राष्ट्राचा ‘स्व’गौरव महत्त्वाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
शिया वक्फ बोर्डासह मुस्लीम समाजातील अनेक लोक अयोध्येत श्रीराम मंदिरच व्हावे, याच मताचे आहेत. सरसंघचालकांनी आपल्या मार्गदर्शनात याच विषयावर मत व्यक्त केले व मंदिरनिर्मितीसाठी कायदा करण्याची मागणी केली. सरसंघचालकांच्या या मागणीशी सर्वच सहमत असतील. त्यामुळे आता गरज आहे, ती संसदेने या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर तोडगा काढण्याची व हिंदूंच्या भावनांचा सन्मान करण्याची.
 

असंख्य स्वयंसेवक-कार्यकर्ते आणि विरोधकांसह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात देशातील निरनिराळ्या विषयांचा, घटनांचा, समस्यांचा ऊहापोह केला, त्यातील सर्व मुद्दे अन्यत्र दिलेले आहेतच. डॉ. मोहनजी भागवतांनी भारताला लाभलेले सागरी क्षेत्र आणि बेटांच्या सुरक्षेचा विषय मांडला. सध्या जगाचे नेतृत्व करण्याचे वेध लागलेल्या चीनची पावले व्यापारी आणि कर्ज-मदतीच्या रूपाने बहुतांश देशांना आपले अंकित करून घेण्याच्या मार्गाने दौडत आहेत. दक्षिण चीन समुद्रासह हिंदी महासागर व प्रशांत महासागरी क्षेत्रावरही वर्चस्व गाजवण्याची महत्त्वाकांक्षा चीन बाळगतो. आपल्या महत्त्वाकांक्षेला बळ मिळावे म्हणूनच चीनने दक्षिण चीन समुद्रात भराव टाकून कृत्रिम बेटे तयार करणे आणि अन्यत्रच्या सागरी क्षेत्रावर व त्यातील बेटांवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. आता तर ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ योजनेद्वारे चीनने भारताला घेरण्याचा व्यूह आखल्याचेही उघड झाले. सरसंघचालकांनी चीनच्या याच कृत्यांकडे लक्ष वेधले व जणू काही भारताच्या गळ्याभोवती आवळत चाललेल्या फासासारख्या या योजनेवरून देशाला सावध केले. चीनच्या आतापर्यंतच्या कारवाया पाहता त्या देशाने आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही, हेच दिसते. परिणामी भारतीय सागरी क्षेत्रातील अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूहांचे डोळ्यात तेल घालून संरक्षण करणे आणि मालदीवसारख्या देशांशी मैत्री दृढ करणे आवश्यक ठरते. मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे भारताला या दिशेने ठोस काही करण्याची संधी लाभली आहे, त्याचा आगामी काही काळात उपयोग करून घेणे योग्य ठरेल.

 

यंदाच्या वर्षाची सुरुवातच जातीय हिंसाचाराने झाली. माओवादी-नक्षलवादी चळवळीने अनुसूचित जाती व जमातींच्या संघटनांवर कब्जा करत आपले अजेंडे पुढे रेटण्याचे काम केले. एकसंध समाजात दुफळी निर्माण होऊन अंतर्गत यादवी माजावी, अराजकतेचे वातावरण निर्माण व्हावे, देशातली कायदा-सुव्यवस्था धुळीस मिळावी, हा माओवाद्यांचा अंतस्थ हेतू. याच उद्देशाने शहरी भागातून, बुद्धिजीवी वर्तुळातून काम करताना महाविद्यालये व वसतिगृहात युवकांचा बुद्धिभेद करत आपल्या विचारांचे जाळे विणण्याचे काम त्यांनी केले. वर्षानुवर्षे अन्याय-अत्याचाराने गांजलेली जनता माओवाद्यांच्या छळ-कपटाच्या डावाला बळी पडली व ठिकठिकाणी हिंसाचार उफाळला. सरसंघचालकांनी आपल्या संबोधनातून माओवाद्यांच्या हिंसक कारवायांचा परामर्श घेतानाच आपले समाजबांधव त्यांच्या कह्यात जाऊ नयेत म्हणून समाजानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. याशिवाय ‘भारत तेरे टुकडे होंगे’ सारख्या विखारी घोषणा देणार्‍यांनी समाजात, राजकीय व्यासपीठांवर समोर येऊन निरनिराळ्या समूहांना भडकविण्याचे काम केले, त्यावरही डॉ. मोहनजी भागवत यांनी मत मांडत शासन-प्रशासनाकडून त्याविरोधात ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. देश स्वतंत्र झाल्यापासून इथे इंग्रजांनी लागू केलेलीच शिक्षणपद्धती अजूनही अस्तित्वात आहे. शिक्षणात भारतीयत्व असावे आणि शिक्षणाची नवीन धोरणे प्रत्यक्षात लागू व्हावीत, ही देशातल्या बहुसंख्य जनतेची अपेक्षा आहे. देशाच्या समृद्धीचा-विकासाचा मार्ग शिक्षण व शिक्षणाच्या प्रसारातूनच साकार होत असतो. त्याचमुळे सरसंघचालकांनी शिक्षणातही नवतेची आशा करतानाच हातातून निसटत चाललेल्या वेळेचाही उल्लेख केला. आपल्याकडे सध्या जे जे परकीय ते ते उत्तम अशी एक नवीच धारणा बळावताना पाहायला मिळते. परकीयांच्या सगळ्याच गोष्टींचे अंधानुकरण भारतीय सर्रास करताना दिसतात, पण देशकाल परिस्थितीनुरूप जे चांगले ते स्वीकारणे आणि जे वाईट ते टाकून देणे व देशाचे स्वत्व टिकवून ठेवणे, हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य ठरते. त्यामुळेच जगभरातील चांगल्या गोष्टी घेऊन आपल्या तत्त्वांच्या पायावर आपल्या विशिष्ट विकासाचे प्रतिमान आणि त्यानुसार त्याची व्यवस्था उभी करावी लागेल, हे सरसंघचालकांचे आवाहन महत्त्वाचेच.

