मुद्दा भाजपला खिजविण्यात आनंद मिळवून देतो. या सगळ्यांचे राम मंदिराच्या बांधणीत स्वत:चे काहीच योगदान नसले तरीही त्याचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेसारखी मंडळी करीतच असतात. काल उद्धवजींनी, “राम मंदिर बांधा, नाही तर शिवसेनाच ते बांधेल,” असे जाहीर केले. राम मंदिर काही कुणाच्या बापजाद्यांची जहागीर नव्हे. ते कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक आहे. शिवसेना जर ते बांधू शकत असेल आणि एका निश्चित वेळापत्रकात राम मंदिर बांधून देण्याची शिवसेनेची तयारी असेल, तर त्यांनी ते खुशाल बांधावे. तसे झाले तर भारताच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र, शिवाजी पार्कवर लोकांना गोळा करून मनोरंजनाचे कार्यक्रम होत राहिले तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे नाव ‘हसरा मेळावा’ झालेले असेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@