उशिरा सुचलेलं शहाणपण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018   
Total Views |



भारतीय दर्शनांत कर्माच्या सिद्धांताविषयी बरंच चिंतन झालं आहे. आपण जे वर्तमानात काही बरं-वाईट कर्म करतो, त्याचीच बरी-वाईट फळं भविष्यात आपल्या वाट्याला येतातच. त्यापासून सुटका नसते. “तुम्ही-आम्ही भले” या संकल्पनांवर विश्वास ठेवू अथवा न ठेऊ, पण काँग्रेस नेत्यांचा मात्र गेल्या काही दिवसांपासून या कर्माच्या सिद्धांतावर पक्का विश्वास बसू लागला असल्याचं दिसतं. कर्नाटकातील काँग्रेस नेते व मंत्री डी. के. शिवकुमार यांचंच उदाहरण घ्या. या महाशयांना आपल्या आणि आपल्या पक्षाच्या कर्माची फळं बहुधा डोळ्यासमोर दिसू लागली आहेत, म्हणूनच ते आता पश्चात्तापाची भावना व्यक्त करत आहेत. “स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देणं, ही काँग्रेस सरकारची मोठी चूक होती,” अशा स्वरूपाचं जाहीर वक्तव्य या मंत्रिमहोदयांनी नुकतंच एका कार्यक्रमात केलं. स्वतःची चूक मान्य करण्याचं धाडस अभावानेच आढळतं. ते दाखवल्याबद्दल शिवकुमार यांचं अभिनंदन निश्चितच करावं लागेल, परंतु त्या पलीकडे केवळ “उशिरा सुचलेलं शहाणपण” इतकाच याचा अर्थ काढता येईल. लिंगायत समाज हा कर्नाटकातील एक प्रमुख समाज. कर्नाटकात जवळपास २० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या लिंगायतांची खासकरून उत्तर आणि मध्य कर्नाटकात लक्षणीय संख्या आहे. साहजिकच राज्यातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात हा समाज प्रभावी ठरतो. कर्नाटक निवडणुकीपूर्वी स्वतंत्र लिंगायत धर्माची हाक देण्यात आली. लिंगायत हा हिंदू धर्माचा भाग नव्हेच, अशा स्वरूपाचा प्रचार सुरू झाला. मग त्या दृष्टीने मोर्चे, आंदोलनं वगैरे सुरू झालं. अर्थात, दुसरीकडे या प्रचाराविरुद्ध लिंगायत समाजातूनच अनेक संघटना, मान्यवर व्यक्ती हिंदुत्वाच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे उत्तर कर्नाटकाचा काही भाग वगळता या स्वतंत्र धर्माच्या मागणीचा प्रभाव फारसा जाणवला नाही. महाराष्ट्रातही सोलापूर, उस्मानाबाद, लातूर इ. भागांत काही प्रमाणात आंदोलनं झाली, परंतु लिंगायत समाजातूनच या सर्व प्रकाराला थारा न मिळाल्याने हे आंदोलन मर्यादितच राहिलं. एकीकडे हे आंदोलन आणि दुसरीकडे तोंडावर आलेल्या निवडणुका अशा परिस्थितीत काँग्रेस या साऱ्या विषयाकडे एक राजकीय संधी म्हणून न पाहती तरच नवल. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक राज्य सरकारने स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देऊन टाकली.

 

आता हे धैर्यही दाखवा!

 

आता राज्य सरकारने मान्यता दिली म्हणजे लगेच हा लिंगायत धर्म निर्माण झाला का? तर मुळीच नाही. कारण, राज्याला असं काही करण्याचा अधिकारच नाही. मतांना डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने हिंदू धर्मात फूट पाडण्याचा कुटील डाव खेळला खरा, पण दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप या निवडणुकीत उतरला आणि येडीयुरप्पा हिंदुत्वाची बाजू घेऊन ठामपणे उभे राहिले. आता गंमत म्हणजे, येडीयुरप्पा हे स्वतः लिंगायतच! लिंगायत समाजातीलच एक ज्येष्ठ नेता “लिंगायत हे हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहेत” असं सांगत खंबीरपणे उभा राहतो आणि दुसरीकडे सिद्धरामैय्या यांच्यासारखा बिगर-लिंगायत व्यक्ती केवळ मतांना डोळ्यासमोर ठेऊन हिंदू धर्मात फूट पाडू पाहतो, असा संदेश यातून कन्नडिगांपर्यंत गेला. साहजिकच, या सगळ्या राजकारणाचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला आणि सलग पाच वर्षे स्पष्ट बहुमतात सत्तेत असलेली काँग्रेस अचानक १२२ वरून ८० पर्यंत घसरली. तिकडे ४० वर असलेला भाजप ६४ जागांची झेप घेत १०४ पर्यंत पोहोचला आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसची ही अवस्था होण्यात लिंगायत समाजाच्या मुद्द्याबाबत घेतलेली भूमिका, हे एक प्रमुख कारण होतं. इतकंच नव्हे, तर मुस्लीम समाजाला चुचकारण्यासाठीही काँग्रेस अनेक डाव खेळली. टिपू सुलतानाचा आणि बहामनी साम्राज्याचा उदोउदो करणं, राज्यातील हिंदू राष्ट्र आणि धर्माभिमानी जनतेला रुचलं नाही. परिणामी, आपल्याहून निम्म्या जागा मिळवणाऱ्या जेडीएसच्या एच. डी. कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपद देऊन कशीबशी सत्ता टिकवण्याची वेळ काँग्रेसवर आली. घराणेशाहीवर चालणारे प्रादेशिक पक्ष सर्वत्र जो मनःस्ताप देतात, तो इथेही काँग्रेसला व्हायला लागला. गेल्या चार महिन्यात हे पुष्कळदा दिसून आलं. वास्तविक, हेच ते डी. के. शिवकुमार, ज्यांनी काँग्रेस-जेडीएस आघाडी करण्यात आणि भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. शिवकुमार सध्या राज्यात जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण या खात्यांचे मंत्री आहेत. आता त्यांना आपल्या पक्षाच्या कर्मांचा पश्चात्ताप होतो आहे, पण केवळ पश्चात्ताप करून भागणार नाही, एवढी मोठमोठी, उदात्त कर्म केल्यानंतर त्यांची फळंदेखील भोगावीच लागणार आहेत. अर्थात, ती फळं त्यांना २०१९मध्ये मिळणार की त्यानंतर, हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@