 

देशाच्या ‘स्व’ आधारित तंत्राच्या गौरवात श्रीरामचंद्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीरामाचा गौरव म्हणजेच भारतभूचा गौरव, पण आज हाच गौरव अयोध्येमध्ये कितीतरी वर्षांपासून एका तंबूत आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भाव-भावना, आस्था-श्रद्धा श्रीरामाशी निगडित आहेत आणि त्या प्रत्येकाला अयोध्येत श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य मंदिर व्हावे, असे वाटते. शिया वक्फ बोर्डासह मुस्लीम समाजातील अनेक लोक अयोध्येत श्रीराम मंदिरच व्हावे, याच मताचे आहेत. सरसंघचालकांनी आपल्या मार्गदर्शनात याच विषयावर मत व्यक्त केले व मंदिरनिर्मितीसाठी कायदा करण्याची मागणी केली. सरसंघचालकांच्या या मागणीशी सर्वच सहमत असतील, त्यामुळे आता गरज आहे ती संसदेने या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर तोडगा काढण्याची व हिंदूंच्या भावनांचा सन्मान करण्याची. सोबतच देशाच्या स्वत्वामध्ये संरक्षण सामग्रीलाही विशेष स्थान आहे. आजही आपल्याला निरनिराळ्या प्रकारची युद्धसामग्री, दारूगोळा, साहित्य, नवीन तंत्रज्ञान परदेशातून आयात करावे लागते. देशाची कितीतरी संपत्ती या शस्त्रास्त्र आयातीवर खर्च होते. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतही देशात संरक्षण सामग्री निर्मितीचे नाव घ्यावे, असे प्रकल्प नाहीत, ना त्यासंबंधी वैशिष्ट्यपूर्ण संशोधन होत. याच कमतरतेवर बोट ठेवत सरसंघचालकांनी शस्त्रनिर्मितीत स्वावलंबनावर भर दिला. रशिया, अमेरिका वा इस्रायलला, फ्रान्स या सर्वच देशांकडून आपण दरवर्षी नवनव्या संरक्षण खरेदीचे करार करतो पण आपल्या देशातच अशी व्यवस्था, संशोधन व्हावे म्हणून प्रयत्न करत नाहीत. आगामी काळात यावरही भारत उपाय शोधेल व अधिकाधिक स्वनिर्मित शस्त्रास्त्रे बाळगेल, अशी अपेक्षा देशवासीयांनी बाळगली असून ती पूर्ण करण्याचे काम शासनाने, संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी केले पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून केरळमधील शबरीमला मंदिरातील १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून आंदोलनाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी मांडलेले मत महत्त्वपूर्ण ठरते. एखाद्या समाजावर एखादा निर्णय लादल्याने सुधारणा होत नसतात तर बदल आवश्यक आहेच, पण तो बदल हळूहळू होत असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केले. आपल्या देशाला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. समाजप्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातूनच वर्षानुवर्षे प्रथा-परंपरांत अडकलेल्या समाजाला बदलांसाठी अनुकूल करावे लागते, तर असे बदल शांततामय मार्गाने होतात, असे सरसंघचालक म्हणाले. त्यामुळेच आपल्याला केरळ राज्य सरकारनेदेखील भगवान अय्यप्पांच्या भाव-भावनांचा विचार करावा आणि सर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिर प्रवेशासंदर्भाने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय येईपर्यंत जबरदस्ती करू नये, एवढेच याबाबत म्हणता येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@