‘एम.आय. ६’ ची विजयध्वजा आणि कर्नल गोर्दियेव्हस्की

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



ओलेग गोर्दियेव्हस्की १९६८ सालीच केजीबी हस्तक म्हणून डेन्मार्क देशाची राजधानी कोपनहेगनमध्ये कामाला लागला. उत्कृष्ट काम केल्याबद्दल १९७३ साली त्याची बढती आणि बदली लंडन केंद्राचा प्रमुख म्हणून करण्यात आली.

 

सन १९८८च्या जून महिन्यातील ती एक छानशी संध्याकाळ होती. लंडनच्या वॅक्झॉल क्रॉस परिसरातील ‘एम.आय. ६’च्या मुख्यालयात म्हणजेच ब्रिटिश गुप्तहेर खात्याच्या कार्यालयात नेहमीप्रमाणेच कामं चालू होती. खरं पाहता आज तिथे प्रचंड जल्लोष असायला हवा होता. विजयदिन साजरा व्हायला हवा होता. हाच विजय जर उघड-उघड राजकीय किंवा लष्करी क्षेत्रातील असता, तर कदाचित प्रचंड मोठी जाहीर सभा, नेत्यांची भाषणं, लष्करी मानवंदना, संचलनं, सैनिकी पथकांच्या थरारक कसरती वगैरे नेत्रदीपक कार्यक्रम झाले असते. पण, वॅक्झॉल क्रॉस मुख्यालयात यापैकी कसलाही हासभाससुद्धा नव्हता. कारण, तो गुप्तहेर खात्याच्या एका मोठ्या कामगिरीचा विजय होता. तो गुप्तपणेच साजरा करणं आवश्यक होतं. ब्रिटिश हेरखात्याचा एक निवृत्त हेरप्रमुख म्हणतो, “आमच्या अपयशाचे जाहीर वाभाडे काढले जातात. आमच्या यशाचा मात्र कुणालाही पत्ताच नसतो.” हे अगदी खरं आहे. पण, त्याला इलाजच नसतो. कारण, त्यांचं यश जाहीर झालं, तर शत्रू सावध होणार आणि ज्या मार्गाने ते यश मिळालं, तो मार्ग बंद होणार. परंतु, १९८८ सालचं ते यश इतकं मोठं आणि इतकं दूरगामी परिणाम करणारं होतं की, ते साजरं करण्यासाठी एक मेजवानी देणं आवश्यक होतंच. त्यासाठी ठिकाण मुद्दामच मुख्यालयापासून खूप दूर उत्तर लंडनमधील एक हॉटेल निवडण्यात आलं. ‘एम.आय.६’चे अनेक उच्चपदस्थ अधिकारी तिथे जमले. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता; एक उंच, धिप्पाड, कपाळावरून केस मागे फिरलेला, चश्मिश, टिपिकल रशियन चेहर्‍याचा वयस्कर माणूस, त्याचं नाव कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की. सोव्हिएत रशियाच्या केजीबी या कुख्यात गुप्तहेर खात्याच्या लंडन कार्यालयाचा प्रमुख.मेजवानीला अपेक्षित असलेले सर्व लोक जमल्यावर पाश्चिमात्त्य पद्धतीनुसार, दारूचे ग्लास घेऊन सगळे जण गोर्दियेव्हस्कीभोवती जमले. एकजण म्हणाला, “अफगाणिस्तानातून रशियन सैन्याच्या सुरू झालेल्या केविलवाण्या माघारीकरिता...” सगळ्यांनी ‘चिअर्स’ म्हणत ग्लास उंचावून गोर्दियेव्हस्कीला अभिवादन केलं. या प्रकाराला ‘टोस्ट’ असं म्हटलं जातं. हे सगळं इतक्या सहजतेने, सफाईने झालं की, हॉटेलमधील इतर बघ्यांना तो माणूस काय बोलला आणि हे सगळे कोण आहेत, याचा कसलाही थांगपत्ता लागला नाही. ‘एम.आय.६’चे ते सगळे अधिकारी मात्र त्या दिवशी कमालीचे खुशीत होते. त्यांना कळून चुकलं होतं की, ही रशियन सैन्याची नुसतीच माघार नाही, तर एका ‘सैतानी साम्राज्याच्या’ एका ’एव्हिल एम्पायरच्या’ पतनाची सुरुवात आहे आणि खरोखरच आणखी जेमतेम अडीच-तीन वर्षांत ते साम्राज्य कोसळलं. १९८८ ते १९९१. ब्रिटिशांचा आणि लोकशाहीवादी जगाचा एक जबरदस्त शत्रू खलास झाला. खरोखरच हा फार मोठा विजय होता. ही सगळी काय भानगड आहे, हे नीट समजून घेण्यासाठी आपण इतिहासावर एक वेगवान दृष्टिक्षेप टाकूया. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर युरोपातल्या देशांमध्ये जग जिंकण्याची स्पर्धा लागली. ती मुख्यत: इंग्लंडने, पण अधिकृत भाषेत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स हे चार प्रांत मिळून बनलेल्या ब्रिटनने जिंकली. नेपोलियन बोनापार्टने ब्रिटनसमोर जबरदस्त आव्हान उभं केलं होतं, पण ब्रिटनने त्यालाही यशस्वीपणे संपवलं. तेवढ्यात ब्रिटनला जाणीव झाली, रशियाच्या वाढत्या बळाची. रशियन सम्राट म्हणजे झार पीटर द ग्रेट (जन्म: १६७२ राज्यारोहण: १६८२, मृत्यू: १७२५) याने अतिशय योजनाबद्ध रीतीने रशियाला अत्याधुनिक बनवलं. त्याला संपूर्ण पूर्व युरोप आणि स्कँडिनेव्हियन देश (नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क) तर हवेच होते, पण रशियाच्या दक्षिणेकडचे कझाकस्तान, उझबेकिस्तान ते अफगाणिस्तानपर्यंतचे सर्व देश जिंकून थेट भारतापर्यंत पोहोचायची म्हणजे भारत जिंकण्याची त्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी ब्रिटिशांनी अफगाणिस्तान जिंकून तिकडची सरहद्द सुरक्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. ते जमेना, मग त्यांनी मुत्सद्देगिरी चालवून अफगाणांच्या शहाला कायमचा मित्र बनवलं.

