ऊसतोड कामगार मंडळ उभारणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |


सावरगाव येथील दसऱ्या मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा


बीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी आज सावरगाव येथे सीमोल्लंघन करत शक्तीप्रदर्शन केले. भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेले सावरगाव येथे भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. अवघ्या ४५ दिवसात हे स्मारक उभे करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे मानकरी होण्यासाठी भगवानबाबा यांचे लाखो भाविक उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी महाराष्ट्रात २०१९ला भाजपाच्या विजयाचीच घंटा वाजणार असल्याची गर्जना केली.

 

मागील तीन वर्षांपासून दसरा मेळाव्याचा वाद चालू आहे. त्यामुळे मागील वर्षांपासून पंकजा सावरगाव येथे सीमोल्लंघन करतात. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगार मंडळ जाहीर करण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, "ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयते खाली ठेवण्यासाठी पंकजा मुंडे काम करत आहे. उद्याचा दिवस मावळायच्या आत ऊसतोड कामगार मंडळजाहीर झाल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा नाही माझे वचन आहे." २०१४ साली बीड जिल्ह्यात ९९ टँकर सुरु होते. मात्र मी मंत्री झाल्यापासून याचे प्रमाण शून्य झाले. असेही त्या म्हणाल्या.

 

 
 

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. पाठीमागून वार करणाऱ्यांनी समोर यावे. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही तर जनतेची सेवा करतो. असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला. भगवानगड, गोपीनाथ गडानंतर सावरगाव येथे भगवानबाबांचे स्मारक उभारल्याने त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. जगभरात पोहोचलेल्या भगवानबाबांचे त्यांच्या गावात मंदिर का नको? असा प्रश्न पंकजा यांनी उपस्थित केला. यावेळी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे-खाडे, रासप अध्यक्ष महादेव जानकर व महाराष्ट्रातील अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

 

काय आहे स्थलांतरित दसऱ्याचा वाद?

 

दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावरून यापुढे राजकीय भाषणे होणार नसल्याचा फतवा काढला होता. त्यानंतर बीड व नगर जिल्ह्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यावरून पंकजा मुंडे यांना ३ वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला. त्यानंतर मागील वर्षांपासून भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीला पंकजा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागील वर्षांपासून दसरा मेळावा सावरगाव येथे घेण्याचे ठरवले. त्यामुळे पंकजा मुंडे गर्दी जमवतात का? गोरगरीब, ऊसतोड कामगारांचा हा दसरा मेळावा यशस्वी होईल का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. मात्र पंकजा मुंडे या दसऱ्या मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करण्यात यशस्वी ठरल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@