कायदा करून राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |
 

शहरी नक्षलवाद देशाचे तुकडे करत असल्याची टीका


नागपूर : अयोध्येतील राम मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करून राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहन सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी शहरी नक्षलवादावरही कडाडून हल्लाबोल केला. शहरी नक्षलवादाचा प्रभाव गेल्या काही काळात वाढल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९३व्या स्थापनादिनानिमित्त व विजयादशमीनिमित्त आयोजित पथ संचलन सोहळ्यात त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना त्यांनी संबोधित केले.

 

सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले, “संत महात्मांकडून जी पावले उचलली जातील त्यांच्यासोबत संघ चालेल. राम मंदिर बनलेच पाहिजे. सरकारने त्यासाठी कायदा करावा आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करवा. हा हिंदू-मुस्लीम मुद्दा नाही. राम मंदिर भारताचे प्रतिक असेल, ज्या मार्गाने मंदिर उभारणे शक्य होईल, त्या मार्गाने ते उभे राहिले पाहिजे. भगवान श्रीराम देशाचे गौरव पुरुष आहेत. सर्व गोष्टी सिद्ध झाल्या असतानाही न्यायालयात प्रकरण लांबवले जात आहे. हिंदू समाज राम मंदिरासाठी प्रतीक्षा करत आहे. लोकांना सत्य माहित आहे. राम मंदिरावर निर्णयही त्वरीत येऊ शकतो, मात्र, ज्यांना याचे राजकारण करायचे आहे, ते लोक हा मुद्दा लांबवत आहेत. राजकारण नसते तर इतक्यात मंदिर पूर्ण झाले असते. त्यासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज आहे.

 

सरसंघचालकांनी यावेळी शहरी नक्षलवादालाही लक्ष्य केले. गेल्या काही काळापासून वारंवार सुरू असलेल्या आंदोलनांवर टीका करताना ते म्हणाले, “ताकद दाखवण्यासाठी काही मुद्दे मोठे केले जात आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये देशाच्या विघातक वृत्ती पेरली जात आहे. या आंदोलनकर्त्यांचा देशातील कायदे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. बंदूकीच्या जोरावर आपल्या मागण्या मान्य करवून घेणे, विद्यार्थ्यांच्या संघटना उभारुन त्यांच्यात चुकीची माहिती पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे, देशाच्या शत्रूंपासून मदत मिळवणे आदी कृत्यांमुळे देशाचे तुकडे करणे हे त्यांचे लक्ष आहे.’’ याला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने सजग राहीले पाहीजे, असेही ते म्हणाले.

 

सध्या देशात सुरू असलेल्या शबरीमाला मंदीर प्रश्नीही त्यांनी भूमिका मांडली. शबरीमाला मंदिर प्रकरणावर बोलताना सरसंघचालकांनी स्त्री-पूरुष समानता मुद्द्यावरुन अस्थिरता निर्माण केली जात असल्याचे सांगितले. मोहनजी म्हणाले, “ शबरीमाला मंदिराचा निर्णयाचा उद्देश हा स्त्री-पुरुष समानता होता. परंतू इतक्या वर्षांपासूनच्या परंपरा मोडीत काढण्यात येत आहे. ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली ते तर कधी या मंदिरात जाणार नाहीत. मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर धर्मगुरुंशी चर्चा व्हायला हवी. तेही परिवर्तनाची भाषा समजतात. न्यायालयाच्या निर्णयामुळे केरळमध्ये सध्या असंतोष निर्माण होत आहे. ज्या महिला शबरीमाला मंदिराच्या परंपरेला मान देतात त्यांचे म्हणणे कुणी ऐकूनच घेतले नाही.स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली समाजात अस्थिरता निर्माण केली जात आहे. स्त्री-पूरुष समानतेला आमचा विरोध मुळीच नाही. मात्र, परंपरांचेही पालन व्हायला हवे., असेही मोहनजी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@