 

रशियात १९१७ साली साम्यवादी क्रांती झाली. झारशाही संपली. पण, साम्यवादी नेते, लेनिन आणि त्याच्याहीपेक्षा स्टालिन हे झार राजे फिके पडावेत इतके सत्तापिसासू होते. झारशाहीप्रमाणेच साम्यवादी राजवट आणि ब्रिटन यांचं जुनं हाडवैर चालूच राहिलं किंबहुना त्याला अधिकच धार चढलीतेवढ्यात जग जिंकू पाहाणारा एक नवाच महाखलनायक जगाच्या रंगभूमीवर अवतरला. अॅडॉल्फ हिटलर. त्याने निर्माण केलेल्या महाभयानक उत्पाताने त्याच्या स्वत:च्या देशासकट सगळेच युरोपीय देश खिळखिळे झाले. पण, स्टालिन अधिकच प्रबळ झाला. पाहाता-पाहाता त्याने संपूर्ण पूर्व युरोप आणि अफगाणिस्तानपर्यंतचे देश आपल्या पंजाखाली आणले. ‘साम्यवादी तत्त्वज्ञान’ नावाच्या मायावी आवरणाखाली त्याने जगभरच्या विचारवंत, बुद्धिमंतांना भुलवून आपल्या कच्छपी लावलं. स्टालिननेच निर्माण केलेल्या केजीबी या रशियन गुप्तहेर खात्याने स्वदेशासकट जगभर विश्वासघात, फंदफितुरी आणि घातपात यांचा नुसता कहर उसळून दिला. साम्यवादाच्या मायावी तत्त्वज्ञानाने भ्रमित झालेले जगभराचे विचारवंत, बुद्धिमंत, साहित्यिक, कलावंत आपापल्या देशाशी बेधडक बेईमानी करायला उद्युक्त झाले. पुढे स्टालिनच्याच काही चेल्याचपाट्यांना त्यांची दादागिरी असह्य होऊ लागली. त्यांनी बंड केलं, तेव्हा सोव्हिएत रणगाडे दणाणत आले नि त्यांनी बंड अक्षरशः चिरडून टाकलं. उदा. १९५६ साली हंगेरीचा साम्यवादी नेता इमे्र नागी आणि १९६८ साली झेकोस्लोव्हाकियाचा अलेक्झांडर ड्युबचेक यांनी बंड केलं. त्याची प्रचंड लष्करी बळावर साफ वासलात लावण्यात आली. ब्रिटन-अमेरिका दातओठ चावत फक्त बघत राहिले आणि उरलेलं जग भयचकित होऊन पाहात राहिलं. १९७९ साली अफगाणिस्तानात यादवी सुरू झाली, तेव्हा तिथल्या साम्यवादी पक्षाची पाठराखण करायला पुन्हा एकदा सोव्हिएत रणगाडे काबूलमध्ये उतरले. पण, आता हे १९५६ किंवा १९६८ साल नसून १९७९ साल होतं. रणगाड्यांना घाबरायला पठाण म्हणजे हंगेरियन किंवा झेकोस्लेव्हाक पांढरपेशे नागरिक नव्हते. एक जबरदस्त गनिमी युद्ध सुरू झालं, जे पुढची नऊ वर्ष सतत सुरू राहिलं. ओलेग गोर्दियेव्हस्की १९६८ सालीच केजीबी हस्तक म्हणून डेन्मार्क देशाची राजधानी कोपनहेगनमध्ये कामाला लागला. उत्कृष्ट काम केल्याबद्दल १९७३ साली त्याची बढती आणि बदली लंडन केंद्राचा प्रमुख म्हणून करण्यात आली. डॅनिश गुप्तहेर खात्यामधील सूत्रांमार्फत गोर्दियेव्हस्की ब्रिटिश गुप्तहेर खात्यातील म्हणजे ‘एम.आय.६’ मधील योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचला आणि त्याने ब्रिटनला गुप्त माहिती देण्याचं काम सुरू केलं. केवढं आश्चर्य! केजीबीचा लंडन केंद्रप्रमुख स्वतःहून ब्रिटिश हस्तक बनला. १९५० आणि ६०च्या दशकात हेरॉल्ड अॅड्रियन रसेल उर्फ किम फिल्बी हा उच्चपदस्थ ब्रिटिश हेर स्वतःहून केजीबीचा हस्तक बनला होता आणि त्याने फार महत्त्वाची माहिती रशियाला पुरवली होती. हे त्याने केलं, यात त्याला देशद्रोह वाटला नाही. कारण तो साम्यवादी होता. आपण हे केलंच पाहिजे, असं त्याला वाटत होतं. गोर्दियेव्हस्कीची भूमिका नेमकी त्याच्या उलट होती. साम्यवादी तत्त्वज्ञान आणि त्याहीपेक्षा म्हणजे केजीबीच्या कारवाया ही चक्क गुन्हेगारी, गुंडगिरी आहे आणि ती संपवलीच पाहिजे, असं त्याचं मत बनलं होतं.

 

१९७३ ते १९८५ पर्यंत गोर्दियेव्हस्कीने ‘एम.आय.६’ ला फार मौल्यवान माहिती पुरवली. त्यातला मुख्य भाग हा की, सोव्हिएत रशियन नेते कायम जी दादागिरी करतात, त्यामागे सामर्थ्याचा अहंकार हा भाग नसून, युरोप-अमेरिकेच्या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ते मनातून घाबरलेले आहेत, ही गोष्ट मार्गारेट थॅचर आणि रोनाल्ड रीगन यांना पटवून देणे. १९८३ साली रीगन यांनी उघडपणे सोव्हिएत राजवटीला ‘एव्हिल एम्पायरम्हटल्यावर तर रशियन नेतृत्वाची पाटलोण सुटायची वेळ आली होती, हे गोर्दियेव्हस्कीकडून ‘एम.आय.६’ ला समजलं. १९८५ नंतर सगळंच वेगाने बदललं. सत्तेवर आलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी मे १९८८ पासून अफगाणिस्तानातल्या पठाणांकडून हग्या मार खाणारी सोव्हिएत सेना काढून घ्यायला सुरुवात केली. १९८९ साली त्यांनी पूर्व युरोपातल्या आपल्या मांडलिक चमच्यांना वार्‍यावर सोडलं. त्यासरशी पूर्व जर्मनी ते ताजिकीस्तानपर्यंतचं सोव्हिएत साम्राज्य धडाधडा कोसळलं आणि १९९१ साली तर ‘यूएसएसआर’ नावाच्या सैतानी राजवटीची संपूर्ण इतिश्री होऊन ‘रशियन फेडरेशन’ हा नवा देश अस्तित्वात आला. बेन मॅकिंटायर हा एक नवा ब्रिटिश इतिहासकार-लेखक आहे. ‘द स्पाय अॅण्ड द ट्रेटरया नावाने त्याने कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्कीचं चरित्र आणि एकंदर त्या काळाचा लिहिलेला वृत्तांत नुकताच प्रकाशित झाला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@